भारत सरकार या महिन्याच्या अखेरील 14 वर्षांच्या मुलींसाठी विशेष ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरी ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स ऑन इम्युनायझेशनने केलेल्या शिफारसीप्रमाणे सरकारने एकच डोस देण्याची पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या पहिल्या 90 दिवसांमध्ये जन्म तारखेनुसार 14 वर्ष वय पूर्ण असलेल्या मुलींना सरकारी आरोग्य केंद्रांवर ही लस घेता येईल. तसेच 14 वर्ष वय असलेल्या मुली त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी ‘यू-विन’ पोर्टलवरून स्लॉट बुक करू शकतील. ही प्रक्रिया कोरोना महामारीच्या काळात कोविन पोर्टलवर करावी लागत होती अगदी तशीच असेल. दरवर्षी वयाची 14 वर्ष पूर्ण करणाऱ्या 1.15 कोटी मुली या एचपीव्ही लस घेण्यासाठी पात्र असतील.