Home Featured गोमेकॉतील प्राणवायू पुरवठाप्रकरणी सरकारकडून चौकशी समिती नियुक्त

गोमेकॉतील प्राणवायू पुरवठाप्रकरणी सरकारकडून चौकशी समिती नियुक्त

0

>> तीन दिवसांत अहवाल देण्याची सूचना

राज्य सरकारने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील (गोमेकॉ) प्राणवायू पुरवठा प्रश्‍नी चौकशीसाठी आयआयटीचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी समितीची काल नियुक्ती केली. या समितीला तीन दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
या समितीमध्ये गोमेकॉचे माजी डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल, सरकारचे सचिव डॉ. तारीक थॉमस (आयएएस) यांचा समावेश आहे. आरोग्य सचिवांनी या समितीला अहवाल लवकर तयार करण्यासाठी साहाय्य करण्याची सूचना करण्यात आली आहे.

गोमेकॉतील प्राणवायू पुरवठ्याचा प्रश्‍न न्यायालयात पोहोचला आहे. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य सचिवांनी गोमेकॉमध्ये प्राणवायूची कमतरता असल्याची कबुली दिली आहे.

सरकारने नियुक्त केलेल्या समितीने गोमेकॉला पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होतो का, प्राणवायू पुरवठ्याची साखळी, प्राणवायू देण्याची प्रक्रिया तसेच सुधारण्यासाठी आवश्यक सूचना तसेच जीएमसीतील प्राणवायू पुरवठ्यात सुधारणांबाबत समितीने सूचना कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे.

गोव्याला रोज एक टँकर
प्राणवायू पाठवणार ः गडकरी

गोव्यातील प्राणवायूची वाढती मागणी लक्षात घेऊन गोव्याला रोज एक टँकर प्राणवायू पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी प्राणवायूच्या विषयावर चर्चा करण्यात आली असल्याचे गडकरी म्हणाले.

१८-४४ वयोगटाचे लसीकरण
१५ मेपासून सुरू ः मुख्यमंत्री

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला येत्या १५ मेपासून प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. या वयोगटातील नागरिकांना सरकारच्या ३५ कोरोना लसीकरण केंद्रांतून लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी नागरिकांनी कोवीन पोर्टलवर नोंदणी करावी, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.