२०११मध्येही भारताकडून सर्जिकल स्ट्राईक

0
89

>> ‘द हिंदू’ : व्हिडिओ, कागदपत्रे असल्याचा दावा

 

भारतीय लष्कराने युपीए सरकारच्या काळात २०११ साली पाक व्याप्त काश्मीरात जाऊन ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून तीन पाक सैनिकांची मुंडकी सोबत आणली होती असा दावा करणारे खळबळजनक वृत्त ‘द हिंदू’ दैनिकाने दिले आहे. त्यावेळी भारताच्या सहा जवानांच्या हौतात्म्याचा सूड घेण्यासाठी ‘ऑपरेशन जिंजर’ या नावाने हे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते असे कालच्या सदर वृत्तात म्हटले आहे. ही मोहीम ४५ मिनिटे चालली व त्यात १३ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचेही वृत्तात नमूद केले आहे.
पाकिस्तान सैनिकांच्या तुकडीने ३० जुलै २०११ रोजी कुपवाडा जिल्ह्यातील भारताच्या सहा जवानांवर हल्ला करून त्यापैकी तिघांची शीरे कापून पाक सैनिकांनी नेली होती. त्यामुळे भारतीय लष्करात पाकविरोधात खुन्नस निर्माण झाली होती. त्याचे पर्यावसान ‘ऑपरेशन जिंजर’मध्ये झाले असे ‘हिंदू’ने म्हटले आहे. या मोहिमेविषयीची कागदपत्रे तसेच व्हिडिओ व छायाचित्रेही आपल्याजवळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कुपवाडामधील तत्कालीन मेजर जनरल ए. के. चक्रवर्ती यांनी या माहितीला पुष्टी दिली असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय लष्कराच्या २५ जवानांच्या तुकडीने ३० ऑगस्ट २०११ रोजी हे सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्तात म्हटले आहे. त्यात पाकिस्तानमधील तीन चौक्यांवर हल्ला करून तेथील तीन पाक सैनिकांची मुंडकी भारतीय जवानांनी आणली.