७०४ वाहन चालकांचे परवाने गेल्या नऊ महिन्यांत निलंबित

0
136

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बेशिस्त वाहतूक प्रकरणी गेल्या तीन महिन्यांत २७२ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत नऊ महिन्यांमध्ये ७०४ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक खात्याचे उपसंचालक प्रकाश आझावेदो यांनी काल दिली.

१ जानेवारी ते ३१ मार्च २०१७ या तीन महिन्यांत १९२ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. १ एप्रिल ते ३० जून या काळात २४० तर १ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात २७२ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, असे आझावेदो यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने वाहन अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची सूचना करण्यात आली आहे.

पोलीस खात्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईसाठी वाहतूक खात्याकडे अर्ज सादर केला जातो. दर तीन महिन्यांनी वाहतूक खात्याला सर्वोच्च न्यायालयाला कारवाईबाबत अहवाल सादर करावा लागतो. वाहतूक उल्लंघन प्रकरणी निलंबित केलेले परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित राहतात, असेही आझावेदो यांनी सांगितले. वाहन चालविण्याचा परवाना आणि आरसी बुक चोवीस तासांत घरपोच देण्याची योजना टपाल खात्याच्या आधुनिकीकरणाच्या कामामुळे कोलमडली आहे. टपाल खात्याने गेल्या चार दिवसांपासून परवाने आणि आरसी बुक घरपोच देण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. वाहननोंदणी कागदपत्रे सादर करण्यात येणार्‍या पत्त्यावर आरसीबूक किंवा वाहन चालविण्याचा परवाना पाठविण्यात येतो. वाहतूक खात्याकडे नोंद असलेल्या पत्त्यांवर वाहन मालक राहत नसल्यास टपाल खात्याकडून आरसीबूक पुन्हा संबंधित वाहतूक कार्यालयाकडे पाठविले जाते, असेही आझावेदो यांनी सांगितले.