॥ बायोस्कोप ॥ थँक्यू!

0
193
  • प्रा. रमेश सप्रे

नाहीतरी भावभावना व्यक्त करायला शब्द थिटेच पडतात नाही का?
‘माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे माणुसकी’ असेल तर ती अशाच दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या प्रसंगातून आपल्या वागण्यात उतरली पाहिजे. संकल्प करु या.

आपल्या गोव्यात अगदी छोट्या खेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत, अगदी पॉश निवासी वसाहतींपर्यंत दिवसाच्या आरंभी एक दृश्य दिसतंच दिसतं- पेक् पेक् करत येणारा पाववाला (पोदेर) आणि त्याच्याकडून पाव खरेदी करणारी मंडळी. एका दृष्टीनं हा पाववाला म्हणजे व्ही. आय. पी. जरी प्रत्यक्षात अशिक्षित, गरीब असला तरी. कारण पूर्वी शाळा ‘ऑफ् लाइन’ म्हणजे शहाण्यासारख्या, शिक्षक- मुले एकत्र येऊन शिक्षणासाठी चालवल्या जायच्या, त्यावेळी हा पाववाला आला नाही तर मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्‍न असायचा. बर्‍याचवेळा टिफिनऐवजी पैसे दिले जात नि मुलं नको ते घेऊन खात. असो.

  • आत्ता हा पाववाला आठवायचं कारण म्हणजे त्या दिवशी पाहिलेला तो प्रसंग. पाव घेऊन घाईत वळताना अस्पष्ट आवाजात म्हटलं गेलेलं ‘थँक्यू’ नि सायकलला पेडल मारून पेक् पेक् करत निघताना पाववाल्यानं म्हटलेलं – ‘मेन्सन नॉट’(मेन्शन नॉट). बारीक विचार केला तर यातली यांत्रिक औपचारिकता सोडली तर कोणत्या संस्काराचं दर्शन या व्यवहारात घडले?- कृतज्ञता व्यक्त करण्याच्या संस्काराचं दर्शन? ज्याला आता वापरून बुळबुळीत झालेला शब्दप्रयोग आहे – ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. ही ऋण व्यक्त करण्याची, कृतज्ञतेची वृत्ती आता अशा शाब्दिक व्यवहारापुरतीच उरलीय.
  • आता हे चित्र पहा. एक प्रौढ वयातली भाजी विकणारी बाई. आपल्याला या घरोघरी जाऊन भाजी विकणार्‍यांच्या डोक्यावरच्या टोपलीच्या वजनाची कल्पना आहे का? लक्ष्मी नावाची भाजीवाली. तिच्या डोक्यावरची गच्च भरलेली भलीमोठी टोपली खाली उतरवताना नि पुन्हा डोक्यावर ठेवण्यासाठी उचलताना घामाघूम व्हायला होत असे. या कर्तव्य म्हणून केलेल्या मदतीच्या बदल्यात लक्ष्मी काय द्यायची? एक प्रार्थना – ‘देव बोरें करुं!’ ते म्हणताना तिच्या आवाजातला तो कृतज्ञ भाव विलक्षण असायचा. मुख्य म्हणजे आपल्या डोळ्यातून मनात उतरत ती हे शब्द म्हणायची. कोरड्या, भावनाहीन, केवळ वाक्याच्या शेवटी येणार्‍या एखाद्या विरामचिन्हासारख्या (पंक्च्युएशन मार्क) ‘थँक्यू’चा वास वा स्पर्श त्या शब्दांना नसायचा.
  • एक कलिंगडं विकणारी खूप म्हातारी झालेली बाई. गाडी थांबवून एखादं कलिंगड घेण्यासाठी खाली उतरलेल्या त्या फॅशनेबल तरुणाला ए.सी. गाडीतून उतरल्यामुळे एरवीच रणरणतं असलेलं प्रखर उन्ह सहन होत नव्हतं. तसं त्याच्या गॉगलमधून सारं भवताल ‘कूल’ दिसत होतं. एका कलिंगडाला त्यावेळी पन्नास रुपये पडत होते. पैशाचं पाकीट काढताना त्या तरुणाच्या मनातील माणूस जागा झाला (बीइंग ह्यूमन) त्यानं सहज विचारलं, ‘केव्हापासून बसलीयस या जीवघेण्या उन्हात?’ यावर थरथरत्या आवाजात ती म्हणाली, ‘सकाळपासून, बाबा. ही सगळी कलिंगडं विकल्याशिवाय मला माझी सून नि मुलगा जेवायला वाढणार नाहीत.’ चार तर कलिंगडं होती. केव्हा खपणार होती कुणास ठाऊक? कारण आत्ता कुठे पहिलं कलिंगड विकलं गेलं होतं. त्या तरुणाला काय वाटलं कुणास ठाऊक … त्यानं सारी कलिंगडं खरेदी केली नि तिला प्रेमानं म्हणाला, ‘आता घरी जाऊन शांतपणे जेव.’ त्याला विचारल्यावर तो युवक उद्गारला, ‘किती दुष्ट असतात नाही काही माणसं? आणि काही माणसं किती असहाय, लाचार असतात! त्या आजींनी आशीर्वाद देण्यासाठी उचललेले कंप सुटलेले ते हात, ‘देव तुझं कल्याण करो’ ही हृदयाच्या अगदी तळापासून केलेली प्रार्थना आणि तिच्या पाणावलेल्या डोळ्यात तरळणारी कृतज्ञता! याच्या बदल्यात मी दिलेले २०० रुपये म्हणजे काहीच नाहीत.’

गाडीच्या डिकीत कलिंगडं ठेवायला मदत करताना सहज विचारलं, ‘या चार कलिंगडांचं करणार काय? तुला तर एकच हवं होतं ना?’ यावर हसत तो तरुण म्हणाला, ‘देणार काही भल्या माणसांना. तुमच्यासारख्या!’ असं म्हणत त्यानं एक कलिंगड हातांमध्ये कोंबलंच. नको असताना ते घेतलं कारण घरी निघण्याच्या तयारीत असलेल्या त्या वृद्धेन्‌ं मानेनंच ते घेण्याचा आग्रह. तिच्या रेषांचं जाळं झालेल्या गालांवरून ओघळणार्‍या अश्रूंचा मान राखणं भाग होतं.

या प्रसंगात ‘थँक्यू’सारखा केवळ बुडबुड्यासारख्या शाब्दिक उपचार झाला नव्हता. कारण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. तर गरज असते मूक भावनांची.
** आता हा व्यवहार पहा. मित्राला घ्यायच्या होत्या काकड्या. एक काकडी एक रुपया’ असे काकडीवाले आजोबा उद्गारले. ‘इतकी महाग? आठ आण्याला नाही का देणार?’ यावर आजोबांचे उद्गार काळजात घुसणारे नि दृष्टीत जळजळीत अंजन घालणारे होते. ‘एक सांगा, आमच्यासारख्या गरीबाकडेच तुम्ही घासाघीस करणार? मोठ्या दुकानातून तेल, साखर, पीठ घेताना करता अशी घासाघीस? आणि साहेब, तुम्हाला त्या वस्तूंचे जे दर असतात तेच आम्हालाही असतात.’ या वाक्यातल्या विदारक सत्याची जाणीव होऊन मिल गलबलला… एकदम म्हणाला, ‘तुझ्या या सार्‍या काकड्यांची किंमत किती? एक रुपयाला एक याच दरानं!’ आजोबा बघतच राहिले. हिशेब करून सार्‍या काकड्यांचे पैसे सांगितले. देण्यासाठी पाकीट काढत असताना मित्राचे पाय घट्ट धरून स्फुंदत रडवेल्या स्वरात आजोबा म्हणाले, ‘अशी माणुसकी आता दुर्मिळ झालीय. खूप उपकार झाले तुमचे. बायको हॉस्पिटलात आहे. तिच्या औषधांसाठी हे पैसे उपयोगी पडतील. तुमचं सगळं चांगलं होईल साहेब’- हे सारं उत्स्फूर्त होतं. त्याला ‘थँक्यू’ शब्दाचा व्यावहारिक वास नव्हता. पण एक चांगल्या संस्कारांचा अनुभव मात्र सर्वांना आला. नाहीतरी भावभावना व्यक्त करायला शब्द थिटेच पडतात नाही का?
‘माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे माणुसकी’ असेल तर ती अशाच दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या प्रसंगातून आपल्या वागण्यात उतरली पाहिजे. संकल्प करु या.