६३ बळींसह गुरुवारी २४९१ बाधित

0
125

राज्यात गेल्या चोवीस तासांत उच्चांकी ६३ रुग्णांचा बळी आणि नवे २४९१ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या १९३७ एवढी झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजार ९५३ झाली आहे.
राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३५.१६ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत इस्पितळांमधून २०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नवे २४९१ रुग्ण
राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. आता, पॉझिटिव्हीटी दर ३५.१६ टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी पॉझिटिव्हीटी दर ४० टक्क्यांपेक्षा जास्त होता. चोवीस तासांत नवे २४९१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या ७०८४ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आला. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३० हजार १३० एवढी झाली आहे.

मडगाव, कांदोळीत सर्वाधिक रुग्ण
मडगावबरोबर राजधानी पणजी, कांदोळी, फोंडा, पर्वरी, म्हापसा या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मडगावातील रुग्णसंख्या २४९९, पणजी १८२७, कांदोळीत १८८४, पर्वरी १६६८, म्हापसा १५०७ , फोंडा १७८२, कुठ्ठाळी १४२५, साखळी १४७३, पेडणे १२९०, वाळपई १०१८, शिवोली ११६३, चिंबल १३०६ तर कासावली येथे १०१७ रुग्ण आहेत.

२४ तासांत २४८ इस्पितळात
गेल्या चोवीस तासांत नवीन २४८ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. मागील कित्येक दिवसांपासून इस्पितळात दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

२२६६ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधित आणखी २२६६ रुग्ण काल बरे झाले आहेत. राज्यात कोरोना बाधेतून बरे होणार्‍या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ९५ हजार २४० एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.१९ टक्के एवढे आहे. २२४३ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.

चोवीस तासांत ६३ मृत्यू
राज्यात मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. गुरूवारी आणखी ६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मंगळवारी ७५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर, बुधवारी आणखी ७० कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली.