त्रिफळा ः महा, अमृततुल्य औषध

0
399
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज, पणजी)

त्रिफळा हे फक्त बद्धकोष्ठतेचे औषध नसून त्याचा उपयोग अगदी केसांपासून ते पायांपर्यंत होतो, फक्त त्याची उपाययोजना योग्य मात्रेत, योग्य पद्धतीने, योग्य अनुपानाद्वारे व रोग्याची प्रकृती-बल याचा विचार करूनच व्हायला हवी.

कॉन्स्टिपेशन म्हणजेच मलावरोध ही अगदी सर्रास आढळणारी समस्या बर्‍याच जणांना भेडसावते. आजकाल बरेच लोक आयुर्वेद औषधोपचारासाठी वळले आहेत. पण अर्धवट माहितीच्या आधारे स्वतःची चिकित्सा स्वतःच करू लागले आहेत. आयुर्वेद औषधांना काहीच ‘साईड इफेक्ट’ नसतो असाही बर्‍याच जणांचा समज आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेसाठी सरळ ‘त्रिफळा’ चूर्ण आणून ते सेवन करतात. परिणामी काहींना बरे वाटते, काहींवर विपरित परिणाम होतो. असे का होत असेल बरे?
त्रिफळा हे एक आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले महान औषध आहे. अमृततुल्य आहे. पण त्याचा उपयोग वैद्याच्या सल्ल्याशिवाय करू नये. त्रिफळा हे फक्त बद्धकोष्ठतेचे औषध नसून त्याचा उपयोग अगदी केसांपासून ते पायांपर्यंत होतो, फक्त त्याची उपाययोजना योग्य मात्रेत, योग्य पद्धतीने, योग्य अनुपानाद्वारे व रोग्याची प्रकृती-बल याचा विचार करूनच व्हायला हवी.

त्रिफळा म्हणजे तीन फळं एकत्र करून बनवलेले औषध. तसे पाहिले तर किरकोळ औषध आहे. पण दिव्य परिणाम देणारे हे औषध आहे. घटकद्रव्यामध्ये आवळा, बेहडा व हिरडा ही तीन फळे आहेत. ह्या तीनही फळांची बी काढून टाकायची व जो बाहेरून मांसल भाग औषधी असतो, त्याचा उपयोग त्रिफळा चूर्णासाठी केला जातो. ज्या मात्रेत ही तीनही फळे एकत्र केली जातात, त्या अनुषंगाने त्याचे कार्य बदलते. म्हणजे जर हिरडा तीन भाग, बेहडा दोन भाग व आवळा एक भाग या मात्रेत जर एकत्र केली तर हे चूर्ण ‘मृदु विरेचक’ होते. पण हे औषध सेवन करताना वैद्याचा सल्ला जरूर घ्यावा. कारण रोग्याच्या प्रकृतीनुसारच या औषधाची मात्रा ठरवावी लागते.
हेच चूर्ण सकाळी रसायनकाळी म्हणजे सकाळी उठल्यावर तूप व साखरेबरोबर सेवन केल्यास रसायनाप्रमाणे कार्य करते. साधारण १/२ चमचा त्रिफळा चूर्ण १ चमचा तूप व १ चमचा साखरेबरोबर सेवन केल्यास रसायनाचे फायदे शरीराला मिळतात. सातही धातूचे पोषण ह्या त्रिफळा चूर्णाद्वारे होऊ शकते.

तीनही फळे समभाग वापरूनसुद्धा त्रिफळा चूर्ण बनविले जाते- म्हणजे १ किलो आवळे, १ किलो बेहडा व १ किलो हिरडा. अशा प्रकारे बनविलेले चूर्णसुद्धा वापरले जाते, हे चूर्ण अगदी केसांपासून संपूर्ण शरीराची काळजी घेते. केस गळत असल्यास, पिकत असल्यास समभाग वापरून तयार केलेले चूर्णाची पेस्ट करावी, त्यात लिंबाचा रस घालावा व एका लोखंडी भांड्यात मेंदिप्रमाणे कालवून ठेवावी. साधारण चोवीस तासाने ही पेस्ट काळी पडल्यावर केसांना मेंदिप्रमाणे लावावी व २ ते ३ तासांनी कोमट पाण्याने केस धुवावेत. कोणताही शॅम्पू साबण लावू नये.
नेत्ररोगांमध्ये मायोपिया, हायपरमेट्रोपियासारख्या रोगांमध्ये त्रिफळाचूर्णाचा जादूसारखा फायदा होतो. वैद्याच्या सल्ल्याने ‘त्रिफला घृता’ची तर्पण बस्ति करून घ्यावी. चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी त्रिफळाचूर्ण गायीच्या तूपात कढवून हे तूप गाळून ठेवावे व हे त्रिफलासिद्ध घृत रोज सकाळी- संध्याकाळी अंजन/काजळाप्रमाणे डोळ्यात घालावे. डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना खाज, डोळ्यात टोचल्यासारखे वाटणे अशा अनेक नेत्ररोगात त्रिफळाचा फायदा होतो.

तारुण्यपिटिका किंवा मुखदुषिकामध्ये याच त्रिफळा चूर्णाचा पॅक तयार करून चेहर्‍यास लावल्यास, चेहरा स्वच्छ, नितळ होतो. चेहरा तेलकट असल्यास त्रिफळा चूर्ण पाण्याबरोबर मिसळून पेस्ट करावी.
चेहर्‍याची त्वचा रुक्ष अथवा कोरडी असल्यास त्रिफळा चूर्ण दुधात, तूपात किंवा लोण्यात मिसळून फेसपॅक तयार करावा व पूर्ण चेहर्‍यावर एक पातळ थर लावून सुकतपर्यंत ठ्‌ेवावा व नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकावा. चेहरा नितळ होतो.
त्वचेवर कुठेही घामामुळे म्हणा किंवा इतर कोणत्याही संसर्गामुळे बारीक पुरळ आलेले असेल व संपूर्ण अंगाला खाज येत असेल तर हे त्रिफळा चूर्ण पावडरप्रमाणे अंगाला घासावे व हेच त्रिफळा चूर्ण वैद्याच्या सल्ल्याने पोटात सेवनही करावे. मात्रा व अनुपानासाठी वैद्याचा सल्ला घ्यावा.
शीतपित्तामध्ये अंगाला खाज व गांधी उठतात. अशा अवस्थेत त्रिफळा चूर्णाचे मृदुरेचन घ्यावे व हीच पावडर सर्वांगाला घासावी. लगेच उपशय मिळतो. त्रिफळा चूर्णाचा लेप लावावा. त्वचा नितळ व तेजयुक्त होते. तारुण्य परत येते.

मुखरोगात म्हणजे तोंडाला वास येत असल्यास, दात किडले असल्यास, तोंड आले असल्यास त्रिफळाच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. मुखशुद्धी होते.
कुठेही जखमा झाल्या असल्यास किंवा डायबिटिक जखमेमध्ये त्रिफळाच्या काढ्यानवे जखम धुतल्यास जखम साफ होते व जखम भरून येण्यास मदत होते.
पचनशक्ती सुधारण्यासाठी फॅटी लिव्हरमध्ये किंवा गॉल स्टोनमध्येदेखील त्रिफळा चूर्ण पोटामध्ये सेवन केल्यास उपशय मिळतो.
चरबी पातळ करण्यासाठी त्रिफळा चूर्ण हे एक वरदानच आहे. सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्ण मधाबरोबर सेवन करावे. हेच चूर्ण पोटावरती चरबी जास्त असल्यास गोमूत्रामध्ये कालवून लेपासारखी लावावी किंवा पोट, मांड्या, काखेत, दंडामध्ये जिथे जिथे चरबी लोंबते असे वाटत असेल तिथे त्रिफळा चूर्ण सुके घासावे (उद्वर्तन) करावे.

लायपोमा म्हणजे चरबीच्या गाठी शरीरावर कुठेहीआल्यास त्रिफळाचूर्णाचा पाण्यात/गोमूत्रात पेस्ट करून त्या गाठीवर लावल्यास, गाठीमधील चरबी वितळते.
सध्या ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे बर्‍याच मुलांचे डोळ्यांचे आजार वाढले आहेत. अशा सर्व मुलांना एक चिमुटभर त्रिफळाचूर्ण तूपसाखरेबरोबर चाटायला दिल्यास साधारण महिन्यातून ८ ते १० दिवस निश्तिच फादा होईल. तसेच १ चमचा त्रिफळा चूर्ण, तांब्याभर पाण्यात टाकून काढा बनवावा. हा काढा गाळून नंतर कोमट असताना सकाळी उठल्यावर सगळ्यांनीच डोळे धुतल्यास घरातील सगळ्याच मंडळींच्या डोळ्यांच्या तक्रारी नक्कीच दूर होतील.
लॉकडाउनच्या काळात ज्यांची ज्यांची वजनं वाढली आहेत त्यांनी त्रिफळा चूर्ण मधाबरोबर सेवन करावे. तसेच त्रिफळाचूर्णाचे उद्वर्तन करावे.

ज्यांना पार्लरमध्ये जायला भीती वाटत असेल व ज्यांच्या केसांच्या समस्या वाढल्या आहेत त्यांनी त्रिफळा चूर्णाचा काढा करून केस धुवावेत. त्रिफळाची पेस्ट करून मेंदीप्रमाणे केसांना लावावी.
सर्वांत महत्त्वाचे- व्याधिप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी- प्रौढांनी पाव चमचा त्रिफळा चूर्ण व छोट्यांसाठी १ चिमुटभर त्रिफळाचूर्ण तूप व साखरेतून सकाळी अनशापोटी सेवन करावे.
असे हे त्रिफळाचूर्ण दिव्य, अमृततुल्य औषध आहे. त्याचा वापर योग्य मात्रेत वैद्याच्या सल्ल्यानेच करावा.