बाल हृदयरोग : समज/गैरसमज

0
988


डॉ. रवींद्र पवार
(बालरोग व गर्भाच्या हृदयरोग तज्ज्ञ
हेल्थवे हॉ.)

बाल हृदयरोगाबद्दलची सर्वात सुंदर गोष्ट हीच आहे की, बहुतांशी आजारांवर १०० टक्के इलाज आहे आणि तोही कुठल्या अपंगत्व अथवा अधुपणाशिवाय आहे.

बालकांमधील हृदयरोग हे मोठ्यांमधील हृदयरोगांपेक्षा अतिशय वेगळे असतात. म्हणूनच त्याची लक्षणे, निदान, प्रगती, उपचार व एकूणच भावी आयुष्यावरील परिणाम हा वेगळा असतो. एवढेच नव्हे तर जसे लहान मुलांचे डॉक्टर वेगळे असतात, तसेच बाल हृदयरोग निदानासाठी लागणारे डॉक्टरही वेगळे – म्हणजे बाल हृदयरोग तज्ज्ञ असतात.

हृदयातील चार कप्पे, चार मोठ्या झडपा, चार प्रकारच्या रक्तवाहिन्या, हृदयाची स्पंदन यंत्रणा आणि हृदयावरचे आवरण हे सर्व मिळून साधारण शंभर प्रकारचे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक बाळाला असलेला हृदयरोग हा वेगळा असतो. अगदी एका पडद्याला असलेले छिद्र दुसर्‍या बाळालाही तिथेच असले तरीही दोघांना होणारा त्रास आणि त्याचा उपचार हे वेगवेगळे असतात.

लहान मुलांमधील (० ते १८ वर्षे वयोगटातील) हृदयाशी संबंधित कोणताही आजार/रोग- मग तो जन्मजात असेल किंवा नंतर झालेला असेल. तेव्हा त्याला ‘बाल हृदयरोग’ असे म्हणतात. जन्मजात हृदयरोग म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हापासून असलेला हृदयरोग, थोडक्यात बाळाच्या हृदयाची जडणघडण व्यवस्थित नसते आणि त्यामुळे हृदयातील पडद्यांना छिद्र असणे, झडप वेडीवाकडी असणे किंवा रक्तवाहिन्या योग्य त्या ठिकाणी न जुळणे या आणि अशा आजाराला जन्मजात हृदयरोग म्हटले जाते.

१. बाल हृदयरोग खूप दुर्मीळ आहे –
तथ्य- सरासरी दर १०० जन्मलेल्या बाळांमध्ये एका बाळाला हृदयरोग असतो. भारतामध्ये दरवर्षी सरासरी अडीच कोटी मुले जन्माला येतात. त्यापैकी सरासरी अडीच लाख बालके ही जन्मजात हृदयरोग घेऊन जन्माला येतात. तसेच जन्मजात सोडून इतर बाल हृदयरोगाचे प्रमाणही जास्त आहे- एक ते दोन प्रति हजारी शाळकरी मुले. त्यामुळे बाल हृदयरोग दुर्मीळ नाही.

२. बाल हृदयरोगाचे लवकर निदान होत नाही.
तथ्य- साधारण १५ ते २० वर्षापूर्वी भारतामध्ये हृदयरोगाचे निदान अचूक करू शकतील अशाप्रकारच्या साधनसामग्री अथवा यंत्रणा नव्हत्या. त्याकाळी बालरोगतज्ज्ञ फक्त स्टेथोस्कोप लावून हृदयरोगाची शंका व्यक्त करून पुढील तपासणीसाठी आणि उपचारासाठी मुंबई किंवा बेंगलोरसारख्या ठिकाणी पाठवत असत; पण आता परिस्थिती खृप बदलली आहे. फक्त यंत्रणाच नव्हे तर बाल हृदयरोगतज्ज्ञ जे फक्त आणि फक्त लहान मुलांमधील हृदयाच्या आजारांवरील तज्ज्ञ आहेत, आता उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे लगेच व अचूक निदान लागणे अगदी सहजशक्य झाले आहे.
इतकेच नव्हे तर गर्भातील बाळाच्या हृदयाची तपासणीही अगदी सहजशक्य झाली असल्यामुळे बाळ जन्मायच्या आधीही त्याच्या हृदयाची तपासणी करून दोष आहेत की नाहीत, हे ठरवता येते. अनायसे यामुळे उपचारासंबंधित सर्व माहिती आणि लागणारी मानसिक/ आर्थिक तयारी आपल्याला लवकर करता येते.
लक्षणांबाबतीत म्हटलं तर एक वर्षापेक्षा लहान असलेल्या बाळांमध्ये बाळाचे ओठ/हातापायांची नखे निळसर होणे, दूध पिताना दमणे/थकणे, दूध पिताना घाम येणे, वजन व्यवस्थित न वाढणे, वारंवार सर्दी, खोकला होऊन निमोनियासारखे आजार होणे- ही लक्षणे आढळून आल्यास हृदयरोग तपासणी आवश्यक असते. सतर्क पालकांना या गोष्टी डॉक्टरांच्याही अगोदर लक्षात येऊ शकतात. थोड्या मोठ्या बालकांमध्ये वजन व्यवस्थित
न वाढणे, खेळताना किंबा पळताना बाकीच्या मुलांपेक्षा लवकर दमणे/थकणे, छातीत कळ मारणे, चक्कर येणे इत्यादी लक्षणे असल्यास हृदयाची तपासणी करून घेणे योग्य ठरते. काही वेळा हृदयाच्या पडद्याला एखादे छोटेसे छिद्र असेल तर बाळाला काहीही त्रास जाणवत नाही; परंतु बालरोग तज्ज्ञांनी तपासणी केल्यावर हृदयात एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येतो. अशा वेळीही हृदयाची तपासणी करणे आवश्यक असते. क्वचित
कधीतरी, काही मोठ्या माणसांतदेखील जन्मजात हृदयरोग आढळतो. जो जन्मल्यापासून असतो; परंतु त्यावेळी कमी त्रासाचा असतो. दुर्लक्षित असतो आणि बय वाढल्यावर त्रास चालू होतो.

३. मिथ्य – बाल हृदयरोग वय वाढेल तसे आपल्या मनाने बरा होतो.
तथ्य – फक्त ठरावीक प्रकारचे जन्मजात हृदयरोग- उदा. हृदयातील वरच्या किंवा खालच्या दोन कप्प्यातील पडद्याला असलेले अतिशय छोटे छिद्र, एखादी झडप हलकीशी बारीक असणे इत्यादी. या आणि अशा हृदयरोगांमध्ये छिद्र बंद होण्याची शक्यता साधारण ७० ते ८० टक्के असते. १०० टक्के नाही, २० ते ३० टक्के बाळांमध्ये हे छिद्र आयुष्यभर तसेच राहू शकते. वय वाढेल तसे त्रास देऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत हृदयरोग हा कोणत्या प्रकारचा व किती साधा अथबा गुंतागुंतीचा आहे, हे बाल हृदयरोग तज्ज्ञांकडून तपासून कळत नाही तोपर्यंत ठरावीक हृदयरोगांना आयुष्यभर फक्त एक ते दोन वर्षांतून तपासणी करून घेणे गरजेचे असते. योग्य वयात तपासणी व उपचार न केल्यास काही वेळा त्रास सुरू झाल्यावर हृदयरोग उपचार करण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे एकदा हृदयरोगाची शंका आली तर त्याची योग्य तपासणी करून तो कोणत्या प्रकारचा आहे ती खात्री करून घेणे गरजेचे आहे.

४. मिथ्य – बाल हृदयरोगांवर उपचार कमी आहेत/ नाहीत/ गुणकारी नाहीत.
तथ्य – जन्मजात हृदयरोग हे हृदयाच्या जडणघडणातील दोष असल्यामुळे ते दोष दूर करण्यासाठी काही ना काही उपचार हा जवळपास सर्व बालकांना करावा लागतो. फक्त ठरावीक प्रकारच्या हृदयरोगांमध्ये (उदा. पडद्याला अतिशय छोटेसे छिद्र असणे) जे आपल्या मनाने नैसर्गिकरीत्या बरे होतात. अशा मुलांना काही खास उपचाराची गरज नसते. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही औषध, गोळी, सिरप, टॉनिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधाने हा आजार बरा होत नाही. जसे एखाद्याला हाताला सहा बोटे असतील तर कितीही औषध घेऊन ते बोट विरघळणार नाही तसेच हृदयाच्या जडणघडणीमधील व्यंग अथवा दोष हा हृदय शस्त्रक्रिया किंवा तत्सम उपचाराशिवाय बरा होत नाही.
अलीकडील काळातील आधुनिक उपचार पद्धतीमुळे २० ते ३० टक्के हृदयरोग हे शस्त्रक्रियेवबिना बरे करता येतात. यामध्ये बिशिष्ट प्रकारच्या चकती/बटण किंवा उपकरणे वापरून हृदयातील छिद्र १०० टक्के आणि सहजरीत्या आयुष्यभरासाठी बंद करता येते तसेच विशिष्ट प्रकारच्या फुग्यांद्रारे (बलून्स) बारीक/आकुंचित असलेल्या झडपा किंवा रक्तवाहिन्या या मोठ्या करता येतात. त्यात शस्त्रक्रियेची गरज भासत नाही.
४० ते ५० टक्के आजारांमध्ये हृदय शस्त्रक्रिया ही १०० टक्के गुणकारी असते. एकदा केली की पुन्हा त्या गोष्टीचा आयुष्यभर काही त्रास नसतो. हृदयरोग पूर्णपणे बरा होतो. अशी शस्त्रक्रिया ही बयाच्या किंवा वजनाच्या अडथळ्याशिवाय अगदी सुरक्षितरीत्या करता येते. भलेही बाळाचे वय एक दिवस असले तरी आणि बाळाचे वजन १ किलो असले तरीही करता येते. फक्त काही ठरावीक आजारांमध्ये टप्प्याटप्प्याने दोन ते तीन शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.

५. मिथ्य – बाल हृदयरोगावरील उपचार हा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
तथ्य – विना शस्त्रक्रिया उपचार हा जवळपास प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध आहे आणि सरकारी योजनेद्वारे/ इन्शुरन्स स्कीमसद्वारे अत्यल्प दरात/मोफत करता येतो. बालहृदय शस्त्रक्रिया ही ठरावीक ठिकाणीच- जिथे तज्ज्ञ बाल हृदयरोग शल्यचिकित्सक, बाल हृदय रोग भूलतज्ज्ञ व अशा ऑपरेशन्सचा अनुभव असणार्‍या तज्ज्ञ नर्सेस असलेल्या ठिकाणीच व्यवस्थित व कमीत कमी जोखमीत करता येतो. यातील काही ठरावीक हॉस्पिटल्समध्ये अल्प दरात/योजनेद्वारे या शस्त्रक्रिया करता येतात, तर काही हॉस्पिटल्स हे सेवाभावी संस्थांकडून मदत घेऊन लागणारी रक्कम उभी करतात.
६. मिथ्य – बाल हृदयरोग शस्त्रक्रियेनंतर / उपचारानंतर बाळाला पुढील आयुष्यात त्रास होतो/ अधुपणा येतो/अपंगत्व येते.
तथ्य – हा सर्वात मोठा गैरसमज आहे की उपचारामुळे वेगळाच आजार किंवा अधुपणा येतो. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य तज्ज्ञांकडून करून घेतल्यास बाल हृदयरोगावरील उपचार हा विना जोखीम आणि खात्रीशीर असतो. बहुतांशी बाळामध्ये फक्त एक शस्त्रक्रिया / विना शस्त्रक्रिया उपचाराने हृदयरोग कायमस्वरूपी बरा होतो. लहानपणी हृदय शस्त्रक्रिया झालेली कित्येकजण आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, धावपटू आहेत, मिल्ट्रीमध्ये आहेत. इतकेच नव्हे तर इंजिनिअर्स, डॉक्टर्स आणि वैज्ञानिकही आहेत. बाल हृदयरोगाबद्दलची सर्वात सुंदर गोष्ट हीच आहे की, बहुतांशी आजारांवर १०० टक्के इलाज आहे आणि तोही कुठल्या अपंगत्व अथवा अधुपणाशिवाय आहे.