Home Featured झुआरी नदीत आढळला बोटमालकाचा मृतदेह

झुआरी नदीत आढळला बोटमालकाचा मृतदेह

0

सहकारी बोटमालकांकडून खुनाचा संशय व्यक्त; बोटीवरील कामगार गायब

झुआरी नदीत काल एका मच्छिमार बोटमालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संशयास्पद बाबी आढळून आल्याने सहकारी बोटमालकांनी खुनाचा संशय व्यक्त केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. मृताची ओळख मंजुनाथ हरिकांत अशी पटली असून, तो खारेवाडा येथून अनेक वर्षांपासून मासेमारी व्यवसाय करत होता.

या घटनेबाबत माहिती देताना ऑल गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी सांगितले की, मंजुनाथ हरिकांत हे आपल्या मजुरांसह मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. त्यानंतर त्याची बोट खारेवाडा जेटीवर परत आली; मात्र बोटीत मासेमारीची जाळी नव्हती. तसेच ट्रॉलिंगसाठी वापरण्यात येणारा मुख्य ब्लॉकही गायब होता. बोट संध्याकाळी उशिरा जेटीवर लावण्यात आली होती. बोटीवरील मजूर कोणालाही कोणतीही माहिती न देता निघून गेले. बोटीत काही प्रमाणात मासळी होती आणि त्यावर पक्षी ताव मारत होते. त्यामुळे मंजुनाथ मासळी उतरवण्यासाठी का आला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याच्या मोबाईलवरही संपर्क होत नव्हता. मात्र त्यावेळी कोणताही गंभीर संशय आला नव्हता, असे डिझोझा यांनी सांगितले.
झुआरी नदीत सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आगशी पोलिसांनी मच्छिमारांकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी संबंधित मृतदेह मंजुनाथ हरिकांत याचाच असल्याचे स्पष्ट झाले.

हा संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद असल्याचे सांगत जुझे फिलिप डिसोझा म्हणाले की, समुद्रात असताना मंजुनाथवर हल्ला करून त्याचा मृतदेह पाण्यात फेकण्यात आला असावा, असा आमचा संशय आहे. मात्र यामागील सत्य सखोल तपासानंतरच समोर येऊ शकेल.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीनंतर हा मृत्यू अपघाती होता की त्यामागे गुन्हेगारी कारण होते, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.