>> दहशतवादी हल्ल्यांच्या मुद्द्यावरून लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल; भाषणादरम्यान विरोधकांकडून गोंधळ
2014 च्या पूर्वी वाटेल तेव्हा आणि वाटेल तिथे दहशतवादी हल्ला करू शकत होते. 2014 च्या पूर्वी निर्दोष लोक मारले जात होते. भारतातील कानाकोपऱ्याला टार्गेट केले जात होते, तेव्हाचे सरकार गपचूप बसायचे. तोंड सुद्धा उघडत नव्हते. 2014 नंतरचा भारत दहशतवाद्यांना घरात घुसून मारतो. आताचा भारत सर्जिकल स्ट्राईक करतो, एअर स्ट्राईक करतो. दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचे सामर्थ्यही भारताने दाखवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल लोकसभेत म्हणाले. नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेत तुफान चर्चा झडत आहेत. राहुल गांधींचे भाषण प्रचंड चर्चेत राहिले. त्यानंतर काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर नरेंद्र मोदींचे भाषण झाले. मोदी सभागृहात येताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. तसेच, मोदींनी भाषणाला सुरुवात करताच विरोधकांचा गोंधळ वाढू लागला. हा गोंधळ इतका होता की मोदींना दोन वेळा भाषण अर्धवट सोडून खाली बसावे लागले.
आता देशातील प्रत्येक नागरिक जाणतो की, आपल्या सुरक्षेसाठी भारत काहीही करू शकतो. कलम 370 ला व्होट बँकेचे शस्त्र बनवण्यात आले. कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमधील लोकांचे अधिकार गेले होते. भारताचे संविधान जम्मू-काश्मीरच्या सीमेमध्ये प्रवेश करू शकत नव्हते. हे संविधान डोक्यावर ठेऊन नाचणारे लोक जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू करण्याचे धैर्य दाखवत नव्हते. ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत होते. कलम 370 चा काळ होता, तेव्हा सीमेवर दगड मारण्यात येत होते. आता कलम 370 ची भिंत कोसळली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदींकडून राहुल गांधींची फिरकी
2024 च्या निवडणुकीने काँग्रेसलाही जनादेश मिळाला. हा जनादेश आहे की तुम्ही विरोधातच बसा. काँग्रेसच्या इतिहासात सलग तीनवेळा काँग्रेस पक्ष 100 जागाही जिंकू शकलेला नाही, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. मला आज एक किस्सा आठवतो आहे, 99 गुण मिळालेला एक मुलगा अहंकारात फिरत होता. सगळ्यांना सांगत होता की बघा किती छान गुण मिळाले. लोकांनाही कौतुक वाटत होते. तेवढ्यात त्याचे शिक्षक आले त्या मुलाला विचारले काय रे मिठाई कसली वाटतोस? तू 100 पैकी 99 नाही मिळवलेत, 543 पैकी 99 मिळवले आहेस. बालबुद्धी माणसाला कोण सांगणार? तू अपयशी होण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींची फिरकी घेतली.