नव्या ‘आयुष’ खात्याचे श्रीपाद पहिले मंत्री

0
106

खासदार नाईक यांची खाती बदलली
संयुक्त राष्ट्रसंघात जागतिक योग दिवस साजरा करण्याची गरज असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूनोच्या परिषदेत सांगितले होते, अमेरिका; चीनसह ५० देशांनी त्यांच्या वक्तव्यास पाठिंबाही दर्शविला होता. दरम्यान, आता नरेंद्र मोदी यांनी योग,आयुर्वेद आदींचा समावेश असलेले नवे ‘आयुष’ खातेच स्थापन केले असून त्याचे पहिले मंत्री म्हणून उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना नियुक्त केले आहे.आयूष खात्यात – आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, यूनानी, सिद्ध आणि होमियोपॅथी – या प्राचीन भारतीय पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. श्रीपाद नाईक हे राज्य मंत्री (स्वतंत्र कारभार) म्हणून हे खाते हाताळणार आहेत. हे खाते पूर्वी आरोग्य खात्यात समाविष्ट होते.
दरम्यान, परवाच्या विस्तारानंतर केलेल्या खातेवाटपावेळी श्रीपाद नाईक यांच्याकडे असलेले पर्यटन व संस्कृती हे खाते बदलून ‘आयुष’ तसेच परिवार कल्याण ही खाती देण्यात आली आहेत.
पंतप्रधान मोदी हे स्वत: प्रत्येक दिवस योग सत्राने सुरू करतात. सप्टेंबरमध्ये अमेरिका दौर्‍यावर असताना प्राचीन भारतीय उपचार पद्धतींचा मोदींनी पुन्हा पुन्हा उल्लेख केला होता. योगाद्वारे जीवनशैली विकसित करून हवामान बदलांशीही मुकाबला शक्य असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर भारत दौर्‍यावर आलेल्या ऑस्टेलियाचे पंतप्रधान टोनी अबोट यांनी प्राचीन भारतीय उपचार पद्धतींत रूची दाखवली होती.