शाळा सुरू करण्याचा निर्णय चर्चेअंती

0
285

>> मुख्यमंत्री ः पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापकांशी विचारविनिमय करणार

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राज्यात येत्या २१ सप्टेंबरपासून ९ वी ते १२ वी तसेच, महाविद्यालयाचे वर्ग घेण्यासाठी पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघटना व इतरांशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
कुटुंबात कोरोनाचा रुग्ण असल्यास किंवा होम आयसोलेशनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात सहभागी करुन घेतले जाणार नाही असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत राज्यात येत्या २ ऑक्टोबरपासून स्वयंपूर्ण गोवा या नवीन मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे. उच्च शिक्षण संचालनालय आणि गिपार्ड या दोन्ही खात्यांनी संयुक्त विद्यमान गावांना आत्मनिर्भर बनविण्याचा आराखडा तयार केलेला आहे. त्या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत २७ योजनांचा लाभ राज्यातील नागरिकांना मिळाला आहे. केंद्र सरकारच्या योजना विविध खात्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. राज्यातील जनधन खाते असलेल्या महिलांना महिना ५०० रुपये मानधन दिले जात असून आगामी तीन महिन्यांपर्यंत मानधन झाले जाणार आहे. मध्यम व लघू व्यावसायिकांना आर्थिक साहाय्य केले जात आहे. शेतकरी व इतरांना साहाय्य केले जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

‘प्रत्येकाने योग, प्राणायाम करावा’
प्रत्येक नागरिकाने कोरोनाशी लढा देण्यासाठी तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम, योग आदी करण्यावर भर द्यावा असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल घेतलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत आपल्या आरोग्याविषयीची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आपली दिनचर्या कशी होती. आपण प्राणायाम, योग कसा करीत होतो. कशा प्रकारचा आहार घेत होतो व त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कशी वाढली याची माहिती देतानाच कोरोना रुग्णांबरोबरच आता सगळ्यांनीच आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अशाच दिनचर्येचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आपणाला कोणताही त्रास नव्हता. केवळ एकच दिवस थोडीशी अंगदुखी व डोकेदुखी होती. नंतर आपणाला काहीही त्रास जाणवले नाहीत. पण तरीही आपण रोज प्राणायाम, योग करण्यावर भर दिला. सकारात्मक अशी विचारसरणी ठेवली. त्याचा आपणाला खूप फायदा झाला. कोरोनाची लक्षणे दिसल्यास विनाविलंब चाचणी करून घ्यावी व इस्पितळात उपचारासाठी जावे, अशी सूचना त्यांनी केली. पुढील ७ दिवस आपण आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानावरून कामकाज हाताळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचे
श्रेय भलत्यांनाच

नवी दिल्लीत कोरोना नियंत्रणाखाली आणण्याबाबतीत आता भलतेच लोक श्रेय घेऊ लागले असले तरी केंद्र सरकारने तातडीने उचललेल्या पावलांमुळेच नवी दिल्लीत कोरोना रुग्णांचा आकडा खाली आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. नवी दिल्लीत केंद्र सरकारने योग्य प्रकारे कोरोना व्यवस्थापन केले. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे नवी दिल्लीत कोरोना नियंत्रणाखाली आला. केंद्राने नवी दिल्लीत कोविड इस्पितळे सुरू केली त्यामुळे तेथे कोरोना नियंत्रणात आला, असा दावा सावंत यांनी केला.