जुने गोवे बगलरस्त्यावर 23 फेब्रुवारीला मध्यरात्री मारुती व्हॅन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या महिलेचे गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना काल निधन झाले. मारुती व्हॅन आणि हिरो मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलवर मागे बसलेली मालतीदेवी चौहान (51, रा. खांडोळा, मूळ उत्तरप्रदेश) ही महिला गंभीर जखमी झाली होती. तसेच दुचाकी चालविणारा तिचा मुलगा जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या मालतीदेवी हिला उपचाराकरिता बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे इस्पितळात उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. जुने गोवे पोलिसांनी व्हॅन चालक पंकज इक्का (रा. डोंगरी, मूळ छत्तीसगड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.