रोहित शर्मा पाचव्या स्थानी

0
104

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने काल सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीमध्ये पाचवे स्थान मिळविले आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केलेल्या रोहितने फलंदाजीत दोन स्थानांनी वर सरकताना गुणांच्या बाबतीत प्रथमच ८०० गुणांचा टप्पा पार केला. ३० वर्षीय रोहितने यंदा फेब्रुवारी महिन्यात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम तिसर्‍या स्थानापर्यंत मजल मारली होती.

मोहाली एकदिवसीय सामन्यात २०८ धावांची तुफानी खेळा साकारल्यानंतर रोहितने आपली गुणसंख्या २२५ केली होती. परंतु, विशाखापट्टणममधील अपयशानंतर ९ गुण कमी होऊन तो ८१६ गुणांवर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत स्पर्धावीर ठरलेल्या शिखर धवन याने एका स्थानाची प्रगती करताना १४वा क्रमांक प्राप्त केला आहे. तिसर्‍या वनडे सामन्यातील शतकासह धवनने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण १६८ धावा जमविल्या होत्या. धवनने दुसर्‍या सामन्यात ६८ धावांची खेळी साकारताना रोहितसह टीम इंडियाला ११५ धावांची सलामी दिली होती.

गोलंदाजांचा विचार केल्यास लेगस्पिनर युजवेंद्र चहल याने २३ क्रमांकांची मोठी उडी घेत २८व्या स्थानावर हक्क सांगितला आहे. त्याने तीन सामन्यांत ६ गडी बाद करत आपल्या लेगस्पिनची कमाल दाखवली. चायनामन कुलदीप यादवने १६ क्रमांकांनी सुधारणा करत कारकिर्दीतील सर्वोत्तम ५६वे स्थान मिळविले. अष्टपैलू हार्दिक पंड्याने १० क्रमांकांनी पुढे येत ४५वे स्थान मिळविले आहे. पाहुण्या संघातील खेळाडूंमध्ये उपुल थरंगा याने ३६वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्याने आपल्या खात्यात ५७१ गुण जमा करताना मागील पाच वर्षांतील आपली सर्वोत्तम गुणसंख्या गाठण्यात यश मिळविले. यष्टिरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला याने सात स्थानांची सुधारणा करत ३७वा क्रमांक मिळविला आहे. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल (+ १४, २२वे स्थान) व अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज (+ ९, ४५वे स्थान) यांनी प्रगती केली आहे.