प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांची गोवा प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाली. त्याला काल 100 दिवस पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर आमचे पणजी प्रतिनिधी बबन भगत यांनी घेतलेली त्यांची मुलाखत.
प्रश्न ः गेल्या 100 दिवसांत भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने काय काम केले?
उत्तर ः गेल्या 100 दिवसांत म्हणजेच प्रदेशाध्यक्षपदाचा मुकूट डोक्यावर चढवल्यापासून एकही दिवस मी सुट्टी घेतली नाही. रोज 12 ते 15 तास काम केले. या काळात संपूर्ण गोवाभर फिरलो. तब्बल 13 हजार 665 कि. मी. एवढा प्रवास केला.
प्रश्न ः त्या काळात पक्षासाठी कोणती महत्वाची कामे केली?
उत्तर ः या 100 दिवसांच्या काळात गोवाभरात मी 12 मेळावे घेतले. त्या शिवाय पक्षापासून दूर गेलेल्या काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. जुन्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. पक्षापासून दूर गेलेल्या व दुखावलेल्या नेत्यांशी चर्चा केली. पक्षाविषयी त्यांच्या काय भावना आहेत त्या समजून घेतल्या. काही आमदार व मंत्री यांच्यामध्ये तणावाचे वातावरण होते. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या आमदार-मंत्र्यांशी बोललो. त्यामुळे त्यांच्यात असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली. काही मंत्री परस्पर दिल्लीला जाऊन केंद्रीय नेत्यांच्या भेटी घ्यायचे. प्रदेशाध्यक्ष व मुख्ममंत्र्यांना कल्पना न देता कुणीही दिल्लीत जाऊन नेत्यांना भेटू नये, प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांना सांगण्याचे काम मी कर्तव्य भावनेने केले.
प्रश्न ः भंडारी समाजात तणावाचे वातावरण आहे. भंडारी समाजात फूट पडली आहे. त्यांच्या काही राजकीय मागण्याही आहेत. त्याविषयी काय सांगाल?
उत्तर ः भंडारी समाजात तणावाचे वातावरण आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्याकडे सत्ताधारी भाजपचे लक्षही आहे. आम्ही आम्ही त्यांच्या प्रश्नांंत लक्ष घालून त्यांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही करणे शक्य आहे ते करणार आहोत.
प्रश्न ः देवदर्शन, आध्यात्मिक नेत्यांच्या तुम्ही घेतलेल्या गाठीभेटी याविषयी काय सांगाल?
उत्तर ः होय! मी देवदर्शनासाठी वेळ दिला. मी देवभक्त आहे. देवावर माझी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटीच जी देवदर्शनाला जात असतो. त्याशिवाय मी स्वामी, तसेच हिंदू व ख्रिस्ती धर्मियांच्याही भेटी घेतल्या. आर्च बिशपनाही भेटलो. सगळ्या लोकांना भेटण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून खूप काही शिकता येते. त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेतले की बऱ्याच गोष्टी कळू शकतात. या समाजात विविध घटक आहेत. सगळ्यांना भेटायला मला आवडते. शेवटी सगळे लोक हे आपलेच आहेत. त्यामुळे मी समाजातील सर्व थरातील लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देतो आणि यापुढेही देत राहणार आहे.