हृदयरोग्यांसाठी लवकरच रुग्णवाहिका ः आरोग्यमंत्री

0
83

हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार करण्याची अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णवाहिका लवकरच रस्त्यावर उपलब्ध होऊ शकतील. या रुग्णवाहिकांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असेल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
वरील रुग्णवाहिकांसाठी २४ डॉक्टरांची भरती करणार असल्याचे सांगून प्रती डॉक्टरचे वेतन दरमहा ८४ हजार रुपये असेल. त्याचप्रमाणे येत्या १० जुलै पर्यंत मोटारसायकल रुग्णवाहिका रस्त्यावर आणणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रादेशिक कर्करोग शस्त्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सांगून यासंबंधी लवकरच केंद्र सरकारकडे समझोता करार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या एका योजनेखाली राज्याला या केंद्रासाठी ५० कोटींचा निधी मिळेल. या केंद्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून जीएसआयडीसीची नियुक्ती करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
यापुढे सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातच होतील, अशी यंत्रणा उभारण्याचे ठरविले आहे. काही रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागत असल्यासंबंधी वाद आहे. त्यामुळे आपण नियमित तपासणी करण्याचे ठरविले आहे. इस्पितळाचे डीन व अधीक्षक यांच्यातील अधिकारांचे विभाजन करण्याचे ठरविले असून तत्‌संबंधी लवकरच आदेश जारी होईल, अशी माहितीही राणे यांनी दिली.
दीनदयाळ विमा स्वास्थ्य योजनेचा राज्यातील ठराविक इस्पितळांनाच लाभ होत आहे. हा प्रकार बंद झाला पाहिजे. त्यामुळे संबंधित अधिकारी व वरील योजनेची अंमलबजावणी करणार्‍या संस्थेची बैठक घेऊन योजनेत सुसूत्रता आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारच्या योजनांचा ठराविक लोकांनाच लाभ होता कामा नये असे ते म्हणाले.

‘ती’ तक्रार मागे घेण्याची सूचना
मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळाजवळ आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याशी हुज्जत घातल्या प्रकरणी मंत्र्यांच्या शरीर रक्षकाने मडगाव पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्याची सूचना आपण पीएसओला केली आहे. पोलिसांनीही वरील प्रकरणी कारवाई करू नये, असे आवाहन राणे यांनी काल पत्रकार परिषदेत केले. शरीर रक्षकाने केलेल्या तक्रारीची आपल्याला कल्पना नव्हती. आपण त्या महिलांना मदत करण्याच्या भावनेने त्यांच्या समोर गेलो होतो. त्यांना काहीतरी मदत हवी होती, असे सांगून सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तिंना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांनी घातलेल्या हुज्जतीकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविल्याचे राणे यांनी सांगितले. वरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. हॉस्पिसीयुतील शवागृहात असलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा विषय हाताळण्यासाठी व तेथील इमारतीची पहाणी करण्यासाठीच आपण तेथे गेलो होतो, असे राणे यांनी सांगितले.