कांगारूंनी जिंकली ‘ऍशेस’

0
109
Australian players celebrate taking the Ashes series after winning the third Ashes cricket Test match between England and Australia in Perth on December 18, 2017. / AFP PHOTO / Greg Wood / -- IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE --

कांगारूंनी जिंकली ‘ऍशेस’

पावसाचा व्यत्यत व खेळपट्टीवरून वाद निर्माण झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव व ४१ धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या ‘ऍशेस’ मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. चौथ्या दिवशी ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव काल २१८ धावांत आटोपला.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज कमिन्सने अष्टपैलू ख्रिस वोक्स याला वैयक्तिक २२ धावांवर यष्टिरक्षक टिम पेनकरवी झेलबाद करत कांगारूंचा मालिका विजय साकार केला. ऑस्ट्रेलियाने सामना एकतर्फी जिंकला असला तरी दिवसाच्या सुरुवातीला ‘वाका’च्या खेळपट्टीमुळे वाद निर्माण झाला. काल पहिल्या सत्राच्या सुरुवातीला काहीवेळ पाऊस पडला. दोन दिवसाच्या पावसामुळे खेळपट्टीवरील ‘पॉपिंग क्रीझ’जवळील एका जागी ओलसर जागा निर्माण झाली. यामुळे मैदानी पंच ख्रिस गॅफनी व मराय इरासमस यांनी खेळ सुरू करण्यास नकार दिला. ‘ती’ जागा सुकविण्यासाठी क्युरेटरच्या पथकातील लोकांनी अनेक साधनांचा वापर केला. या दरम्यान पावसाचा शिडकावादेखील झाल्याने त्यांना धावपळ करावी लागली. अथक प्रयत्नांनंतर ‘ती’ जागा सुकविण्यात यश आल्यानंतर मैदानी पंचांनी सामना सुरू करण्यास परवानगी दिली. कित्येक तासांचा खेळ वाया गेल्यानंतर इंग्लंडला सामना अनिर्णित ठेवण्याची संधी होती. परंतु, खेळपट्टीवरील भेगांमुळे वेगवान गोलंदाजांना मिळत असलेल्या मदतीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या फलंदाजांना प्रतिकाराची संधी दिली नाही.

चौथ्या दिवशी २८ धावांवर नाबाद राहिलेल्या मलानने चिवट प्रतिकार करत ५४ धावांची खेळी केली. हेझलवूडने आपल्या पहिल्याच चेंडूवर बॅअरस्टोव (१४) याचा त्रिफळा उडविला. मोईन अली (११), ओव्हर्टन (१२) यांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. ऑस्ट्रेलियातर्फे हेझलवूडने ४८ धावांत सर्वाधिक ५ गडी बाद केले.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४०३ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ९ बाद ६६२ धावांवर घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाच्या डावात द्विशतक ठोकलेला कर्णधार स्टीव स्मिथ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतील चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळविला जाणार आहे.