॥ बायोस्कोप ॥ ऑन् लाइन्… ऑफ् लाइन् …

0
179
  • प्रा. रमेश सप्रे

शिक्षकांनी विचार करायला हरकत नाही, ‘आपण विद्यार्थ्यांसाठी फक्त एक रेघ आहोत, रेषा? जस्ट् अ लाईन? जिला फक्त लांबी असते, रुंदी नसते. मग खोली – उंची यांचा विचारच न केलेला बरा. खोली भावनांची (प्रेमाची) नि उंची विचारांची (ज्ञानाची)! – काही अपवाद असतीलही.
…………………………

अगदी अलीकडच्या काळात एक शब्दप्रयोग गावोगावी – घरोघरी – तोंडोतोंडी ऐकू येऊ लागलाय… ऑन् लाइन्!
जो तो उठतो नि म्हणतो मी हे ऑन्लाइन् मागवलं. पूर्वी सुपरमार्केटची जाहिरात करताना- आमच्याकडे तुमच्या गरजेच्या सर्व गोष्टी मिळतात- फ्रॉम पिन् टू पियानो. नंतर त्याहीपक्षा मोठे मॉल्स निघाले. आता तर सार्‍या जगाचंच रुपांतर एका मोठ्या बाजारात झालंय. ग्लोबल मार्केट- ऑनलाइन! विशेष म्हणजे कोविड काळात शिक्षण, अगदी केजीपासून पीजीपर्यंत, ऑनलाइन सुरु झालं. इतकं ऑनलाइन की काही अपवाद वगळता शिक्षक विद्यार्थ्यांना दिसत नाहीत नि विद्यार्थी एकमेकांना आणि शिक्षकांना पाहू शकत नाहीत. जिथं शिक्षणाची गंगा वाहती राहिली पाहिजे त्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी खूप आहेत. कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडलं जाण्याची नि राहण्याची प्रक्रियाच अनेकानेक दूरदूरच्या भागात असून नसल्यासारखी आहे. घरोघरी भ्रमणध्वनी पुरवले गेले त्यांचा उपयोग शिकण्या-शिकवण्याचे काही तास सोडल्यास कसा होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! असो. ओघात आलं म्हणून लिहिलं एवढंच. आपला विषय वेगळाच आहे.

‘बायोस्कोप’ला शब्द आहे ‘जीवनदर्शक’. जीवनाच्या सर्व पैलूंचं दर्शन म्हणजे चिंतन आपण करत असतो. जीवनाचे असंख्य पैलू आहेत. चिंतनही अनंत पैलूंनी करता येतं. आपण सहचिंतन करतोय ऑनलाइन – ऑफलाइन शिकणं- शिकवण्याच्या पद्धतीबद्दल.
या संदर्भात केलेल्या एका निरीक्षणाबद्दल, सर्वेक्षणाबद्दल म्हटलं तरी चालेल. गेलं वर्षभर शिक्षक- पालक- विद्यार्थी म्हणजे मुलं बहुतेक ऑनलाइनच भेटतात. पण मनापासून बोलतात. मनातले विचार – कल्पना – भावना मोकळेपणानं व्यक्त करतात.

पहिल्या काही दिवसांनंतर लॉकडाइन काळात ऑनलाइन शिक्षण सुरू झालं. आरंभी खूप उत्साह, कुतूहल सर्वांनाच होतं. नंतर रुटीन झाल्यावर सारं निण्प्राण कर्मकांडासाखं यांत्रिक होऊन जातं. तसंच इथंही झालं.
या मुलांशी निरनिराळ्या पातळ्यांवर संवाद केला. अनौपचारिक, उत्स्फूर्त संवाद असे तो. काही प्रश्‍न शिक्षणाच्या पातळीनुसार निराळे असले तरी एक-दोन प्रश्‍न समान असायचे.

  • तुम्हाला शाळेची, शाळेतील मित्रमेत्रीणींची आठवण येते का?
    यावर पटकन येणारं उत्तर जवळजवळ सर्ववेळी ‘नाही’ हेच असायचं.
  • तुम्हाला तुमच्या बाईंची, इतर शिक्षकांची आठवण येते का?
    यावर आणखी स्पष्ट उद्गार असायचे – ‘नाही’.
  • तुम्हाला शाळेत जावं असं नाही का वाटत?- या प्रश्‍नाची शब्दरचना मुद्दाम बदललेली. तरीही अनेकांचं उत्तर ‘नाही’ हेच तर काहीजण मुग्ध- निरुत्तर.
    काही कॉलेजमध्ये जाणार्‍या, अभ्यासू, ग्रंथालयात अधिक वेळ घालवणार्‍या विद्यार्थ्यांना विचारलं- तुम्हाला कॉलेज परिसराची (कँपस) स्वप्नं पडत नाहीत? एकमेकांशी बोलताना लायब्ररी निदान कँटीनची दृश्य डोळ्यासमोर तरळत नाहीत?
    या प्रश्‍नाचं उत्तरही ठाम ‘नो(नाही)’ असंच आलं. हे झालं फक्त ऑनलाइन काळाबद्दल. काही दिवसांपासून दहावी, बारावी, कॉलेजचे काही वर्ग हे ऑफलाइन घेतले जाऊ लागले. शिक्षकांचं प्रत्यक्ष दर्शन (!), त्यांना भेटणं, बोलणं, काही विचारणं हे शक्य झालं. त्यावेळी अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्‍न विचारले-
  • ‘ऑन लाइन’ हे ‘ऑफ लाइन’ झाल्यामुळे काही फरक जाणवला का?
    म्हणजे शिक्षण, मित्रमैत्रिणी भेटल्यामुळे, वर्ग – ग्रंथालय – प्रयोगशाळा – मैदान – कँटीन या कँपसच्या पैलूंचा जिवंत, प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे काही फरक – जाणवला का?
    ज्यावेळी याही प्रश्‍नाला अभ्यासू विद्यार्थ्यांकडून ‘नाही’ असंच उत्तर आलं तेव्हा मन खंतावलं, मेंदू काहीसा बधीर झाला? वाटू लागलं हा तंत्रज्ञानाचा विजय की मानवी संबंधांचा र्‍हास?
    अशा प्रश्‍नोत्तरानंतरच्या सैल गप्पात सर्वसाधारण मत हेच आलं की आम्ही मोबाइलवर भेटत होतो – खूप बोलत होतो. स्काइप, व्हिडिओ कॉल्समुळे काही फरकच वाटला नाही.

थोडक्यात ‘व्हर्च्युअल’(आभासी) नि रिअल (वास्तव) अनुभव, व्यवहार (ट्रँझॅक्शन्स) सारखेच वाटत होते. आभासी वास्तवाचा (व्हर्च्युअल रिऍलिटीचा) हा विचार करायला लावणारा अनुभव होता. निदान चिंतनशील, संवेदनक्षम व्यक्तींसाठी. तंत्रज्ञानानं याहीपुढे एक पाऊल टाकून ऑगमेंटेड व्हर्च्युअल रिऍलिटी (तीव्र आभासी वास्तव) म्हणून यशस्वी प्रयोग केले. त्यात विशिष्ट रीतीनं बटणं (अर्थातच) मोबाइलची दाबल्यावर पोकेमॅन प्रत्यक्ष दिसत होता. ‘पोकेमॅन गो’ नावाचे खेळ (व्हिडियो गेम्स) या तंत्रज्ञानानं तयार केले. मुलंच नव्हेत तर युवावर्ग अशा आभासी पोकेमॅन मागे धावून, त्याला स्पर्श करण्यासाठी पकडण्यासाटी बेभान होऊन धावत गेल्यामुळे अनेकांच्या जीवाला हानी सोसावी लागली.

आता प्रश्‍न विचारावासा वाटतो (स्वतःला- म्हणजे शिक्षकांना बालवाडी, शिशुवर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षकांना) की आपण ‘पोकेमॅन’इतकेही खरे वाटत नाही आपल्या विद्यार्थ्यांना? काही हुशार विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारला – ऑनलाइन – ऑफलाइन (म्हणजे शिक्षकांसमोर प्रत्यक्ष) शिकताना फरक जाणवला नाही. ऑन नि ऑफ या परस्परविरुद्ध क्रिया आहेत. दोघात समान आहे ती लाइन. शिक्षकांनी विचार करायला हरकत नाही, ‘आपण विद्यार्थ्यांसाठी फक्त एक रेघ आहोत, रेषा? जस्ट् अ लाईन? जिला फक्त लांबी असते, रुंदी नसते. मग खोली – उंची यांचा विचारच न केलेला बरा. खोली भावनांची (प्रेमाची) नि उंची विचारांची (ज्ञानाची)! – काही अपवाद असतीलही. पण शेवटी अपवाद हे नियम सिद्ध करण्यासाठीच असतात ना!