२ ऑक्टोबरनंतर भाजप सरकारला राजकीय पर्याय

0
111

>> भाभासुमंच्या धारबांदोड्यातील सभेत वेलिंगकर यांचा इशारा

 

निवडणूक जाहीरनाम्यातील आश्‍वासनाची पूर्तता न केलेल्या भाजप सरकारला भाभासुमंतर्फे दि. २ ऑक्टोबरनंतर व्यवस्थित राजकीय पर्याय देणार असल्याचा इशार भाभासुमंचे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी काल धारबांदोडा येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत दिला. मातृभाषेंचा भाजपने सौदा केल्याचा पुनर्रुच्चार केला.

यावेळी व्यासपीठावर अरविंद भाटीकर, ऍड. उदय भेंब्रे, ऍड. स्वाती केरकर, पांडुरंग नाडकर्णी, नागेश करमली, फादर मौजीन आंताईद, किर्लपालचे सरपंच दीपक पाऊसकर, धारबांदोडयाचे सरपंच बालाजी गावस, रिमा नाईक, गोविंद सावंत, तुळशीदास लाड, सुकांती गावकर, रमाकांत गावकर, भोला गांवकर, आनंद शिरोडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मगोने युती त्वरित तोडावी
निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले. मगो पक्षाने भाभासुमंला पाठिंबा दिला असला तरी मगोने दुषित झालेली युती तोडण्याविषयी अजून विचार केलेला दिसत नाही. मगोने युती त्वरित तोडावी अशी मागणी भाभासुमंच करीत असल्याचे प्रा. वेलींगकर यांनी सांगितले.
गोव्याचा इतिहास सत्ताधारी आमदारांना माहीत नाही. पोर्तुगीजांच्या धोरणाचा अवलंब विद्यमान भाजप सरकार करीत असून निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी जनतेचे रक्षण करणे हे कर्तव्य असल्याचाही त्यांना विसर पडला आहे. अशा सरकारला येत्या निवडणुकीत घरी पाठविण्याची वेळ आली असल्याचे उदय भेंब्रे यांनी सांगितले.
अंमली पदार्थ, प्रादेशिक आराखडा, कॅसिनो सारखे विषय हाताळण्यात यूटर्न घेणार्‍या भाजप सरकारला अपयश आले आहे. एक व्यक्ती एका राजकीय पक्षाला सत्तेवर आणू शकतो तीच व्यक्ती त्या राजकीय पक्षाला संपवू शकते. याची जाणीव भाजपाला असणे गरजेचे असल्याचे अरविंद भाटीकर यांनी सांगितले.
नागेश करमली याना इंग्रजीला दिलेल्या अनुदानामुळे एक दिवस बहुसंख्याकांच्या शाळा बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली. ऍड. स्वाती केरकर, पांडुरंग नाडकर्णी, फादर मौजिन आंताईद व आनंद शिरोडकर यांनीही यावेळी आपले विचार मांडले. अशोक नाईक यांनी स्वागत तर दीपक पाऊसकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र नाईक यांनी केले.