हृदय महत्त्वाचे आहे! निरोगी हृदयाला कोविडचा धोका नाही

0
689
Doctor holding heart
  • डॉ. शिरीष एस. बोरकर
    (एम.एस. एम.सीएच. डी.एन.बी.)
    कार्डिओव्हास्न्युलर आणि थोरासिक सर्जरी- विभाग प्रमुख आणि प्राध्यापक, गो.मे.कॉ.

ज्या रुग्णांना हृदयरोगाच्या समस्या आहेत किंवा ज्यांना हृदयरोगाचा जास्त धोका आहे त्यांनी कोविड महामारीच्या काळात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

१९९९ साली वर्ल्ड हार्ट फेडरेशन (डब्लूएचएफ) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्लूएचओ) यांनी २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक हृदय दिवस साजरा करावा असे जाहीर केले.
त्यावेळी डब्लूएचएफचे अध्यक्ष अँटोनी बेज द लूना यांच्या मनात ही जागतिक हृदय दिन साजरा करण्याची कल्पना आली जी एक जागतिक चळवळ बनली असून या दिवशी प्रत्येक व्यक्ती, कुटुंबं, समाज आणि सरकारतर्फे संपूर्ण जगभर निरनिराळे उपक्रम राबवले जातात ज्यामध्ये ते आपल्या तसेच दुसर्‍याच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतात. या चळवळीमधून सगळ्या देशांमधील तसेच सर्व स्तरातील डब्लूएचएफच्या शाखांमधील लोक हृदयाच्या रक्तवाहिन्यातील आजाराच्या (सीव्हीडी) ताणाविरुद्ध लढा देतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रमांद्वारे संपूर्ण जगात निरोगी हदय राखण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करतात. या चळवळीत प्रत्येक व्यक्तीला, रक्तवाहिन्यांच्या आजारांना नियंत्रणात किंवा दूर ठेवण्यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे उपाययोजना करण्यास प्रेरित केले जाते.

‘कार्डिओव्हास्न्युलर डिसीज- सीव्हीडी- हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आजार’ हा शब्दसमूह हृदयाचा कोणताही आजार, तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा आजार किंवा रक्तवाहिन्यांचा आजार दर्शवतो. रक्तवाहिन्यांचा आजार हा जगातला आजचा प्रथम क्रमांकाचा घातक आजार असून जगभरात एकूण १८ दशलक्ष मृत्यू दरवर्षी यामुळे होतात. याचाच अर्थ जवळजवळ १.५ दशलक्ष मृत्यू हे दर महिन्याला सीव्हीडीमुळे होतात! यापैकी ८०% हे कोरोनरी हृदयविकार (हृदयाघात किंवा हार्ट अटॅक) आणि सेरेब्रोव्हास्न्यूलर आजार (पक्षाघात, स्ट्रोक्) यांमुळे होतात. त्यामुळेच ही परिस्थिती बदलण्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.
गोवा मेडिकल कॉलेजच्या कार्डिओव्हास्न्युलर आणि थोरासिक सर्जरी विभाग आणि हृदयशास्त्र विभाग, त्यांच्या गोमेकॉमधील स्थापनेपासूनच या चळवळीचे क्रियाशील भागीदार आहेत. जसे पोस्टर स्पर्धा, वॉकाथॉन्स, मॅराथॉन्स, भाषणं आणि वर्तमानपत्रात लेख, निरोगी हृदयाची काळजी आणि सवयींबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी या दोन्ही विभागांद्वारे विविध उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असतात.

जगातील आणि गोव्यातील सीव्हीडीची परिस्थिती सारखीच आहे. हा रोग तरुण व्यक्तींमध्ये जास्त बघायला मिळतो. या वर्षी कोविड महामारीमुळे ही स्थिती आणखीनच वाईट झालेली आहे. कोविडमुळे फक्त व्हायरल न्युमोनियाच होत नाही तर रक्तवाहक संस्थेवर त्याचे मुख्य परिणाम होताना दिसतात. ज्या रुग्णांमध्ये रोगास कारणीभूत धोकादायक लक्षणे आहेत जसे पुरुष, उतार वय, मधुमेह, उच्चरक्तचाप आणि स्थूलपणा असलेले तसेच ज्या रुग्णांना अगोदरपासूनच हृदय रक्तवाहिन्या किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार झालेले आहेत, अशा रुग्णांना कोविड-१९ची बाधा होण्याची तसेच कोविड-१९ मुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. मोठ्या प्रमाणात कोविड-१९ रुग्णांमध्ये हृदयावर आघात होऊ शकतो ज्यामुळे दवाखान्यामधील रुग्णांना मृत्यूचा धोका संभवतो. ऍक्यूट कोरोनरी सिंड्रोम- एसीएस- आणि थ्रॉंबोएम्बोलिझम- मायोकार्डायटीस म्हणजे दीर्घकाळासाठी बिछान्यावर असलेल्या रुग्णांच्या रक्तवाहिन्यांवर होणारे दुष्परिणाम हे हृदयक्रिया बंद पडण्याचे दुसरे एक मोठे कारण आहे. बर्‍याच रुग्णांमध्ये अनियमित हृदयाचे ठोके तपासणीत आढळून आले आहेत, जे कोविड-१९च्या दुष्परिणामांमध्ये भरच घालतात.

हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी लहान वयाकडे बघण्याचे काहीच कारण नाही. जेव्हा की हृदयाचे आजार होण्याचा धोका पुरुषांमध्ये तिशीच्या पहिल्या टप्प्यात आणि महिलांमध्ये पन्नाशीच्या पहिल्या टप्प्यात वाढत असताना तरुण प्रौढ वयात तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला मध्यवयातच बाधक ठरतील. मी माझ्या रुग्णांचे जेव्हा समुपदेशन करतो, तेव्हा आपल्या शरीराची तुलना मी नेहमी आपल्या स्वतःच्या कारसोबत करतो, जी आपल्याला स्वतःच्या शरीरापेक्षाही जास्त प्रिय असते. हृदयाच्या बाबतीत तुम्ही कितीही तरुण असाल, पण मी लोकांना त्यांच्या विशीच्या पहिल्या टप्प्यातच त्यांच्या या आश्‍चर्यकारक पंपाची मालकी स्वीकारण्यास सांगतो, जो आपल्या शरीराला बळ देतो. याचा अर्थ तुम्ही त्यामध्ये योग्य इंधन घातलं पाहिजे, नियमितपणे त्याला चालवलं पाहिजे आणि रस्त्यावर त्याची तपासणी घेतली गेली पाहिजे- जशी आपण आपल्या कारची घेतो.

तुमच्या हृदयाची काळजी धेताना… प्रत्येकाने हे जाणून घेतले पाहिजे की कोणत्या गोष्टींमुळे हृदयावर वाईट परिणाम होतो. त्यांना हृदयविकार होण्याचे रीस्क फॅक्टर्स म्हणजेच धोकादायक घटक म्हणतात. हा बहुतांशी जीवनशैलीचा आजार असून अनेक धोकादायक घटक हे आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहेत – बैठी जीवनशैली, चुकीचा आहार सेवन, व्यसने जसे धुम्रपान आणि दारूचे सेवन, ताणतणाव आणि लठ्ठपणा. इतर धोकादायक घटकांमध्ये अनियंत्रित मधुमेह आणि उच्चरक्तचाप यांचा समावेश होतो. असे घटक जे कोणाच्याही नियंत्रणापलीकडचे आहे ते म्हणजे हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास, वय, लिंग आणि अनुवंशिकता. हे आता पक्के निष्कर्षित झालेले आहे की पालकांपैकी एकाला किंवा भावंडांपैकी एकाला जर हृदयविकाराचा त्रास असेल तर दुसर्‍या भावंडाला हा रोग होण्याचा जास्त धोका आहे. वाढत्या वयाबरोबर या रोगाचा धोका वाढत जातो. ५५ वर्षांनंतर हृदयविकाराचा धोका हा प्रत्येक दशकानंतर दुपटीने वाढतो. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आहे.
म्हणून एकदा धोकादायक घटकांची माहिती झाल्यानंतर बचावाच्या किंवा सुधारणेच्या उपायांची योजना करणे सोपे होते. म्हणूनच हृदयाच्या आरोग्याचे व्यवस्थापन जितके लवकर केले तितके चांगले असते. त्यातल्या त्यात कौटुंबिक इतिहास असणार्‍या कुटुंबांमध्ये तर हे आवश्यक ठरते.

१) नियमित शारीरिक व्यायाम –
दिवसातून ३० ते ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करा, कमीत कमी आठवड्यातून पाच दिवस आवश्यक. कोणताही तुमच्या आवडीचा व्यायाम प्रकार निवडा- जसे चालणे, पोहणे, क्रिडाप्रकार खेळणे किंवा तुमच्या कुत्र्याबरोबर फिरणे. तुमच्या व्यायाम प्रकारात मधून मधून बदल करत रहा ज्यामुळे तो कंटाळवाणा होणार नाही. व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीर संचालन (वॉर्मिंग अप) आणि स्ट्रेचिंगचे व्यायाम करण्याचे लक्षात ठेवा. बसण्याच्या स्थितीत जास्त काळपर्यंत राहू नका, विशेषतः कार्यालयात काम करताना किंवा दीर्घ प्रवासात.

२) व्यसनांपासून दूर रहा –
धुर्मपान करणे सोडून द्या. हृदयविकार आणि स्ट्रोकचे झटके येण्यास तंबाखू ३० टक्के कारणीभूत आहे. सिगारेट/तंबाखू मुळे तुमचा रक्तदाब वाढतो, तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्यापासून मुक्त होण्यास कधीच फार उशीर होत नाही. व्यसन सोडण्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वर्षाला अर्ध्याने कमी होतो. अल्कोहोलमुळे तुमचे वजन वाढू शकते (फक्त अल्कोहोलमुळे किंवा त्याच्यासोबत सेवीत असलेल्या पदार्थांमुळे), तुमचा रक्तदाब वाढतो आणि हृदयाचा नाद अनियमित होतो- जे तीन महत्त्वाचे मुद्दे हृदय रोगाच्या बाबतीत लक्षात घेतले पाहिजेत.

३) पौष्टीक आहार सेवन करा –
उच्चरक्तचाप, मधुमेह आणि हृदयविकार हे प्रथम विकसनशील देशांपेक्षा पाश्‍चिमात्त्य विकसित जगतात जास्त सामान्यपणे बघायला मिळत होता. पण आज दोन्ही विकसनशील आणि विकसीत देशांमध्ये स्थूलपणा आणि मधुमेहासोबतच हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले दिसते- मुख्यत्वे करून चुकीची जीवनशैली आचरणात आणल्यामुळे आणि विकसीत जगताच्या आहाराच्या सवयी अंगी बाणवल्यामुळे.

आहारात कर्बोदकांचे प्रमाण अगदी कमी असले पाहिजे. स्निग्ध पदार्थांचे प्रमाण माफक किंवा मध्यम आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असावे. साखर, मैदा, रिफाइंड तांदूळ, मैदा, गोड शीतपेये आणि साखर असलेले फळांचे रस यांचे प्रमाण कमी करून त्यांच्या जागी पॉलिश न केलेल्या तांदळाचा भात, संपूर्ण कडधान्ये, संपूर्ण फळे यांचा उपयोग करावा. कच्चा भाज्यांचे सलाड आणि मोड आलेली कडधान्ये जास्त प्रमाणात घेतली पाहिजेत. पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले पाहिजेत. तसेच मीठाचे सेवन नियंत्रणात केले पाहिजे.
शाळकरी मुलांना घरी बनवलेले पदार्थ/फराळ खाण्यास प्रोत्साहित करावे.

४) ताण कमी करा –
प्रत्येकाला ताण हा अनुभवावा लागतोच- जो भौतिक, रासायनिक, भावनिक किंवा पर्यावरणीय घटकांना दिलेल्या प्रतिक्रियांचा परिणाम असतो. तरीसुद्धा, प्रत्येकाच्या ताणाची तीव्रता वेगळी असते आणि त्याला दिलेली प्रतिक्रियाही वेगवेगळी असते. सततचा आणि जुनाट ताण शरीराला दीर्घ काळपर्यंत उत्तेजित अवस्थेत ठेवतो ज्याचा शासोच्छ्वासावर आणि हृदयाच्या ठोक्यांवर तीव्र परिणाम होऊन ते वाढतात व त्यामुळे रक्तदाबही वाढतो. ताणाचा सामना करण्यासाठी सर्वांत उत्तम उपाय आहे तो म्हणजे योग आणि ध्यानाचा सराव.

५) तुमच्या आकड्यांची नोंद ठेवा –
विशेषतः चाळीशीनंतर नियमित शरीर तपासणी करा आणि जर हृदयरोग किंवा मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असल्यास त्याच्याही अगोदर तपासण्या करा. प्राथमिक स्क्रिनिगच्या रक्त चाचण्या केल्या पाहिजेत. तुमची साखर, रक्तदाब आणि शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा.

६) आधीच्या रोगांवर उपचार घ्या –
मधुमेह आणि उच्चरक्तचाप असेल तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य औषधे घ्यावीत.
कुटुंबनियोजनावर चर्चा करा – गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनानेसुद्धा तुमचा रक्तदाब वाढू शकतो ज्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा सामना करावा लागू शकतो.

याचा परिणामस्वरूप आम्हाला दुसर्‍या रुग्णांचा विचार करावा लागतो ज्यांना आधीपासूनच हृदयरोग आहे आणि जे औषधोपचार घेत आहेत. विशेषतः अशा परिस्थितीत, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असा विचार करतात की व्यक्तीचे एकदा का हृदयविकाराचे निदान झाले की त्याच्या रस्त्याचा शेवट जवळ आला आहे. इथेसुद्धा मग लवकर निदान आणि उपचारांची नियमावली लागू होते. सत्य कळण्याच्या भीतीपोटी रुग्ण लक्षणे लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उशीर होऊन शेवटी रुग्णाला फिजिशियनच गाठावा लागतो, ज्यामुळे रोगाची वाढ रोखण्यास उशीर झालेला असतो. कोणत्याही हृदयरोगाच्या आजारानंतर जसे हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणे, अँजिओप्लास्टी किंवा हृदयावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण हा बर्‍याच विविध मनःस्थितींमधून जात असतो, जसे भीती, ताण, चिंता, एकटेपणाची भावना, नैराश्य इत्यादी. या सगळ्या समस्या हाताळत असताना बर्‍याच हृदयाच्या उपचारांमध्ये कार्डियाक रिहॅबिलिटेशनची सोय असते ज्यामध्ये आधीपासून हृदयविकार अनुभवलेल्या रुग्णांच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्याकरिता वैद्यकीय तज्ज्ञांनी तयार केलेला एक कार्यक्रम असतो.

रोगमुक्तता हा एक प्रवास आहे. रोग झाल्यानंतर एका रात्रीत ती मिळत नाही, तर त्यासाठी रुग्णाला एका प्रक्रियेतून जावे लागते ज्यामध्ये फिजिशियन, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि कुटुबियांचा समावेश असतो.
हृदयविकाराचे निदान झाल्यानंतर किंवा झठका आल्यानंतर किंवा अँजिओप्लास्टी किंवा हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर हृदयाचे पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होणे ही तुमच्या हृदयासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य परत मिळवण्यासाठी तुम्हाला मदत मिळते.

कार्डियाक रिहॅब.मुळे तुमचा भूतकाळ तर बदलता येत नाही, पण त्यामुळे तुमच्या हृदयाचे भविष्य तुम्ही सुधारू शकता. तुमच्या हृदयाच्या आरोग्याच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला पुढचे पाऊल घेण्यास मदत करते आणि नंतर त्यापुढचे. खरे सांगायचे तर ते नेहमीच सोपे नसते. नेहमीच ते मनोरंजकही नसते.
पहिल्यापेक्षा चांगले वाटण्याची ती एक वाट असते. पुनर्वसन कार्यक्रमात भाग घेण्यामुळे तुमचे पुढचे ङृदयाचे त्रास टळू शकतील. तुम्हाला चांगला आहार घेता येईल. वजन कमी होईल, तुम्ही तुमच्या कामावर परतू शकाल, दैनंदिन कामात भाग घेऊ शकाल जे एरवी तुम्हाला जमत नव्हते.

कोविड आणि हृदयरोग
आताची महामारी आणि हृदयविकाराचा उल्लेख केल्याशिवाय लेखन प्रपंच पूर्णच होणार नाही. सीव्ही होण्यास धोकादायक असलेले घटक म्हणजे पुरुष, मधुमेही, उच्चरक्तचाप आणि स्थूलपणा, त्याचबरोबर सीव्ही आधीपासूनच असलेले रुग्ण आणि स्ट्रोकचे रुग्ण हे कोविडची लागण होण्यास आणि ती झाल्यास मृत्यू येण्यास जास्त प्रमाणात कमजोर ठरतात. अगोदरच हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांना, हायपरटेन्शनचा त्रास नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत, कोविड-१९ तीव्र स्वरूपात होण्याची शक्यता असते. हे तीव्र श्‍वसनाच्या विकारांच्या (एआरडीएस- ऍक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) बाबतीतही खरे आहे. कोविड-१९च्या रुग्णामध्ये जर श्‍वास घेण्यास असमर्थता आणि ऑक्सीजनची कमतरता असेल तर त्याचा परिणाम हृदयाच्या स्नायुंवर आणि रोगप्रकार क्षमतेवर होऊन हृदयाच्या स्नायूंचा दाह होऊन रुग्णाला मायोकार्डायटीस होऊ शकतो.
म्हणूनच ज्या रुग्णांना हृदयरोगाच्या समस्या आहेत किंवा ज्यांना हृदयरोगाचा जास्त धोका आहे त्यांनी कोविड महामारीच्या काळात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

म्हणून कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी काही टीप्स….

  • तुमची औषधे बरोबर घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.
  • जास्तीच्या औषधांचा साठा तुमच्याजवळ करून ठेवा.
  • खोकला, सर्दी आणि फ्लूच्या रुग्णांपासून दूर म्हणजे एक मीटरच्या अंतरावर रहा.
  • २० सेकंदपर्यंत तुमचे हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवत रहा.
  • शक्य तितका वेळ घरातच रहा.
  • वेळोवेळी आरोग्यखात्याकडून येणार्‍या सूचनांचे पालन करा.
    तुमच्या आरोग्य स्थितीबाबत जागरूक रहा. जर तुम्हाला लक्षणे जाणवलीत (श्‍वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला) ताबडतोब दवाखान्यात जा.
  • घरी असल्यास तुमच्या हृदयाची काळजी घ्या. स्वतःच्या एकांतवासात राहिल्यास पौष्टीक आहाराच्या सवयी पाळल्या जाणार नाहीत. ताण आणि थकवा टाळण्यासाठी दैनंदिन वेळापत्रक पाळा आणि निरोगी जीवनशैली जगा.
  • व्यायाम करणे चालू ठेवा, संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या.
  • सोशल नेटवर्कवरून मित्र आणि नातेवाइकांशी नियमितपणे संपर्कात रहा. अल्कोहोल आणि तंबाखूपासून दूर रहा.
    म्हणून लक्षात ठेवा- ‘‘विषयाच्या हृदयापर्यत (खोलापर्यंत) जा… हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या.’’