इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या हत्येनंतर तेथील राजवट बदलेल आणि सर्व सूत्रे आपल्या हस्तकांच्या हाती येतील अशा अपेक्षेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असावेत, परंतु तसे घडताना अजून तरी दिसत नाही. इराणने सत्ताबदल करून अजूनही महासत्ता अमेरिकेशी प्रखर संघर्ष सुरू ठेवला आहे. इराण नमलेला तर नाहीच, उलट पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सर्व मित्रदेशांना इराणने सध्या सर्वशक्तीनिशी दणका दिलेला दिसतो. संयुक्त अरब अमिरात, कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन अशा ठिकठिकाणी द्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे अमेरिकेचे तळ, कमांड सेंटर, दूतावास यांना लक्ष्य केले जाते आहे. जो जो अमेरिकेच्या बाजूने उभा आहे तो आपला शत्रू मानून एकाचवेळी अनेक आघाड्यांवर हे युद्ध त्यांनी नेऊन ठेवले आहे. इराणने प्रतिकाराची जोरदार तयारी आधीपासून करून ठेवलेली होती हे सध्याच्या हल्ल्यांवरून स्पष्ट होते. त्या देशाचा सर्वोच्च नेता मृत्युमुखी पडला, संरक्षणमंत्री ठार झाले, सेनाप्रमुख मारले गेले, तरीही इराण सर्वशक्तीनिशी अमेरिकेच्या विरोधात उभा आहे. आमच्यापाशी अमर्याद शस्त्रास्त्रे आहेत आणि आम्ही हे युद्ध दीर्घकाळ लढू शकतो अशी दर्पोक्ती ट्रम्प जरी करीत असले, तरी अशा प्रकारे दीर्घकाळ युद्ध लढणे अर्थव्यवस्थेला जागतिक मंदीच्या गाळात घेऊन जाऊ शकते हे ते विसरत आहेत. इराणच्या हाती होर्मुझच्या सामुद्रधुनीचा हुकुमी एक्का आहे. त्यातून जाणारी तेलवाहतूक सध्या इराणनने बंद पाडली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती त्यामुळे अर्थातच आकाशाला भिडत चालल्या आहेत. त्याचा परिणाम जगभरातील देशांना भोगावा लागणार आहे. जागतिक विमान वाहतुकीवर मोठा परिणाम सध्या झाला आहे. भारतातून लंडनला जायचे विमानाचे तिकीट नऊ लाखांवर पोहोचले आहे. आखाती देशांची नागरी विमान वाहतूक तर ठप्प झाली आहे. केवळ तेथे अडकून पडलेल्या प्रवाशांना माघारी आणता आले हा मोठा दिलासा आहे. अमेरिकेच्या तुलनेत इराणची शक्ती मर्यादित आहे हे जरी खरे असले तरी हिज्बुल्लापासून हौथींपर्यंत अनेक दहशतवादी गट आणि जगभरात पसरलेले इस्लामी कट्टरपंथी यांचे समर्थन खामेनेई राजवटीला होते. त्यामुळे ज्या प्रकारे त्यांचा खात्मा अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने केला ते त्यांना रुचलेले नाही. त्याचा सूड उगवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची ह्या जिहादींची तयारी असेल. त्यामुळे इराणचे शस्त्रास्त्रबळ संपुष्टात आणले म्हणजे सगळे शांत होईल असे मानण्याचे कारण नाही. इराणी जनतेला सत्ता ताब्यात घेण्याचे वारंवार आवाहन ट्रम्प यांनी केले, तरी अजूनही तसे काही घडलेले नाही. उलट अमेरिकेच्या आक्रमक नीतीविरुद्ध तीव्र असंतोष आणि रोष केवळ इराणमध्येच नव्हे, तर खुद्द अमेरिकेतही दिसून येतो आहे. प्रचंड संख्येने निदर्शने चालली आहेत. भारत, पाकिस्तानासह सर्व देशांमध्ये खामेनेई यांच्या हत्येचे पडसाद उमटले आहेत. अमेरिका इराणचे शस्त्रास्त्रबळ इस्रायलच्या मदतीने किती दिवसांत निकामी करते आणि आपल्या हस्तकांना सत्तारूढ करू शकते त्यावर ह्या युद्धाचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे येत्या काळात अमेरिका आणि इस्रायलकडून अधिक प्रखर हवाई हल्ले चढवले जाऊ शकतात. इस्रायलसारख्या निधड्या देशाच्या माध्यमातून अमेरिका इराणवर हा सूड उगवते आहे. खामेनेई यांची हत्या इस्रायलने ज्या प्रकारे घडवली ती बाब आजकालची युद्धे कोणत्या पातळीवर लढली जातात ह्याची प्रचीती देतेे. इस्रायलने इराणमधील वाहतुकीच्या नियंत्रणासाठीच्या कॅमेऱ्यांचे जाळे हॅक केले होते आणि महिनोन्महिने खामेनेई यांचे सुरक्षारक्षक आणि प्रशासनातील बडे अधिकारी यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यांच्या जाण्यायेण्याच्या वेळा, त्यांचा वाढता वावर ह्यावर महिनोन्महिने पाळत ठेवून शेवटी अमेरिकेच्या सीआयएच्या मदतीने खामेनेई यांचा नेमका ठावठिकाणा त्यांनी शोधून काढला आणि एकीकडे चर्चेची, वाटाघाटीची भाषा अमेरिका करीत असतानाच तब्बल तीस बॉम्ब फेकून खामेनेईंचा काटा काढला. हमासने इस्रायलवर केेलेल्या रानटी हल्ल्याचा सूड हमास, हिज्बुल्ला आणि हौथींचा पाठीराखा राहिलेल्या इराणवर अशा प्रकारे इस्रायलने उगवला आहे. पश्चिम आशियातील समीकरणे ह्या युद्धामुळे पालटली आहेत. अमेरिका आणि आखाती मित्रदेश एकीकडे आणि शियापंथीय इराण दुसरीकडे असा हा संघर्ष आहे. रशिया – युक्रेन युद्धाप्रमाणे हा संघर्ष दीर्घकाळ चालता कामा नये. आंतरराष्ट्रीय शक्तींनी तो थोपवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु महासत्ता अमेरिकेपुढेे आंतरराष्ट्रीय शक्ती या घडीस अत्यंत दुबळ्या ठरत आहेत ही मोठी शोकांतिका आहे. हा संघर्ष थोपवण्याची आत्यंतिक गरज आहे. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण हाच प्रश्न आहे.