माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आरोप केलेले कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण
माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आरोप केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या भ्रष्टाचारविरोधी विभागा (एसीबी)च्या याचिकेवर बुधवार दि. 4 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अंतिम सुनावणी होणार आहे.
मार्च 2025 मध्ये राज्य सरकारवर विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करणारा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मडकईकर यांनी भाजपच्या एका राष्ट्रीय नेत्याची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एका मंत्र्याला आपल्या कामाच्या फाईल मंजूर करून घेण्यासाठी 15 ते 20 लाख रुपयांची लाच द्यावी लागल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली होती. तथापि, काही दिवसानंतर मडकईकर यांनी भ्रष्टाचाराचा आरोप गैरसमजातून केल्याचा दावा करून आरोप मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये व इतर पाच जणांनी माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याविरोधात दक्षता खात्याच्या एसीबीकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली होती. एसीबीने या तक्रारीची दखल न घेतल्याने उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून एसीबीला या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. जिल्हा न्यायालयाने जून 2025 मध्ये एका आदेशाद्वारे पांडुरंग मडकईकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश एसीबीला दिला होता.
एसीबीने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती. या आव्हान याचिकेवरील अंतिम सुनावणी दि. 4 मार्च रोजी होणार आहे. आता, या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.