८७ पोलीस उपनिरीक्षकांनी ताबा स्वीकारला

0
77

गेल्या वर्षी भरती करण्यात आल्यानंतर एका वर्षांच्या प्रशिक्षणासाठी गुजरातला पाठवण्यात आलेले सर्व ८७ पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण पूर्ण करून गोव्यात परतल्यानंतर काल त्यांची राज्यातील विविध पोलीस स्थानकावर नेमणूक करण्यात आली. या सर्व उपनिरीक्षकांची प्रोबेशनवर नेमणूक करण्यात आलेली आहे. राज्यात पोलिसांचा आकडा आवश्यकतेपेक्षा कमी असल्याचे आढळून आल्यानंतर तात्कालीन गृहमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पोलीस खात्यात मोठ्या संख्येने भरती करण्याचे काम हाती घेतले होते. उपनिरीक्षकांबरोबरच पोलीस शिपायांचीही मोठ्या संख्येने भरती करण्यात आली होती.आता नव्याने शिपायांच्या जागा भरण्यासाठीही मुलाखती घेण्याचे काम चालू आहे.
दरम्यान, सध्या गोव्यात चोर्‍या व अन्य गुन्हेगारी कृत्ये वाढीस लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस खात्याने राज्यात रात्रीची गस्त वाढवण्यावर तसेच सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिलेला आहे. महामार्गावरील गस्तीची जबाबदारी ‘हाय वे पेट्रोल’ पोलिसांवर आहे. शिवाय किनारी पोलीस, समुद्री पोलीस यांनाही कधी नव्हे एवढे सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
येत्या १४ रोजीपासून राज्यात सेंट फ्रान्सिस झेव्हियर शवप्रदर्शन सोहळा सुरू होत असून २० नोव्हेंबरपासून इफ्फी सुरू होत आहे. शिवाय पर्यटन मोसम यापूर्वीच सुरू झालेले आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असल्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.