१२ सप्टेंबरलाच होणार नीट परीक्षा

0
40

१२ सप्टेंबर रोजी होणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयात नीट परीक्षा २०२१ दुसर्‍या तारखेला घेण्याबाबत मागणी करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की, नीट परीक्षेची तारीख सीबीएसई कंपार्टमेंट व अन्य परीक्षेच्या तारखा सारख्याच आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.

मात्र, नीट परीक्षा येत्या रविवार दि. १२ सप्टेंबर रोजीच निर्धारित वेळेवर घेतली जाईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. नीट परीक्षेत १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसतात आणि केवळ काही विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही, असेही याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले.