बहुपयोगी बिमला

0
216
  • अवनी करंगळकर

‘बिमला’ ही वनस्पती बहुवर्गीय वनस्पती, सर्वांच्या परिचयाची असून परसबागेत मोठ्या डौलाने वाढते. परंतु तिला मानाची पसंती दिली जात नाही. या लेखात आपण तिच्या बहुपयोगी गुणांची माहिती करून घेणार आहोत.
बिमली, बिलंबी, कुकुंबर ट्री, बेलांबू अशा इतर नावांनीही तिला ओळखतात. जगभरात ऍव्हिरिया बिलिंबी लिअन या शास्त्रीय नावाने संबोधले जात असून ऑक्झालिडेसी या कुटुंबात तिचा समावेश होतो. दक्षिण-ईशान्य आशियातून मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, सिंगापूर, फिलिपाइन्स, थायलंड, बांग्लादेश, म्यानमार इ. देशात विस्तारत गेली. भारतात प्रामुख्याने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि अंदमान-निकोबार बेटात वास्तव्यास आहे.

सरासरी १५००मिमी. पर्जन्यमान आणि दमट हवामान अनुकूल ठरते. याची उंची १२ ते १५ मी. असून फुले-फळे मुख्य खोडावर आणि जुनाट फांद्यांवर लगडतात. फुले गुलाबी निळसर पिवळट रंगाची असतात. पाने पिच्छाकृती झुपक्यात वाढतात. फळे मांसल, रसरशीत, लंबगोलाकार बोटभर उंचीची असून त्यात ३-५ अगदी लहान आकाराच्या बिया असतात.

‘ऑक्झालिक ऍसिड’ या विशिष्ट द्रवामुळे फळांची चव आंबट- तुरट असते. फळे परीपक्व झाल्यानंतर ३-४ दिवसात गळू लागतात व खराब होतात. फळांपासून आंबट, गोड, तिखट चवीचे लोणचे, सुपारी, खारविलेल्या फोडी, टुटी-फ्रुटी, सासव व माशांच्या कालवणात आंबटासाठी सर्वांच्या पसंतीस खास उतरतात.

फळांच्या रोचक, उष्णतारोधक, पित्तरोधक, जळजळ शमविणार्‍या गुणांमुळे औषधी म्हणून उपयोग करतात. याशिवाय कपड्यांवरील गंजाचे डाग काढण्यासाठी, सुरी-खंजीर साफ ठेवण्यासाठी व देवघरातील तांब्याची भांडी, स्वच्छ करण्यासाठी फळांचा रस वापरतात.
बिमला- उच्चरक्तदाब, गुदद्वारातील उष्णता कमी करणे, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, चेहर्‍यावरील मुरुम जिरविण्यासाठी फळांचा रस कामी येतो.
कृत्रिमरीत्या केळी पिकवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. यावर काम सुरू आहे. विविध पक्षी, मधमाश्या आणि फुलपाखरे यांचे आवडते खाद्य आहे.