गुजरात व हिमाचलचा आज फैसला

0
131
Surat: Prime Minister Narendra Modi addresses the "Gujarat Vikas Rally" in Surat on Thursday. PTI Photo (PTI12_7_2017_000160B)

गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची सत्वपरीक्षा ठरणार्‍या गुजरात विधानसभा निवडणुकीचा फैसला अखेर आज होणार आहे. भारतीय जनता पक्ष यावेळी सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करण्याच्या प्रतीक्षेत आहे. तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेस दोन दशके विरोधात राहिल्यानंतर सत्ता काबीज करण्याच्या आशा बाळगून आहे. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आज या निवडणुकांची मतमोजणी ३३ जिल्ह्यांमधील ३७ केंद्रांवरून होणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या गुजरात मॉडेलवर आधारून २०१४ साली लोकसभा निवडणुका जिंकण्याची किमया साधली असल्याने या विधानसभा निवडणुकीतील यशावर आगामी २०१९ लोकसभा निवडणुकीच्या यशासाठी भाजपची भिस्त आहे.

त्वेषपूर्ण प्रचार
भाजप व कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी अत्यंत पराकोटीच्या त्वेषाने या निवडणुकीसाठी प्रचार केला होता. परस्परांविरोधात घणाघाती आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाची धुरा अत्यंत प्रभावीपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी सांभाळली होती. तर कॉंग्रेसतर्फे ही भूमिका राहुल गांधी यांनी दमदारपणे पार पाडली.

भाजपतर्फे प्रचार मोहिमांमध्ये पंतप्रधान मोदींबरोबरच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राममंदिर तसेच गुजरात निवडणुकीत पाकिस्तानच्या हस्तक्षेपाचा दावा करीत कॉंग्रेसवर हल्ले करण्याचे काम केले.
राहुल गांधी यांनीही भाजपचे हल्ले परतवण्याचे काम बजावताना पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. गुजरातच्या भविष्याबद्दल मोदी भाष्य करत नसल्याबद्दल राहुल यांनी सातत्याने धारदार टीका केली. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवाणी यासारख्या पाटिदार, ओबीसी व दलित समाजातील युवा नेत्यांची साथ कॉंग्रेसला मिळाली.

प्रभावी पाटीदार समाज
गुजरातमध्ये पाटीदार समाजाची १२ टक्के एवढी लोकसंख्या असून हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली या समाजाने कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने या निवडणुकीच्या निकालावर त्याचा कितपत परिणाम होतो याचा फैसलाही आजच होणार आहे. हार्दिक पटेल यांनी यावेळी निवडणूक प्रचारात सातत्याने भाजपवर हल्ले चढवित या पक्षाला उखडून टाकण्याचे आवाहन केले.

अंतिम टप्प्यात जात-धर्माचे मुद्दे
निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना विकासाचा मुद्दा बाजूला पडून जात व धर्माचे मुद्दे महत्वाचे ठरल्याचे चित्र दिसले. भाजप व कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी समाज माध्यमांचाही परस्परांवर हल्ल्यांसाठी जोरदार वापर केला.

एकूण १८२ मतदारसंघांसाठी
दोन टप्प्यांत पार पडलेल्या या निवडणुकीत ६८.४१ टक्के एवढे मतदान झाले. २०१२च्या निवडणुकीवेळी ७१.३२ टक्के एवढे मतदान झाले होते. यावेळी आधीच्या तुलनेत २.९१ टक्क्यांनी मतदान घटले आहे. एकूण ४.३५ कोटी पात्र मतदारांपैकी २.९७ कोटी मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आदिवासींचे वर्चस्व असलेल्या नर्मदा जिल्ह्यात सर्वाधिक ७९.१५ टक्के मतदान झाले आहे. आमरेली (६१.२९), भावनगर (६१.५६) व पोरबंदर (६१.८६) या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी मतदान झाले.

 

कॉंग्रेस हिमाचल गमावणार?

गुजरातप्रमाणेच सर्व एक्झिट पोलनी हिमाचल प्रदेशमध्येही भाजपची सरशी होईल असे अंदाज वर्तविले असले तरी प्रत्यक्ष मतदारांचा कौल आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ मतदारसंघांसाठी गेल्या ९ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. आज मतमोजणी होणार असल्याने येथील जनतेची उत्कंठा शिगेस पोचली होती.

वीरभद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली मावळत्या कॉंग्रेस सरकारविरोधात नाराजी असली तरी कॉंग्रेसने विजयाचा दावा केला आहे. तर भाजपने आपल्याला ५० जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी एक्झिट पोलचे कौल फेटाळून लावले आहेत. या पोलना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याने त्यावर बंदी घालायला हवी असे ते म्हणाले. भाजप ५० जागांचा दाव करत आहे याकडे लक्ष वेधले असता सिंग यांनी भाजप नेते स्वप्ने पाहत असल्याची टीका केली. आपण आजच्या निकलांच्या प्रतीक्षेत असल्याचे ते म्हणाले. या राज्यातील ६८ मतदारसंघांमधील मतमोजणीस आज सकाळी ८पासून ४८ मतमोजणी केंद्रांवर प्रारंभ होणार आहे. राजकीय निरीक्षकांच्या विश्‍लेषणांनुसार हिमाचल प्रदेशात भाजप किंवा कॉंग्रेस यांच्यापैकी कोणत्याही एकाच पक्षाच्या बाजूने स्पष्ट लाट नाही.