हृदयास सांभाळा…!

0
343

  • डॉ. राजेंद्र रा. साखरदांडे
    साखळी

हृदयविकार असलेल्या लोकांनीही स्वतःची स्वतः काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःला कोरोना होऊ न देणे हे महत्त्वाचे आहे. कारण नसताना घराबाहेर पडू नका. बाहेर पडलातच तर कुणाच्याही जवळपास जाऊ नका. मास्क वापरा. बाहेरून परत आल्यावर अंगावरचे कपडे धुवायला टाका. स्वतः आंघोळ घ्या व मगच घरच्यांच्या जवळ जा.

हृदयास सांभाळा म्हणजे प्रेमात पडा असे नाही म्हटले मी! खरे तर प्रत्येक माणसाने आपल्याच प्रेमात पडायला हवे… स्वतःच्या प्रत्येक अवयवाची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. नाहीतर उतारवयात जेव्हा नाना प्रकारच्या रोगांशी जवळीक वाढते तेव्हा पूर्वी केलेल्या मस्तीची आठवण येते व मग आम्ही पस्तावतो… असे न करता वेळेवर सगळ्या गोष्टी होणे गरजेचे असते.

मला विचाराल तर मीही म्हणेन…स्वतःवर लक्ष द्यायला व त्याची डागडुजी करायला वेळ, पैसे कुणाकडे असतात? जन्मल्यापासून शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, मुले, बायको… मग मुलांचे वगैरे वगैरे. निवृत्त झाल्यावर स्वतःवर विचार करायला उसंत मिळते… तोवर सर्वकाही संपलेले असते.

आज जागतिक हृदयविकार दिन आहे. आज प्रत्येकजण कोरोनावरच एकटक लक्ष देऊन राहिलेला आहे. बाकी कुणाकडेही लक्ष द्यायला त्याला वेळच नाही. कोरोनाने सर्वांचा घात केलाय. त्यात को-मॉर्बिड आजार असलेले वडीलधारी माणसं तर उघड्यावर पडलीत. प्रेशर, मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, अशा अनेक विकारांनी पीडित लोक तर मरत आहेत.

आज आपण या दिनी फक्त हृदयविकारावरच बोलू. पूर्वी थोडेफार लोक हृदयविकाराने पीडित व्हायचे. फक्त पन्नाशीनंतर लोकांना हृदयविकार व्हायचा. आला तरी त्यांना झटका थोडाफार बसायचा. परत एकदा बाकी शाबूत राहिलेले हृदय दमदारपणे काम करायचे. फार थोडेच लोक मरायचे. मुलांमध्ये, पोरवयात हृदयाच्या झडपेचे व्यंग दिसून यायचे व त्यावर झडपा बदलून देत असत. आजकाल झडपेचे आजार कितीतरी कमी झालेत… पण हृदयविकारांचे प्रमाण फार वाढलेय.

पूर्वी आम्ही म्हणायचो… हृदयविकाराचे प्रमाण शहरी भागातच दिसून यायचे. आजकाल गोव्याच्या लहान गावागावात हृदयविकाराचे प्रमाण वाढतेय. याची कारणे शोधणे गरजेचे आहे.

कारणे –
१) जेवणा-खाण्यात झालेला बदल
२) वाढते धूम्रपान व इतर तंबाखूचे सेवन
३) व्यायामाचा अभाव
४) ताण-तणाव
५) आनुवंशिक
६) मानवी जीवनातील धडपड … व धडधड वाढलेली.
आम्ही पूर्वी म्हणायचो… वयाची ४५ – ५० झाली की डॉक्टरी तपासणी सुरू. मग रक्तदाब, रक्त तपासणी, ई.सी.जी. सगळे करायचे. काही सापडले तर पुढच्या तपासण्या. वेळेवर औषधे, उपचार… हे चालत रहायचे. पुष्कळ लोक म्हणायची आपल्याला काहीही होत नाही. तेव्हा डॉक्टरांकडे का जायचे? असे म्हणणार्‍या वल्लीच जेव्हा येन केन प्रकारेण डॉक्टरांकडे येतात तेव्हा थोड्यांना रक्तदाब वाढलेला सापडतो… रक्तात साखर वाढलेली असते… त्याला कॅन्सरसारखी व्याधी लागलेली असते.

आजकाल फक्त ३० – ३५ च्या वयातच स्वतःला डॉक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. कारण आजकाल ३०च्या वयाचा पोरगा रक्तदाब, मधुमेह वगैरे आजाराने पछाडलेला सापडतो. आज या वयातले वेळेत डॉक्टरकडे जात नाहीत व ते दगावतात व जास्त हृदयविकारानेच दगावतात. समाजातील ‘क्रीम’ (मलई) जी आपण म्हणतो ते डॉक्टर, इंजिनिअर, टेक्निकल लोक, सीइओ, ऑफिसर यांना हा रोग जडलेला दिसतो.

कारणे –

  • चार तासांपेक्षा जास्त तास हे झोपत नाहीत.
  • कामावरचा ताण… ठरलेले काम अमुक वेळेत व्हायला हवेच.
  • हा ताण कमी करण्यासाठी जवळ केलेली व्यसने- धूम्रपान, इतर तंबाखूचे सेवन, दारू.
  • वेळेवर जेवण- खाण नाही… खाल्ले तर तयार थाळ्यातले शिल्लक जेवण.
  • व्यायाम तर नाहीच कारण व्यायाम करायला वेळ कुठे आहे? झोपायला वेळ नाही तर व्यायाम करायला वेळ कुठे आहे? पगार एवढा मिळतो की सांगता सोय नाही.
    त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते. नैसर्गिकरीत्या आमच्या शरीरात यकृतातील हिपॅटिक पेशी त्याची निर्मिती करतात. आमच्या शरीरात ३५ ग्रॅम कोलेस्टेरॉल असते. ६८ किलो वजनाचा इसम दर दिवशी १ ग्रॅम कोलेस्ट्रॉल पचवतो.

आजकाल कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ जास्त खाल्ले जातात. अंड्यातील पिवळा बलक, लिव्हर, लोणी, तूप, ओएस्टर, लॉबस्टर, क्रब मीट, सुंगठे, क्रीम, चीज यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण भारी असते.
पुष्कळ लोकांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे रक्तात नेहमी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले असते. अशा लोकांना हृदयविकार जडण्याचे प्रमाण फार आहे. त्यातील ८५% लोकांना ते माहीतही नसते. ३५-४०च्या वयात आल्यावर हृदयविकाराचा घाला पडला तेव्हाच ते समजते. त्या अगोदर रक्तदाबावरून समजा समजले तर भले झाले म्हणायचे.
सोशल मिंडियावर आजाराविषयी कोलेस्ट्रॉलच्या हजारो खोट्या बातम्या येतच असतात. त्यावर जास्त विश्‍वास न ठेवता डॉक्टरी तपासणी करून घ्या व त्यावर योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे.

खिशात करोडो रुपये, पण छातीत मात्र हृदयविकाराने त्रस्त झालेले कमकुवत हृदय… काहीही कामाचे नाही. हल्ली मनावरचा ताण एवढा वाढलाय की मानवी जीवनात प्रचंड उलथापालथ झालेली आपल्याला आढळते. कामावरचा ताण, अमुक काम अमुकच वेळेत व्हायला हवे याचा ताप, त्यात जेवण, झोपणे तर बाजूलाच राहिले. योग, व्यायाम करायला तर वेळच नाही. व्यायामावरची हजारो रुपयांची मशिने धुळीत पडलेली असतात. वेळ नाही ना.

प्रत्येक माणसाने आपल्या दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक ठरवलेले बरे नाहीतर लकवा येऊन घरी केव्हा पडाल हे समजणार पण नाही. वेळात वेळ काढून दररोज ४५ मिनिटे ते एक तास फिरायला जाणे… आठवड्यातून पाच दिवस तर नक्कीच. दररोज व्यायाम करणे हे योग्य त्या जाणकार लोकांकडूनच सल्ला घेऊन करणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर ससा पळतो म्हणून मी पळतो असे व्हायला नको.
आपल्या शेजार्‍याने ट्रेडमिल आणली म्हणून मीही आणणे. आपले मित्र सकाळी धावतात, पळतात, डोंगर चढतात, पोहायला जातात, हे काही नाही. डॉक्टरी सल्ल्याशिवाय हे प्रकार करणे योग्य नाही.
एकटा साठ वर्षे वयाचा इसम मित्राबरोबर चढत असताना पडला व तिथल्या तिथे मरण पावला. एकटा वाढदिवसाला कुणा घरी चढत चढत गेला, रात्री ११-१२ला हॉस्पिटलमध्ये हृदयाचे ऑपरेशन करण्यापूर्वी टेबलवर ठार…!

तरुणाईत व्यसने, दारू, तंबाखू, निद्रानाश, चरस, गांजा, सिगरेट… व अंधाधुंद खाणे यावर आवर घालणे गरजेचे आहे.
रीस्क कॅलक्युलेटर्स जाणून घ्यायची गरज आहे. वर सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेणे… चांगले आरोग्य जपण्यास तुम्हाला मदत करतील. आजकाल प्रत्येक कंपनीच्या ऑफिसात, कारखान्यात, प्रत्येक कामाच्या ठिकाणी मधल्या मध्यंतरच्या काळात योगाची प्रवचने व त्यावर प्रात्यक्षिक दाखवली व केली जातात व ती प्रत्येकाला करावी लागतात. त्याने मनावरचा व शरीरावरचा ताणही कमी होतो. हल्ली तरुण पीढीचा र्‍हास होत चाललाय हे दिसून येते.
त्यावर आजकाल कोविड-१९चा जगावर व मानवजातीवर एवढा परिणाम झालेला आहे की जगच अस्ताव्यस्त झाले आहे. जनतेमध्ये मरणाचे प्रमाण फार वाढलेय. त्यात वर म्हटल्याप्रमाणे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कँसर वगैरे आजारांवर उपचार घेणार्‍यांची तर धडगतच राहिली नाही. मरणार्‍या दहा जणांपैकी सात लोकांना कुठलातरी रोग जडलेला आहे. सरकारला त्याचे सोयरसुतकही पडलेले नाही. म्हणजे त्या लोकांनी मरायचे का? त्यांची काळजी त्यांनी स्वतः घ्यावी.

हृदयविकार असलेल्या लोकांनीही स्वतःची स्वतः काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःला कोरोना होऊ न देणे हे महत्त्वाचे आहे. कारण नसताना घराबाहेर पडू नका. बाहेर पडलातच तर कुणाच्याही जवळपास जाऊ नका. मास्क वापरा. बाहेरून परत आल्यावर अंगावरचे कपडे धुवायला टाका. स्वतः आंघोळ घ्या व मगच घरच्यांच्या जवळ जा. कुणीही इसम बाहेर गेल्यास त्यानेही हेच करावे. नाहीतर वडिलधारी माणसं घरातंच राहतात. बाहेर जाणारी घरी कोविडची साथ घरात आणतात. म्हातार्‍या माणसांना कोविडची लागण होते व ते दगावतात.. असे होऊ देऊ नका.
आता हृदयविकार टाळण्यासाठी काय कराल?….

  • चांगले पौष्टीक, नैसर्गिक, सेंद्रीय खते वापरून उगवलेल्या भाज्या खाणे. फास्ट फूड खाऊ नये. घरच्या घरी बनवलेल्या पदार्थांचेच सेवन करा.
  • स्वच्छ, नैसर्गिक वातावरणात रहा. आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा तरी १ तास चाला. व्यायाम, कसरत, योगा करा. मन आनंदी ठेवा.
  • व्यसने टाळा. दारु, सिगरेट, विडी, तंबाखू गावागावात, गोव्यातील नाक्या-नाक्यावर, गाडे, टपरीवर अफू, गांजा हमखास सापडतो व तो शाळा, हायस्कूल, कॉलेज, विद्यापीठ यांच्यासमोरील खोलीत, गाडे व दुकानावर मिळतो.
  • डॉक्टरी तपासणी करून घ्या. स्वतःचे व कुटुंबातील प्रत्येकाचे आरोग्य जपा. आरोग्य हे महत्त्वाचे आहे. हे समजायला शिका. नाहीतर बैल गेला नि झोपा केला… असे व्हायला नको.
    हा लेख लिहिताना मला साखळीचे हृदयतज्ज्ञ डॉ. प्रणव बुडकुले व हेल्थ-वेचे वरिष्ठ हृदयतज्ज्ञ डॉ. निखिल सोनटक्के यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. काळजी घ्या हं.