>> आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
राज्यातील कोविड-१९ तज्ज्ञ समितीच्या बैठकीत कोरोना होम आयसोलेशन पर्याय स्वीकारणार्या रुग्णांना होम आयसोलेशन कीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम आयसोलेशन कोरोना रुग्णांना आयसोलेशन कीटचे वितरण स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. होम आयसोलेशनला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या कीटमध्ये डिजिटल थर्मामीटर, ऑक्सिमीटर, स्पोयरोमीटर, सॅनिटायझर्स, एन९५ मास्क, ग्लोज, व्हिटॅमीन सी आणि डी गोळ्या आणि एचसीक्यू गोळ्यांचा समावेश असेल. हे कीट खरेदीसाठी आवश्यक सरकारी प्रक्रिया लवकरच मार्गी लावली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
गोमेकॉत आणखी एक वॉर्ड
गोमेकॉमध्ये कोविड रुग्णांसाठी आणखी एक वॉर्ड उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, एखाद्या वेळी इस्पितळात खाटा उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था त्वरित करण्याची सूचना गोमेकॉच्या डीनना करण्यात आली आहे. गोमेकॉमध्ये आणखी एक खास वॉर्ड लवकरच कोरोना रुग्णांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.
मडगावातील नव्या कोविड
इस्पितळाची आज पहाणी
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शुक्रवार ११ रोजी नवीन कोविड इस्पितळ रुग्णांसाठी खुले करण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, त्या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. आज १२ रोजी या नवीन इस्पितळाची डॉक्टर आणि जीएसआयडीच्या अधिकार्यांकडून संयुक्तपणे पाहणी केली जाणार आहे. तेथे कोविड रुग्णांसाठी साधनसुविधा उपलब्ध केल्यानंतर रुग्णांना दाखल करून घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्या इस्पितळात सुरुवातीला २५० खाटांची सोय केली जाणार असून गरजेनुसार खाटा वाढविण्यात येतील, असेही राणे यांनी सांगितले.
प्लाझ्मामुळे रुग्णांना जीवदान
राज्यात प्लाझ्मा थेरपी सुरूच ठेवली जाणार आहे. प्लाझ्मा थेरपी काही राज्यात अयशस्वी ठरली आहे. तर, गोव्यात प्लाझ्मा थेरपीमुळे रुग्णांना जीवदान मिळत आहे. राज्यात प्लाझ्मा दानाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. गोमेकॉमध्ये प्लाझ्माच्या ७० पॅक उपलब्ध आहेत. प्लाझ्मा दात्यांच्या कुटुंबीयांना योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
कोविड-१९ तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय
होम आयझोलेशनखालील रुग्णांना मोफत होम आयझोलेशन कीट.
गोमेकॉमध्ये लवकरच कोविड रुग्णांसाठी आणखी खास वॉर्ड.
दंत महाविद्यालयातील नर्सची गोमेकॉमध्ये नियुक्ती.
राज्यातील कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोविड १९ च्या विविध प्रक्रियांना गती.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाची डॉक्टर आणि जीएसआयडीच्या अधिकार्याकडून संयुक्त पाहणी.
जीईएलच्या सहकार्याने कोविड १९ शी संबंधित सर्व दस्तऐवजाचे डिजिटलायझेशन.