शांतेश अंतिम ३२ खेळाडूंत

0
220

>> कॅडेट व उपकनिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस

गोव्याचा युवा स्टार पॅडलर्स तथा भारतीय नंबर खेळाडू शांतेश म्हापसेकरने गोवा टेबल टेनिस संघटना आयोजित कॅडेट आणि उपकनिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत कॅडेट विभागाच्या अंतिम ३२ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. ताळगाव पठारावरील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविण्यात येत आहे.

गोव्याच्या शांतेश म्हापसेकर, आरव अय्यर आणि नागेश वर्णेकर यांनी पात्रता फेरीतील आपले सामने जिंकत मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला होता. परंतु केवळ शांतेशलाच अंतिम ३२ खेळाडूंत स्थान मिळविता आले. अंतिम ६४ खेळाडूंत शातेशने दिल्लीच्या जपजित सिंह मानवर ३-० अशी मात केली. तर आरव अय्यरला पश्‍चिम बंगालच्या ओयशिक घोषकडून ०-३ आणि नागेश वेर्णेकरला गुजरातच्या मनुभायवाला बुरहानुड यांच्याकडून ०-३ असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे आव्हान अंतिम ६४ खेळाडंच्या फेरीतच संपुष्टात आले.

उपकनिष्ठ मुलांच्या विभागात जेहो, यशांक मलिक, जयाब्रता भाट्टाचर्जी आणि अव्वल मानांकित महाराष्ट्राचा दीपित पाटील, द्वितीय मानांकित पायस जैन, देव श्रॉफ यांनी पुढील फेरी गाठली आहे.
तर उपकनिष्ठ मुलींत आसामची अव्वल मानांकित तृषा गोगोई, पश्‍चिम बंगालची मुनमुन कंडू, दिल्लीची वनिष्का भार्गव, मिहिका रोहिरा आणि महाराष्ट्राची दिया चितळे यांनी अंतिम ३२मध्ये आपले स्थान निश्‍चित केले आहे.