१८ लाखांचा चरस जप्त

0
119

>> म्हापशातील कारवाईत एकास अटक

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने म्हापसा येथे शनिवारी रात्री छापा घालून सुमारे १८ लाख रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे, या प्रकरणी संशयित म्हणून महिपालपूर दिल्ली येथील राज शर्मा (३२) याला अटक केली असून त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने काल दिला.

संशयित राज शर्मा याच्याकडे ६.०२ किलो चरस हा अमलीपदार्थ आढळून आला आहे. सरते वर्ष आणि नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर संशयित राज शर्मा मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ घेऊन म्हापसा येथे येणार असल्याची माहिती अमलीपदार्थ विभागाला मिळाली होती. एनएनसीच्या पथकाने शनिवारी रात्री ८.४० वाजता कारवाईला सुरूवात करताना म्हापसा येथील बॉम्बे बसस्थानकावर संशयित राज शर्मा याला ताब्यात घेतला. त्यांच्याकडे सहा किलो चरस आढळून आला. त्यांच्याजवळील २५०० रूपये आणि मोबाईल संच जप्त करण्यात आला आहे. संशयित राज याने नेपाळ सीमेवरून अमलीपदार्थ आणल्याची प्राथमिक माहिती तपास अधिकार्‍यांना दिली आहे. गोव्यात अमली पदार्थाचा व्यवसाय करणार्‍यांना चरसचे वाटप करण्यात येणार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक धितेंद्र नाईक, पोलीस शिपाई प्रकाश कोलेकर, नितेश मुरगावकर, निकेत नाईक, रूपेश कांदोळकर, सुशांत पागी यांनी कारवाई केली.

अमलीपदार्थ विरोधी पथकाची मोठ्या प्रमाणात चरस ताब्यात घेण्याची वर्षातील ही मोठी कारवाई आहे. या विभागाने आत्तापर्यत एक कोटी पेक्षा जास्त रक्कमेचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. अमलीपदार्थ विभागाच्या अधीक्षकांनी मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त करणार्‍या पोलीसांना बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.