राज्य सरकारच्या तिळारी विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव; 3.65 लाख चौरस मीटर जमीन ओलित क्षेत्रातून वगळणार
राज्य सरकारच्या तिळारी विकास प्राधिकरणाने तिळारी पाटबंधारे ओलित क्षेत्रात नव्याने 22.96 लाख चौरस मीटर जमीन ओलित क्षेत्राखाली आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच, राज्यातील पेडणे, बार्देश, डिचोली तालुक्यातील तिळारी ओलित क्षेत्रातील सुमारे 3.65 लाख चौरस मीटर जमीन वगळण्याचा प्रस्ताव आहे. तिळारी ओलित क्षेत्रातून जमीन वगळण्याच्या प्रस्तावामध्ये धारगळ येथील डेल्टीन कॉर्प कंपनीच्या सुमारे 3.33 लाख चौरस मीटर जमिनीचा समावेश आहे. याबाबत नागरिकांना सूचना, आक्षेप सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
जलस्रोत खात्याचे सचिव तथा ओलित क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. गील (आयएएस) यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. करासवाडा-म्हापसा येथील जलस्रोत खात्याच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात सर्कल 2 मध्ये सूचना व हरकती सादर कराव्यात, असे सूचनेत म्हटले आहे.
पेडणे तालुक्यातील धारगळ, तोरसे, बार्देश तालुक्यातील कळंगुट, आसगाव, हणजूण, पर्रा, रेवोडा, डिचोली तालुक्यातील लाटंबार्से, सर्वण, डिचोली आणि मये या 11 गावांमधील सुमारे 3.65 लाख चौरस मीटर (36.53 हेक्टर) जमीन तिळारी सिंचन प्रकल्प ओलित क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव आहे. मंडळाकडे काही जमीनमालकांनी आपले सर्वेक्षण क्षेत्रे वगळण्याची विनंती केली होती. त्यामुळे ओलित क्षेत्र विकास मंडळाच्या 25 नोव्हेंबर 2024 च्या अधिसूचनेत अंशतः बदल केले आहेत. संचालक मंडळाच्या 7 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत 3.65 लाख चौरस मीटर क्षेत्र वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे. तिळारी ओलित क्षेत्रात नव्याने पेडणे आणि डिचोली तालुक्यातील सुमारे 22.96 लाख चौरस मीटर जमीन समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात पालये, कोरगाव, पेडणे, मये, धारगळ, तोरसे यासह बार्देश, डिचोली तालुक्यांच्या गावांतील जमिनींचा समावेश आहे.
मयेतील सर्वाधिक जमीन ओलिताखाली येणार
नवीन प्रस्तावानुसार मये गावातील सर्वाधिक 8,55.935 चौ. मी. जमीन ओलित क्षेत्राखाली आणली जाणार आहे. मंडळाने तिळारी प्रकल्पांतर्गत सिंचन क्षमतेचा अधिक प्रभावी आणि व्यापक वापर करण्यासाठी या अतिरिक्त क्षेत्रांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर काही आक्षेप आणि सूचना असल्यास, अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत सादर करता येतील.
तिळारी ओलित क्षेत्रात नव्याने
समावेश होणारी जमीन किती?
मये : 8,55.935 चौ.मी.
पेडणे : 3,29.954 चौ.मी.
कोरगाव : 15,14.130 चौ.मी.
पालये : 2,29.658 चौ.मी.
तिळारी ओलीत क्षेत्रातून
वगळण्यात येणारी जमीन किती?
धारगळ : 3,39,655 चौ.मी.
तोरसे : 65 चौ. मी.
बार्देश : 13.358 चौ.मी.
डिचोली : 12.260 चौ.मी.