६० वर्षांवरील व्यक्तींना मार्चपासून कोविड लस

0
187

>> केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती, ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही गरजेनुसार लस देणार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने सरकारने आता १ मार्चपासन ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ४५ वर्षांहून अधिक वय झालेल्या व ज्यांना इतर आजार आहेत अशा व्यक्तींनाही लस देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडकर यांनी काल दिली.
काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय झाला असल्याचे या बैठकीनंतर बोलताना जावडेकर म्हणाले. ही लस फक्त सरकारी केंद्रांवरच मोफत दिली जाईल. तर खासगी इस्पितळांमध्ये मात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. ही फी किती असेल, याचा निर्णय एक-दोन दिवसात घेण्यात येईल असे जावडेकर म्हणाले. या लसीकरणात सुमारे १० कोटी नागरिकांना डोस दिला जाईल. लसीकरण मोहीमेत १०,००० सरकारी केंद्रांवर लस दिली जाईल, असे जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

काल केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये ६० वर्षांमवरील नागरिकांना कोरोना लस देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. आता १ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या (ज्यांना इतर कुठले आजार आहेत) अशा नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू होईल. सरकारी केंद्रांवर लस मोफत दिली जाईल. पण खासगी इस्पितळात शुल्क आकारण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले असून हे शुल्क आरोग्य मंत्रालयद्वारे ठरवण्यात येईल असे जावडेकर यांनी सांगितले.

१ कोटी ७ लाख जणांना लस
आतापर्यंत १,०७,६७००० नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर १४ लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १ मार्चपासून ६० वर्षांपेक्षा अधिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना ज्यांना इतर आजार आहे त्यांना सरकारी केंद्रांवर आणि खासगी इस्पितळांमध्ये लस दिली जाईल, असे जावडेकर म्हणाले.

दक्षिण गोव्यात उद्यापासून लसीकरण
दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकार्‍यांनी दक्षिण गोवा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोविड-१९ योद्ध्यांसाठी उद्या दि. २६ आणि २७ फेब्रुवारी २०२१ रोजी लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. सासष्टी तालुक्यासाठी लसीकरण मडगाव येथील नवीन हॉस्पिसियो इस्पितळाच्या पहिल्या मजल्यावर लसीकरण केंद्र क्र. १ मध्ये तर मुरगांव तालुक्यासाठी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळ लसीकरण केंद्र क्र. १, फोंडा येथे राजीव कलामंदिर येथे, केपे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, काणकोण येथे सामाजिक आरोग्य केंद्रात, धारबांदोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि सांगे येथील नगरपालिका सभागृहात लसीकरण होईल.

उत्तर गोव्यात प्रारंभ
दरम्यान, उत्तर गोव्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोविड योद्ध्यांसाठी काल दि. २४ पासून लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. ही मोहीम उत्तर गोव्यात २८ फेब्रुवारीपर्यंत राबवली जाईल. डिचोली तालुक्यात केशव सेवा साधना, सर्वण येथे २६ फेब्रुवारी रोजी लस देण्यात येईल. बार्देश महालातील पेडे क्रीडा प्रकल्प म्हापसा, गोवा क्रीडा प्राधिकरण पेडे, विद्या प्रबोधिनी हायस्कूल, पर्वरी आणि सेंट झेवियर हायस्कूल, शिवोली येथे २५, २६ आणि २७ या दिवसांमध्ये लसीकरण होील. तिसवाडी तालुक्यात खोर्ली आरोग्य केंद्रात २५ आणि २६ रोजी, दि. २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी कांपाल पणजी येथील अग्निशमन दलाच्या कचेरीत, मंडूर आरोग्य केंद्र, पोलीस मेस आल्तिनो, सांताक्रूज हायस्कूल आणि काझा दी पोवा, ताळगांव येथे दि. २५. २६, आणि २७ रोजी तर पणजी महानगरपालिका, केंद्रीय सरकारी प्राथमिक शाळा, पणजी, येथे दि. २५, २६,२७ व २८ रोजी लसीकरण होईल.
कोविन पोर्टलवर आपले नाव नोंद केलेल्या सर्व कोविड योद्ध्यांनी त्याच्या सोईनुसार आपली ओळखपत्रे दाखवून लस घ्यावी असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.