३३७ नवे रुग्ण; दिवसभरात ५ मृत्यू

0
140

>> रविवार ठरला घातवार : मृतांची एकूण संख्या ५३

राज्यात मागील चार दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत असून रविवार हा घातवार ठरला आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेणार्‍या ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २९ जुलैपासून सलग पाच दिवसांत १७ जणांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या ५३ झाली आहे. पाच मृतांमध्ये वास्कोतील ४ रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोविड इस्पितळामध्ये सकाळी हेडलॅण्ड सडा, वास्को येथील ७२ वर्षीय रुग्ण, जुवारी नगरातील ५४ वर्षीय रुग्ण आणि बायणा वास्को येथील ४५ वर्षीय रुग्णाचे निधन झाले. तर, दुपारी नवेवाडा, वास्को येथील ७२ वर्षीय महिला रुग्ण आणि दुर्भाट, फोंडा येथील ५४ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले. या पाचही रुग्णांचा को-मोर्बिडमुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

४२ दिवसांत ५३ जणांचा बळी
राज्यात कोरोना विषाणूने ४२ दिवसांत ५३ जणांचा बळी घेतला आहे. राज्यात २२ जूनला पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली. त्यानंतर कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रकार सुरू आहेत. मडगाव येथील कोविड इस्पितळात रविवारी एकाच दिवशी पाच जणांचा बळी गेला आहे. कोरोना बळींमध्ये वास्कोतील सर्वाधिक २८ जणांचा समावेश आहे. मडगावातील ६, म्हापसा परिसरातील ३, फातोर्डा, साखळी, चिंबल, सत्तरी येथील प्रत्येकी २ जणांचा त्यात समावेश आहे. तर बेती, वेळसाव, चोडण, पर्वरी, काणकोण, कुडतरी, ताळगाव, दुर्भाट येथील प्रत्येकी एका बळीचा समावेश आहे.

पाच दिवसांत १७ बळी
राज्यात मागील पाच दिवसांत कोरोनाने १७ जणांचा बळी घेतला आहे. २९ जुलैला ३ बळी, ३० जुलैला ३ बळी, ३१ जुलैला ३ बळींची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यच्या पहिल्या दोन दिवसांत आठ बळींची नोंद झाली आहे. मागील जुलै महिन्यात कोरोनाच्या ४१ बळींची नोंद झाली आहे. तर, जून महिन्यात ४ बळींची नोंद झाली होती.

राज्यात जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात साडे तीन पट जास्त कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. जुलैनंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जुलै महिन्यात नवीन ४५९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जून महिन्यात कोरोनाचे १२४४ रुग्ण आढळून आले होते.
जुलै महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात ३६१५ रुग्ण बरे झाले आहेत. जून महिन्यात ५५२ रुग्ण बरे झाले होते.

भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) गोवा शाखेने तीन ठिकाणी पेड क्वारंटाइनची सुविधा उपलब्ध केली आहे. कोलवा येथे डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय आणि आरोग्य कर्मचार्‍यांसाठी पेड क्वारंटाइन सुविधा उपलब्ध केली आहे. तर, कोविड रुग्णांसाठी दक्षिण गोव्यात उतोर्डा आणि उत्तर गोव्यात सांगोल्डा येथे पेड क्वारंटाइन सुविधा उपलब्ध केली आहे. कोलवा येथे १७ रुग्ण आणि सांगोल्डा येथे १५ रुग्णांना ठेवण्यात आले आहे. हे रुग्ण टेलिफोनवरून आयएमएच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. आयएमएच्या सदस्यांनी शिफारस केलेल्यांना पेड क्वारंटाइन सुविधेमध्ये ठेवले जात आहे.

प्लाझ्मा उपचारांस प्रारंभ
राज्यात आता प्लाज्मा उपचार पद्धतीस सरकारने प्रारंभ केला असून कोरोनाच्या दोन रुग्णांना प्लाझ्मा रक्तद्रव्य देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

कोविड इस्पितळात कर्मचार्‍यांची वानवा
मडगाव कोविड इस्पितळात डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांची संख्या अगदी कमी आहे व येथे काम करणार्‍या सर्वांवर २४ तास आणि शांतपणे काम करावे लागते. या इस्पितळात १७५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत. अपुर्‍या कर्मचारी वर्गामुळे रुग्णांवर लक्ष दिले जात नाही. एका रुग्णाने इस्पितळातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण स्थानिकांनी हे इस्पितळाच्या निदर्शनास आणून दिले. पळून जाणारा हा दुसरा रुग्ण होता.

फोंडा तालुक्यात पहिला कोरोनाचा बळी
दुर्भाट-आडपई-आगापूर पंचायत क्षेत्रातील आगापूर येथील एक ५६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याने या भागात खळबळ उडाली आहे. फोंडा तालुक्यातील पहिला कोरोनाचा बळी आडपईतील व्यक्ती ठरली असून तालुक्यातील कोरोनाचे पहिले स्थानिक संक्रमणही आडपईतूनच झाले होते. दरम्यान, आडपईतील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून दहा रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने येथील लोकांना तेवढाच दिलासा मिळाला आहे.

राज्यात आत्तापर्यंत एकूण ६५३० कोरोनाचे रुग्ण
राज्यात नवीन ३३७ रुग्ण आढळून आले असून आत्तापर्यंतची ही सर्वांत जास्त पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. राज्यातील सध्याची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८०९ झाली आहे. राज्यातील २३० कोरोना रुग्ण बरे झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण ६५३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ४६६८ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.
बांबोळी येथील जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात ५४ कोरोना संशयितांना काल दाखल करण्यात आले आहे. कोरोना संशयित म्हणून आत्तापर्यंत १६८५ जणांवर उपचार करण्यात आले आहेत.
आरोग्य खात्याने कोविड प्रयोगशाळेत १५६५ स्वॅबचे नमुने पाठविले. प्रयोगशाळेतून २५७४ नमुन्यांचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात ३३७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. प्रयोगशाळेत १९५१ स्वॅबचे नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात आत्तापर्यंत १ लाख ३२ हजार ४४४० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात ६५३० नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील स्वॅबची तपासणीची गती मागील काही दिवसांत कमी झाली होती. त्यामुळे प्रयोगशाळेत स्वॅबचे नमुने तपासणीविना राहत होते.

पणजीत नवे २ रुग्ण
पणजी शहर आरोग्य केंद्राच्या कक्षेत नवे २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पणजी शहरातील एका अपार्टमेंटमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. तर फोंडवे, रायबंदर येथे आणखी १ रुग्ण आढळला आहे.