Home Featured 2022 मध्ये उमेदवारीच्या बदल्यातकाँग्रेसकडून पैशांची मागणी : पाशेको

2022 मध्ये उमेदवारीच्या बदल्यातकाँग्रेसकडून पैशांची मागणी : पाशेको

0

गोवा विधानसभेच्या 2022 मधील निवडणुकीपूर्वी काँग्रेसने उमेदवारीच्या बदल्यात पक्षाच्या निधीच्या नावाखाली आपल्याकडे पैसे मागण्यात आल्याचा दावा माजी मंत्री मिकी पाशेको यांनी येथील आझाद मैदानावर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल केला. दरम्यान, काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
कॉँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते आणि तत्कालीन गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी आपणाकडे निधीची मागणी केली होती. या चर्चेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर हेही उपस्थित होते, असा दावा पाशेको यांनी केला.

कॉँग्रेस पक्षाकडून पैसे घेऊन उमेदवारी वाटल्या जातात. आपला कॉँग्रेस पक्षावरील विश्वास उडाला आहे. गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी गिरीश चोडणकर असेपर्यत आपण कॉँग्रेसला पाठिंबा देणार नाही. इतर पक्षांना एकत्र आणून तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही पाशेको यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. राज्यातील सत्ताधारी भाजपला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी सक्षम तिसऱ्या आघाडीची गरज आहे, असेही पाशको यांनी सांगितले.

आरोप राजकीय हेतूने प्रेरित : चोडणकर
काँग्रेस पक्षाने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 37 उमेदवारांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवलेल्या एकाही उमेदवाराने काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी पैसे दिल्याचा दावा कधीही केलेला नाही. उमेदवारी देण्यासाठी पैसे मागितल्याचे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन केले जात आहेत. आरोप करणारे लोक कोणत्याही पुराव्याशिवाय पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर
यांनी म्हटले आहे.

गिरीश चोडणकरांकडून आरोपांचा इन्कार
गत विधानसभा निवडणुकीत पैशांच्या बदल्यात पक्षाच्या उमेदवारी वाटण्यात आल्याच्या आरोपांचा गोवा प्रदेश काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला असून, आरोप करणाऱ्यांनी त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे सादर करावेत, असे आव्हान गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.