हणजूण, आसगावातील जमीन हडप प्रकरणी कारवाईचा तपशील उघड
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागीय कार्यालयाने हणजूण आणि आसगाव कोमुनिदादच्या सुमारे 1200 कोटी किमतीच्या सुमारे 3.50 लाख चौरस मीटर जमीन हडप प्रकरणामध्ये यशवंत सावंत आणि इतरांच्या गोवा आणि हैदराबाद येथील 13 निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांवर टाकलेल्या छाप्यात 72 लाखांची रोकड आणि 7 आलिशान कारगाड्या हस्तगत केल्या आहेत. तसेच, या व्यवहारांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींची अनेक बँक खाती, मुदत ठेवी देखील गोठवण्यात आल्या.
गोवा पोलिसांनी हणजूण कोमुनिदादच्या जमीन हडप प्रकरणात नोंद केलेल्या प्रकरणात ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली तपास केला जात आहे.
ईडीच्या गोवा विभागाने 9 आणि 10 सप्टेंबरला यशवंत सावंत व इतरांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. हणजूण, आसगाव कोमुनिदादची सुमारे 3.50 लाख चौरस मीटर जमीन हडप करण्यात आली आहे. या जमिनीतील काही जमिनीची विक्री करण्यात आली आहे. हडप करण्यात आलेल्या जमिनीची बाजारातील किंमत सुमारे 1200 कोटी रुपये एवढी आहे, असा अंदाज ईडीने व्यक्त केला आहे.
ईडीच्या तपास आणि शोध मोहिमेत असे आढळून आले की संशयित आरोपींनी हणजूण आणि आसगाव कोमुनिदादची प्रमुख ठिकाणी असलेली सुमारे 3,50,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन बेकायदेशीरपणे हडप केली आहे. बनावट जुनी कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहेत. शिवाय, या मालमत्तेचा काही भाग विविध व्यक्तींना विकण्यात आला, असेही आढळून आले आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये अंदाजे 72 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच, पोर्श केमन, बीएमडब्ल्यू 650 एल. रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू एम5, ऑडी ए-6 इत्यादी सात उच्च दर्जाच्या वाहने जप्त करण्यात आली. या व्यवहारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची अनेक बँक खाती, मुदत ठेवी देखील गोठवण्यात आल्या, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कारवाई दरम्यान या जमिनीच्या व्यवहारांशी संबंधित विविध गुन्हेगारी कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली. तपासात गोव्यात बेकायदेशीर जमीन हडप करणाऱ्या व्यक्तींचे एक मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे, असेही ईडीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.