विघ्नराजं नमामि

0
175
  • लक्ष्मण पित्रे

निर्विघ्नपणाने कोणतेही कार्य पूर्ण व्हावे म्हणून आपण प्रथम विघ्नेश्‍वर गणपतीला वंदन करतो. हा विघ्नांचा नियामक, विघ्नहर्ता देव मुळात विघ्नकर्ता होता यावर आपला विश्‍वासच बसणार नाही. मुळात विघ्नकर्त्या क्रूर विनायकगणांचा अधिपती हा विघ्नराज आज मंगलाचे प्रतीक बनलेला आहे. हे कसे काय घडले, हे पाहणे रोचक ठरेल.

गणेशचतुर्थी हा समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी आनंददायक उत्सव आहे. सर्वच लोक या सणात वैयक्तिक आणि सामाजिक स्वरूपात उत्साहाने भाग घेतात. गणपतीची मातीची मूर्ती आणून दीड दिवस (किंवा पाच, सात, अकरा दिवसही) त्याची मनोभावे पूजाअर्चा करतात आणि जड मनाने त्याला निरोप देतात. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आश्‍वासन हक्काने मागूनच मग त्याच्या मृण्मय मूर्तीचे विसर्जन करतात.

गणेश ही आपल्या संस्कृतीमध्ये सर्वात लोकप्रिय देवता आहे असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात गणेशाला अनन्यसाधारण स्थान आहे. गणेश हा सर्वव्यापी आहे असे म्हणावे लागेल. आपल्या शिक्षणाची सुरुवातच गणेशवंदनेने होते- ‘श्रीगणेशायनमः|’ निर्विघ्नपणाने कोणतेही कार्य पूर्ण व्हावे म्हणून आपण प्रथम विघ्नेश्‍वर गणपतीला वंदन करतो. हा विघ्नांचा नियामक, विघ्नहर्ता देव मुळात विघ्नकर्ता होता यावर आपला विश्‍वासच बसणार नाही. मुळात विघ्नकर्त्या क्रूर विनायकगणांचा अधिपती हा विघ्नराज आज मंगलाचे प्रतीक बनलेला आहे. हे कसे काय घडले, हे पाहणे रोचक ठरेल.

गणेश ही आर्यपूर्वकालीन प्राचीन देवता आहे. परंतु वेदांसारख्या प्राचीनतम ग्रंथांत त्याचा निःसंदिग्ध उल्लेख आढळत नाही. ऋग्वेदात ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तम्‌|’ अशी ऋचा आहे. ती गणपतीला उद्देशून आहे असे सर्वसामान्यपणे मानले जाते. परंतु ती ऋचा ब्रह्मणस्पती या देवतेची आहे. कारण त्या ऋचेचा पुढचा भाग हे स्पष्ट करतो- ज्येष्ठराजं ब्रह्मणांं ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्‌नूतिभिःसीदसादनम्‌|
मैत्रायणी संहितेत, तैत्तिरीय आरण्यकात तसेच नारायणीयोपनिषदात गणपतीचा उल्लेख आहे-
तत्पुरुषाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि| तन्नो दन्ती प्रचोदयात्‌॥
या मंत्राला ‘रुद्रगायत्री’ असेही म्हणतात.
रामायण तसेच काही प्राचीन पुराणे यांतही गणेश आढळत नाही. कौटिलीय अर्थशास्त्रात काही देवांची देवळे बांधावीत असे विधान आहे, पण त्या देवांत गणपतीचा समावेश नाही.

बौधायन गृह्यसूत्रात ‘विनायक या क्रूरगणांनी कार्यात विघ्ने आणू नयेत म्हणून ‘विनायकशांती’ करावी असे सांगितले आहे. ‘याज्ञवल्क्यस्मृती’तही ‘मनुष्यांना झपाटून टाकून त्यांच्या कार्यात विघ्ने आणणारे राक्षस’ असे विनायकगणांचे वर्णन आहे. अशा गणांचा प्रमुख गणेश होता असे दिसते. त्यामुळेच तो विघ्नराज म्हणजे विघ्नांचा नियंता आहे. लिंगपुराण, अग्निपुराण, भविष्यपुराण इत्यादी नंतरच्या पुराणांत ‘गणेशावतारा’च्या कथा आढळतात. महाभारताच्या उत्तरभारतीय प्रतीत गणेश हा व्यासांनी सांगितलेल्या महाभारताचा लेखक आहे, असा उल्लेख आढळतो. पण दाक्षिणात्य प्रतीत तो नाही. त्यामुळे तो प्रक्षिप्त मानला जातो. ‘गणपती’ हे विशेषण मरुद् गणांचा अधिपती म्हणून रुद्रालाही लावलेले आढळते ते वायुपुराणात. लंबोदर, गजेंद्रकर्ण ही विशेषणे शिवाला लावलेली आढळतात ती शिवपुराणात. तसेच ‘त्रिनेत्र’, नागभूषण, भालचंद्र ही विशेषणे काही ठिकाणी गणेशालाही लावलेली आढळतात. यावरून सुरुवातीला रुद्र, शिव आणि गणेश ही एकच देवता असावी असे मानण्यास वाव आहे. ‘शिवपुत्र आणि शिवगणांचा प्रमुख गणपती’ या कल्पनेचे बीज या शक्यतेत दिसून येते.

गुप्तकाळापूर्वी गणपती अस्तित्वात होता, परंतु आर्यांच्या ग्रंथांत त्याचे निर्विवाद उल्लेख आढळत नसल्याने त्याकाळी गणपतीचा समावेश आर्यदेवतासमूहामध्ये नसावा असेच दिसते.
गणपती ही मुळात अनार्य देवता होती याबद्दल बहुतेक संशोधकांचे एकमत आहे. अर्थात सनातनी पंडित हे मान्य करीत नाहीत. ऋग्वेदातील ब्रह्मणस्पतीसूक्त हे गणपतीचेच आहे असे ते मानतात. अथर्ववेदातील गणपत्यथर्वशीर्ष हा त्यांच्या कल्पनेचा प्रमुख आधार आहे.

आर्येतरांच्या ज्या देवतांचा आर्यांच्या देवतासमूहात हळूहळू प्रवेश झाला आणि यथावकाश प्रतिष्ठाही लाभली त्यांत प्रामुख्याने गणपतीचा समावेश होतो. (दुसरे उदाहरण म्हणजे लिंगदेव शिव हे आहे.)
हजारो वर्षांपासून गणेश ही आर्येतरांची एक ग्रामदेवता होती. तशा प्रकारच्या इतर देवतांबरोबर ती एखाद्या झाडाखालीच प्रतिष्ठापित झालेली असेल. तिचे अर्चक तिच्यापुढे बळी देऊन त्या बळीच्या रक्ताने त्या देवतेवर अभिषेकही करीत असावेत. आज आपल्यासमोर असलेल्या गणेशाचे रूपही लालच आहे. त्याला आज सिंदुरार्चन केले जाते. तसेच त्याचे रक्तवस्त्र, रक्तचंदनाची उटी, लाल फुले आणि दूर्वांचा पूजेत समावेश या गोष्टीही त्याच्या आर्यपूर्व मुळाकडे निर्देश करतात.

आर्यसंस्कृतीत ही देवता स्वीकारली गेल्यानंतर तिचे आर्यांच्या ब्रह्मणस्पतीशी साम्य दिसून आले, तेव्हा तो ब्रह्मणस्पतीचा पूर्वावतार मानला गेला. गणपती ज्ञानदाता, तसाच ब्रह्मणस्पतीही ज्ञानदाता आहे. गणपतीप्रमाणेच तो सुवर्णपरशू धारण करतो. ऋग्वेदातील ‘गणानां त्वा…’ ही ऋचा नंतर गणपतीच्या स्तवनासाठी वापरली जाऊ लागली. पुढे गणपतीची गणना शिवगणांत होऊ लागली. त्यानंतर तो शिवगणांचा प्रमुख मानला जाऊ लागला. त्यानंतर तो शिव-पार्वतीचा पुत्र बनला. कार्तिकेयाचा भाऊ बनला आणि मग याकरिता सुसंगत अशा कथाही पुराणांतून निर्माण करण्यात आल्या. गणपतिस्तोत्रातील बारा नावांच्या मागेही काहीतरी इतिहास आणि कथा पुराणांतही आढळतात. या नावांपैकी एक नाव ‘विनायक’ हे आहे. विनायक हे अनेक शिवगण असून त्यांचा सर्वत्र संचार असतो. सूत्रवाङ्‌मयात यांची माहिती मिळते. त्यांना चव्हाठ्यावर (चतुष्पथ) नैवेद्य ठेवावा असे सांगितले आहे. मानवगृह्यसूत्रात चार दिशांना चार विनायक असून त्यांची शांती कशी करावी ते सांगितले आहे.
याज्ञवल्क्यस्मृतीत एका विनायकाचे नाव ‘गणेश’ आहे.

बौधायनगृह्यसूत्रात चार विनायकांचा एक विनायक होतो. त्याला शिवाने गणपती विनायक केले आणि विघ्ने निर्माण करण्याचे काम त्याला दिले. त्याला त्यात ‘हस्तिमुख’ असे नाव आहे (बौ. ३.१). बौधायन धर्मसूत्र या दुसर्‍या ग्रंथातही त्याला ‘गजमुख’ नाव दिले आहे. या टप्प्यावर चार विनायकांचा एक विनायक बनला, तो गजानन होय. विघ्ने निर्माण करणे हे त्याचे कार्य; परंतु जर विधिपूर्वक त्याची शांती केली तर तो विघ्नांचा नाशही करतो. त्यामुळेच तो ‘विघ्नराज’ वा ‘विघ्नहर्ता’ झाला.

वराहपुराणात याविषयी एक रोचक कथा आहे. ‘सज्जनांची कार्ये निर्विघ्न कशी होतील’ या चिंतेने ग्रस्त देव आणि ऋषी रुद्राकडे गेले. त्यांचे म्हणणे ऐकून रुद्राने उमेकडे एकटक पाहिले तेव्हा त्याच्या मुखापासून एक तेजस्वी सुंदर कुमार निर्माण झाला. जणू प्रतिरुद्रच! पण ते उमेला आवडले नाही. तिने त्याला शाप दिला की तू गजमुख, लंबोदर, सर्पवेष्टित होशील! तसा तो झाला. त्यामुळे क्रुद्ध होऊन रुद्र आपले अंग हाताने घासू लागला तेव्हा गजमुख वक्रतुंड नाना शस्त्रधारी अनेक विनायक निर्माण झाले. त्यांना पाहून देवही गर्भगळित झाले! तेव्हा ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून त्या कुमाराला त्याने त्या सर्व विनायकांचा अधिपती बनविले आणि वर दिला की, कोणत्याही कार्यात प्रथम तुझे पूजन केले जाईल. न झाल्यास त्याला विघ्न घडविण्याची मुभा दिली. म्हणजे विनायकगण हे विघ्नकर्ते, परंतु हा गणेश विघ्ने दूर करू शकणारा अशी स्थिती बनली. त्याच्या या उपद्रवमूल्यामुळे त्याला अग्रपूजेचा मान मिळाला असणे शक्य आहे.

म्हणूनच आपण सर्वप्रथम गणेशाची पूजा करतो. त्यामुळे तो संभाव्य विघ्ने दूर करतो, अशी श्रद्धा निर्माण झाली. विघ्नकर्त्याचा विघ्नहर्ता बनण्याची ही प्रक्रिया गुप्तकाळात (इ.स. ३०० ते ५५०) झाली, असे म. म. पां. वा. काणे यांचे मत आहे. याच काळात गणपत्यथर्वशीर्ष रचले गेले. त्यात त्याला सर्व देवात्मक मानले आहे. प्रत्यक्ष ब्रह्मच मानले गेले आहे. आज आपल्यासमोर गणेशाचे हेच रूप आहे. अशी आहे ही विघ्नहर्त्या विघ्नेश्‍वर गणपतीची कथा!