श्‍लोकांचा अर्थ महत्त्वाचा!

0
171

योगसाधना – ५०३
अंतरंग योग – ८८

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपल्यातील प्रत्येक जिज्ञासूने जर श्‍लोकांचा अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर आपला भाव व प्रेम अनेक पटींनी वाढेल. कर्मकांड करण्यात आनंद होईल, उत्साह वाढेल, मजा येईल. मनःशांती द्विगुणित झालेली दिसेल. पुण्य तर नक्की मिळेल.

आपल्या भारत देशात विविध धार्मिक प्रथा व कर्मकांडं आहेत. तसेच जवळजवळ प्रत्येक महिन्यात अनेक सण आहेत. यातील प्रत्येकात विशाल असे तत्त्वज्ञान आहे. पण मुख्य म्हणजे यात अत्युच्च भाव आहे. विविध घटकांबद्दल अगाध कृतज्ञता आहे-

  • पंचमहाभूते – पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश.
  • वृक्ष – वनस्पती – तुळस, पिंपळ, वड, कडू निंब…
  • नद्या – सागर – डोंगर – पर्वत…
  • पशू-पक्षी-प्राणी – गरुड- गाय- सिंह- वाघ
    ह्यातील काही देवदेवतांची वाहनं आहेत.
  • देव – वरुणदेव – अग्निदेव – वासुदेव – जलदेवता- सूर्यदेव
    प्रत्येक कर्मकांड करताना पंडित लोक विविध श्‍लोक म्हणतात. पण ते संस्कृत भाषेत असल्यामुळे आम्हाला अर्थ समजत नाही आणि तो समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्नही आम्ही करीत नाही. सहसा पंडितलोकदेखील त्यांचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करीत नाहीत. याचे मूळ कारण म्हणजे आपला संबंध फक्त वरवरच्या कर्मकांडाकडेच असतो.- फक्त एक प्रथा म्हणून अथवा भीतीपोटी.
    आपल्यातील प्रत्येक जिज्ञासूने जर श्‍लोकांचा अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर आपला भाव व प्रेम अनेक पटींनी वाढेल. कर्मकांड करण्यात आनंद होईल, उत्साह वाढेल, मजा येईल. मनःशांती द्विगुणित झालेली दिसेल. पुण्य तर नक्की मिळेल.
    कलशावर विचार करताना आपण बघितले की आपण वरुणदेवाला स्मरून श्‍लोक म्हणतो.

‘तत्त्वायामि ब्रह्मणा वंदमानस्तदाशास्ते यजमानो हविर्भीः |
अहेळमानो वरुणोहबोध्यु रुशंस मा न आयुः प्रमोषीः ॥

  • हे वरुणदेवा! तुला नमस्कार करून मी तुझ्याजवळ येत आहे. यज्ञात आहुती देणारा तुझ्याकडे याचना करीत आहे की तू आमच्यावर राग धरू नकोस, आमचे आयुष्य कमी करू नकोस.
    असे हे दिव्य मंत्र – वैदिकांनी रचलेले – म्हणून भगवान वरुणाचे आवाहन करून त्याची प्रस्थापना केली जाते.
    तदनन्तर अनेकवेळा आपण एक कर्मकांडं बघतो – ते पवित्र जल अंगावर, आजूबाजूला शिंपडले जाते. ह्यामागील गुह्य भाव म्हणजे भक्ताचे रक्षण.
    असे भावपूर्ण श्‍लोक म्हटले की तो साधा कलश न राहता त्याच्यात पिंड- ब्रह्मांडाची व्यापकता येते.
    कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्र समाश्रितः |
    मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥
    कुक्षौ तू सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा |
    ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथवर्णः ॥
    अंगैश्च सहितः सर्वे कलशं तू समाश्रिताः
    अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टिकरी तथा
    आयांतु मम शांत्यर्थ्यं दुरितक्षयकारकः ॥

आपल्यातील बहुतेकांना संस्कृत भाषेचे ज्ञान नाही. दुर्भाग्यच म्हणायला हवे. पण प्रत्येकजण संस्कृतचा थोडा थोडा अभ्यास अवश्य करू शकतो. त्याशिवाय हा श्‍लोक अगदी लक्ष देऊन, मन लावून वाचला तरी अनेक उत्तम अर्थपूर्ण, भावपूर्ण, ज्ञानपूर्ण शब्द अगदी सहज लक्षात येतील.

  • मुखे विष्णू, कंठे रुद्र, मूले ब्रह्मा
  • सागर, वसुंधरा. – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद.
  • गायत्री, सावित्री, शांतिपुष्टी
  • समुद्र, सरिता, तीर्थ, जल.
    यातील शब्द जरी समजून वाचले तरी श्‍लोकाची अगाधता लक्षात येईल.
  • स्नान करतानादेखील काही सुंदर श्‍लोक म्हणायचे असतात-
    गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती |
    नर्मदे सिंधू कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥
  • हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.
    किती बोधपूर्ण श्‍लोक हा! इथे घरी बसून सर्व नद्यांत स्नान केल्याचा भाव ठेवण्याची अपेक्षा आहे. दर दिवशी स्नानाच्यावेळी हे श्‍लोक म्हटल्यावर मन अगदी शांत होते. तसाच पवित्रतेचा सुंदर अवर्णनीय अनुभव येतो- शब्दांकित करू न शकणारी अनुभूती येते.
    असाच आणखी एक श्‍लोक फारच हृदयगम्य आहे. जरुरी आहे ती स्वतःच्या मनात व हृदयात पवित्र भाव ठेवण्याची –

गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा
कावेरी सरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका |
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी
पूर्णाः पूर्णजलैः समुद्रसहिताः कुर्वन्तु मे मंगलम् ॥

  • गंगा, सिन्धू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयु, महेंद्रतनया, चंबळा नदी, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती (माळव्यातील बेतवा नदी), प्रख्यात महासुरनदी, जया आणि गण्डकी या नद्या पवित्र जलाने परिपूर्ण होऊन समुद्रसहित माझे कल्याण करोत.
    अशा या ज्ञानपूर्ण श्‍लोकांचे फायदे अनंत आहेत. पण ते श्‍लोक उगाच गुणगुणायचे नाहीत तर शास्त्रशुद्ध म्हणायचे असतात- प्रत्येक अक्षर व शब्द शुद्ध, कंपनासह, अर्थ समजून, मन लावून, भावपूर्ण.
    १. मन शांत, पवित्र होते.
    २. मेंदूतील विविध महत्त्वपूर्ण भागांना विशिष्ट कंपने गेल्यामुळे त्यांची वाढ होते. कार्यक्षमता वाढते.
    ३. चित्तएकाग्रता, कार्यक्षमता वृद्धिंगत होते
    ४. पुण्यसंचय होतो.
    ५. मनातील नको असलेल्या विचारांना तिलांजली मिळते.
    काहीजण स्नान करताना भजने म्हणतात अथवा ऐकतात. तसेच इतर काही सिनेगीत ऐकतात. अर्थात् सगळ्यात छान चाल, ताल, अर्थ… आहेत. पण काय म्हणणे जास्त हितावह आहे ते प्रत्येकाने ठरवावे.
    पू. पांडुरंगशास्त्री कलशाच्या संदर्भात आणखी काय ज्ञान देतात ते पाहुया –
    ‘‘कलशाला जरा व्यापक करा म्हणजे तो कुंभ बनेल. घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथादेखील प्रसिद्ध आहे. जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नवपल्लवीत राहावे अशी मंगल कामना त्याच्या पाठीमागे राहिलेली आहे. कलशावर किंवा कुंभावर श्रीफळ ठेवल्याने त्याची शोभा द्विगुणित होते. श्रेष्ठ व्यक्तीच्या आगमनाच्या वेळी माथ्यावर श्रीफलयुक्त कलश घेऊन उभ्या राहणार्‍या कुमारिकांना आपण खूप वेळा पाहतो. आतिथ्य-सत्काराचा हा एक आगळा प्रकार आहे. गुजरातमध्ये नवरात्राच्या निमित्ताने ठेवण्यात येणारा – ‘गरबा’ – हे कलश किंवा कुंभाचेच स्वरूप आहे. मात्र तो सजल असायच्या ऐवजी सतेज असतो.
  • खरेंच, रात्रीच्या काळोखात त्या कलशाच्या आत अखंड पेटणार्‍या पणतीतील वातीचा प्रकाश छोट्या छिद्रातून बाहेर येतो. तो मंद प्रकाश पाहून मन प्रफुल्लित होते. ब्राह्ममुहूर्तावर उठणार्‍यांना त्याचे सुंदर दर्शन होते. ध्यानासाठीदेखील या ज्योतीचा खूप फायदा होतो. गरज आहे ती भावपूर्ण व शास्त्रशुद्ध कृतीची.
    प्रत्येक मंदिराला एक सुंदर कळस असतो. कारण स्थापत्यशास्त्रातदेखील कळसाला आगळे महत्त्व आहे. सूर्याचे किरण मंदिराच्या गाभार्‍यात व त्यात असलेल्या भगवंताच्या मूर्तीवर एकत्रित होण्यास उपयोग होतो.- असे मत जाणकार प्रदर्शित करतात.
    तत्त्वज्ञानी सांगतात की कळस हे शेवटचे शिखर, पूर्णतेचे प्रतीक.
    भक्तिशास्त्रातदेखील कळसाचे महत्त्व आहे. भगवंताचे दर्शन घेऊन कळसाचे दर्शन घेतले नाही तर दर्शन अपूर्ण राहते. म्हणूनच संतमाऊली ज्ञानेश्‍वरांनी
  • गीतेला मंदिर व शेवटच्या अध्यायाला ‘कळसाध्याय’ म्हटले आहे. शास्त्रीजींना इथे जीवनाचे दर्शन घडते.
    कलश – मानवदेहाचे प्रतीक आहे.
  • शरीर पवित्र, सुंदर आहे – जोपर्यंत जीवनरुपी जल व प्राणात्मक ज्योत आहे तोपर्यंत.
  • कलशामधील पाणी जसे विशाल जलराशीचा अंश आहे तसेच देहरुपी कलशात राहणारा जीवात्मा व्यापक चैतन्याचा अंश आहे.
  • श्रीकृष्ण गीतेत सांगतात- ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः’(१५.७)
  • संत तुलसीदास म्हणतात-
    ‘ईश्‍वर अंश जीव अविनाशी, चेतना अमल सहज सुखराशी!’
  • देहरुपी घटात राहणारा हा जलरूपी जीवात्मा घट फुटताच जर बाहेरील विशाल जलराशीरूप चैतन्य प्रवाहात मिसळून गेला तर त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता समजावी. अशा प्रकारची मुक्तीच मानवाची परमोच्च सिद्धी अथवा त्याच्या जीवन मंदिराचा कळस मानतात.
  • पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक अशा या कळसाचे सार्थक दर्शन घेऊन आपणही पूर्ण बनावे हीच अभिलाषा.
    (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले – ‘संस्कृती पूजन)