नगरपालिका आरक्षण निवाडा राखीव

0
353

>> मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी पूर्ण

गोवा नगरपालिका निवडणुकांसाठी गोवा सरकारने अधिसूचित केलेले प्रभाग आरक्षण व प्रभागांची फेररचना याला आव्हान देणार्‍या याचिकांवरील सुनावणी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पूर्ण झाली. यावेळी न्यायालयाने या याचिकांवरील निवाडा मात्र राखून ठेवला आहे.

काल गोवा सरकार तसेच राज्य निवडणूक आयोगाने सदोष अधिसूचनेवर आधारित निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतलेला असून तसे निवेदनही खंडपीठापुढे केले आहे.

पणजी महापालिकेसह उर्वरित सर्व पालिकांसंबंधी पालिका संचालकांनी जारी केलेले प्रभाग आरक्षण व प्रभाग फेररचनेची अधिसूचना ही घटनेची पायमल्ली करणारी असल्याची कबुली निवडणूक आयोगाने दिलेली असतानाही सरकारने अधिसूचनेत कोणत्याही प्रकारचा बदल करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
सरकारच्या अधिसूचनेनुसार आम्ही पणजी महापालिका व उर्वरित नगरपालिकांच्या निवडणुका घडवून आणणार असल्याचे आयोगाचे वकील एस. एन. जोशी यांनी खंडपीठाला सांगितले. याचाच अर्थ राज्य सरकार अधिसूचना दुरूस्त करायला तयार नाही. तसेच ती अधिसूचना सदोष आहे याची जाणीव असूनही निवडणूक आयोग त्या अधिसूचनेवर आधारित निवडणूक प्रक्रिया पुढे नेणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे न्यायमूर्ती महेश सोनक व भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने आयोगाला करून दिली.

पणजी पालिका निवडणुकीसाठीही मतदारसंघ फेररचनेत आणि आरक्षण धोरणात बेकायदेशीरपणा असल्याचा दावा करणारी आणखीही एक याचिका मंगळवारी खंडपीठासमोर आली होती. त्यावरही काल बुधवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने निवाडा राखून ठेवलेला आहे.

पणजीत फुर्तादोंचे पॅनल
पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पणजी महानगरपालिका निवडणुकीत स्वतःचे पॅनल उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘वुई पणजीकार’ असे या पॅनलला नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फुर्तादो हे या पॅनेल निमंत्रक असतील. निवडणुकीत फुर्तादो यांचा प्रभाग आरक्षित बनवल्याच्या पार्श्‍वभूमीवर फुर्तादो यांनी आपले स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.