पुन्हा एकदा बोरकरांची पर्जन्यसूक्ते

0
280

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

नेहमीची सृष्टी ही अद्भुताची सृष्टी बनविणारी ही कविप्रतिभेची किमया… तिने अक्षय आनंदाची कुपी आपल्यासाठी कायमची साठवून ठेवली आहे. कधीही लागेल तेव्हा उघडावी आणि पंचेद्रियांना सुखविणारा तिच्यातील आशय मनसोक्त सेवन करावा…

यंदाचे मृगनक्षत्र कोरडे गेले अन् सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. यंदा पाऊस उशिरा आला खरा, पण त्याने एकदा झड लावली आणि आपल्या पूर्ववैभवाची आठवण करून दिली. ‘‘बालपणीच्या पावसाची काय मजा यायची… मुसळधार पाऊस पडायचा… तीन-चार दिवस सूर्यदर्शन होत नव्हते… वृक्षवेली ओल्याचिंब… रान ओलेचिंब… तनमन ओलेेचिंब!’’ अशा आठवणींचा रवंथ करीत माणसे उसासे टाकायची… पण यंदा मात्र पर्यावरणीय अंदाज चुकवून आसमंत चिंब चिंब भिजविणारा… बाहेर पडायला संकोच करायला लावणारा पाऊस निथळू लागला… गोमंतभूमीतील निसर्गाचे वैभवच निराळे. या पाचूच्या प्रदेशाचे वैभव पर्जन्यकालात अधिक खुलते. नुकताच मये तलावाकडून चोडणमार्गे प्रवास करण्याचा योग आला… मध्ये कावळीचे रान लागते. या हिरवाईच्या पट्‌ट्यात हिरवाईशिवाय दुसरे काही नव्हते. वर आकाशाचा निरुंद निळा पट्टा आणि धरतीतलावर हिरवेगार… घनदाट जंगल आणि वरून कोसळणार्‍या सरळसोट जलधारा… त्यांना कुठे थाराच नव्हता. अशावेळी संवेदनक्षम वयापासून वाचलेली… तनामनाला आल्हाद देणारी कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांची पर्जन्यसूक्ते आठवली… फेर धरून मनाभोवती नाचायला लागली. नेहमीची सृष्टी ही अद्भुताची सृष्टी बनविणारी ही कविप्रतिभेची किमया… तिने अक्षय आनंदाची कुपी आपल्यासाठी कायमची साठवून ठेवली आहे. कधीही लागेल तेव्हा उघडावी आणि पंचेद्रियांना सुखविणारा तिच्यातील आशय मनसोक्त सेवन करावा… त्याबरोबरच अभिव्यक्तीच्या आनंदाच्या लडीमागून लडी निर्माण होतील… निर्मितिशीलतेचा अपूर्व आनंद आणि तिच्या मोकळ्या झालेल्या अनंत वाटा या पर्जन्यसूक्तांत आहेत… त्या मनाला मुक्त करतात. व्यावहारिकतेच्या सर्व मर्यादा उल्लंघून अपार्थिवतेच्या नंदनवनात नेणारी कवितेची वाट आनंदयात्री बोरकरांनी निर्माण केली. रसप्रसन्नतेचा कल्लोळ अंतर्मनात निर्माण केला… याबद्दल त्यांना आपण नित्य स्मरत राहू.

बा. भ. बोरकरांच्या तोंडून अनेकदा ऐकायला मिळालेली आणि आजही ती एकान्तात वाचताना अपूर्व आनंद देणारी ‘सरिंवर सरी आल्या ग’ ही कविता प्रथमतः डोळ्यांसमोर येते. सप्तस्वरांची मनोहारी गुंफण सहजतेने जमून आलेली ही कविता.
घनामनांतुन टाळ-मृदंग
तनूंत वाजवि चाळ अनंग
पाने पिटिती टाळ्या ग
सरिंवर सरी आल्या ग
या ओळींची लय मनात भिनत असताना समोरच्या पावसाची नयनमनोहर रूपं नाचायला लागतात… मनाच्या तारेवर संगीताचे स्वर उमटतात आणि बोरकरांच्या याच कवितेतील पुढच्या ओळी आठवायला लागतात ः
मल्हाराची जळात धून
वीज नाचते अधुनमधून
वनांत गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदीं थिजून
घुमतो पांवा सांग कुठून
बोरकरांची पर्जन्यसूक्ते अनेक असली तरी त्यांतील अल्पाक्षररमणीय असलेली ‘क्षितिजीं आलें भरतें ग’ ही कविता मला फार आवडते.
क्षितिजीं आलें भरतें ग| घनांत कुंकुम खिरतें ग|
झालें अंबर| झुलतें झुंबर| हवेत अत्तर तरतें ग|
या स्वप्नतरल वातावरणात मन हिंदोळ्यावर झेके घेत असतानाच आनंद द्विगुणित करणार्‍या पुढील ओळी येतात ः
लाजण झाली धरती ग| साजण कांठावरती ग|
उन्हांत पान| मनांत गान| ओलावुन थरथरतें ग|
मनुष्यमात्राच्या आणि अन्य प्राणिमात्रांच्या गात्रागात्रांना सुखविणार्‍या संवेदनांचे चित्रमय शैलीत वर्णन करणार्‍या या प्रतिभावंतासमोर आपण नतमस्तक होतो.
‘झालें हवेचेंच दहीं’ या कवितेत बोरकरांनी आपली पर्जन्यानुभूती आगळ्या-वेगळ्या शब्दांत टिपली आहे. हवेचेच दही झालेले आहे… माती लोण्याहून मऊ झालेली आहे. पाणी होऊन दूध चहूंकडे धावू लागले आहे… आज जगाचे गोकुळ झालेले आहे… आज यमुना पांढरी झाली आहे… कालियाच्या उरी कृष्णाची बासरी घुमते आहे… स्वैर वाट चुकून खुळ्या दिशा हंबरताहेत… धारानृत्यात भोवळून वेळा वेड्यापिशा झाल्या आहेत… आज समुद्राच्या पोटात प्रसवाचा शंख वाजत आहे… पुन्हा एकदा पर्वताचे तुटलेले पंख पालवत आहेत. निळ्या आकाशाची गाय लक्ष आचळांनी दुभते आहे. भिजणार्‍या तृप्तीवर संतोषाची साय दाटलेली आहे… झुरूमुरू झुरूमुरू धारा झरू लागलेल्या आहेत… हरपलेले होते ते हळूच अंकुरू पाहतेय.
– सृजनशीलतेच्या सार्‍या शक्यता जिथे सामावलेल्या आहेत ती ही पर्जन्यानुभूती… तिच्या कोमल, तरल, ओल्या अंगांगांचे चित्र बोरकरांनी येथे तन्मयतेने रंगवलेले आहे.
‘कौलारांवर लाल खेळतो’ या कवितेतील रंगानुभूतीची चित्रे अशीच विलोभनीय स्वरूपाची ः
कौलारांवर लाल खेळतो निळा निळा सखि धूर
हिरव्या तरुराजींत दाटलें काजळतें काहूर
दिशादिशांतुन आषाढाच्या श्यामघनांना पूर
तृणाप्रमाणें मनेंहि झालीं चंचल तृष्णमयूर
‘काजळतें काहूर’ आणि ‘चंचल तृष्णमयूर’ या प्रतिमा नेमकेपणाने मानसभाव प्रकट करणार्‍या आहेत. निसर्गानुभूती आणि भावानुभूती यांचे अद्वैत येथे आढळते.
‘पाऊस रात्रीं होऊन गेला’ या कवितेत पाऊस पडून गेल्यानंतरची क्षणचित्रे सूक्ष्मतेने रेखाटलेली आहेत. रानामाळांवर सोन्याचे ऊन आहे… अजून माती कोवळी ओली आहे. पानापानांतून कालचीच धून आहे… जे कवेत मावले नाही ते हवेत गंध होऊन फाकले आहे. हाडांत तापला होता तो छंद झाडाझाडांतून कापतो आहे. त्यातही निसर्गानुभूतीतून साकार केलेले प्रेमानुभूतीचे तरल भावविश्‍व मनाला आल्हाद देणारे आहे ः
कणीससें हें मोत्यांत डोले
तमांतले सखि हात्याचें प्रेम
अमृतसें हें जमून आले
ओलेत्या पात्यांत हिरवें क्षेम
बा. भ. बोरकरांच्या पर्जन्यानुभूतीच्या आविष्कारामध्ये जे पौराणिक संदर्भ येतात ते आशयाचे अभिन्न अंग होऊन येतात. त्यात सौंदर्यानुभूतीचे विभ्रम प्रकट होतात ः
जागोजाग पांगुळलें काळें कालिंदीचे पाणी
अंधाराच्या कालियाचे त्यात चमकले मणी

कानीं माझ्या वाजे वेणू प्राण घुमे रुणूझुणू
उरीं कालियाचे डोल गात्रीं हंबरती धेनू
‘घन बरवा’, ‘घन लवला रे’ व ‘घन वरसे रे’ या कवितांमधून सावळ्या घनावळीचे विभ्रम कवीने चित्रकाराच्या कौशल्याने टिपलेले आहेत. करुणाघनाच्या वर्षावामुळे एकूणच वातावरणाचे चित्र बदलून जाते. शब्दकळेच्या लयबद्ध पदन्यासामधून हे बदलते क्षण कवीने टिपलेले आहेत ः
घन बरवा घन बरवा
भिरभिरते तरल हवा
तिमिरांतुन जखमेवर
मिरमिरतो वनमरवा
घन बरवा घन बरवा
अशाच प्रकारची अनुभूती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘घन लवला रे’ या कवितेत व्यक्त झाली आहे. दृश्य तेच. भावानुभूती निराळी. आविष्कार भिन्न ः
घन लवला रे, घन लवला रे
क्षणभर श्रावण स्रवला रे
जरतारांचा फुलून मांडव
अनल जिवींचा निवला रे
चारा हिरवा हिरवा रे
वर उदकाचा शिरवा रे
मनातले सल रुजून आतां
त्याचा झाला मरवा रे
‘घन वरसे रे’मधील चित्रमय वर्णनही असेच मनाला आल्हाद देणारे आहे ः
भरुनी आले नदि-नद-नाले,
जरठ तरूहि जाहले रसाले,
द्रुमपल्लवही न्हाले धाले जणुं मोराचे परसे रे
कातळ, डोंगर हिरवळ ल्यालेले आहेत… नागांचे उष्ण श्‍वास शमलेले आहेत… मुंग्यांना पंख फुटलेले आहेत… वन नंदनवनासारखे हर्षभरित झालेले आहे.
पर्जन्यकाळ हा बा. भ. बोरकरांना असा आनंददायी ठरलेला आहे. त्याच्या सृजनाची नांदी त्यामुळेच होते आणि रसिकांनाही त्यामुळे आनंदानुभव प्राप्त होत असतो. वर्षाऋतूच्या लावण्यमहोत्सवात बोरकर स्वतः तल्लीन होतात आणि इतरांना त्यात सामावून घेतात. हिरवळ आणि पाणी त्यांना जिथे दिसते तिथे त्यांना गाणी सुचतात. जिथे जिथे उरात भूमीची माया असते, उन्हात जिथे हिरवी छाया असते, तिथे पानोपानी आनंदाचे कोमल पाझर असतात असे कवीला मनोमन वाटते. भावसमृद्धीचा प्रत्यय देणार्‍या या निसर्गाच्या कुशीत त्याच्या सृजनशीलतेचा नवा बहर येतो. नित्यनेमाने येणारा हा पाऊस… पण दरवर्षी नवीन उन्मेष तो घेऊन येत असतो. आनंददायी आणि कल्याणप्रद.