हिमालयाच्या सर्वोच्च शिखराचे मापन कुणी केले?

0
119
  • दत्ता भि. नाईक

‘हिमालयन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’ ही साधीसुधी संस्था नाही. तिच्याच अध्यक्षांनी हा विषय काढल्यामुळे तो आता चर्चेचा व अभ्यासाचा विषय होईल. ‘नावात काय आहे’ असे शेक्सपियर म्हणाला असेल, परंतु स्वाभिमानाचा विषय आला की नावात बरेच काही आहे हे लक्षात येते. हा विषय लावून धरला जाईल व राधानाथ सिकदर यांचे नाव या शिखरास दिले जाईल अशी आपण अपेक्षा बाळगूया.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्षे उलटून गेली, तसे परकीय राजवटीचे डोळ्यांवर चढलेले कातडे उतरू लागले. बर्‍याच गोष्टींची उलगाउलग सुरू झाली. इंग्रज वसाहतवाद्यांनी राज्यकर्ते म्हणून जो काही प्रभाव देशाच्या सांस्कृतिक जीवनावर टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचा परिणाम देशाच्या जनमानसावर बरीच वर्षे राहिला आहे. आजही काही गोष्टी बदलून घ्यायच्या ठरवल्या तर त्याला विरोध करणारे तथाकथित सुधारणावादी ठिकठिकाणी दिसून येतात. इंग्रजांनी रस्ते-चौक यांना स्वतःच्या अधिकार्‍यांची तर नावे दिलीच, पण ‘समान शीलेषु व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने मोगलांचीही नावे दिल्लीतील रस्त्यांना दिली. सत्तेचे बस्तान बसल्याबरोबर सर्व्हेक्षण विभाग सुरू करून पर्वतशिखरांची उंची मोजण्याचे काम सुरू झाले आणि सर्वात उंच असलेल्या हिमालय पर्वताचे सर्वोच्च शिखर कोणते याचा शोध घेण्याचे काम इंग्रजांद्वारे हाती घेण्यात आले. त्यातच सर्वोच्च शिखराच्या नामकरणाचा विषय निघाला.

कॅप्टन जयकिशन यांचे वक्तव्य
२९ मे हा ‘एव्हरेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाही हा दिवस साजरा केला गेला व एकूणच नवीन चर्चेला वाचा फुटली. ‘इंडियन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’चे प्राचार्य कॅप्टन जयकिशन यांनी याप्रसंगी केलेल्या वक्तव्यात म्हटले की, ‘‘स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाल्यानंतरही आपण सर्वोच्च शिखराचा ‘सिकदर शिखर’ असा उल्लेख करू शकत नाही.’’ वाटतो तितका हा साधा विषय नाही. संपूर्ण जगाने ‘एव्हरेस्ट’ यांचे नाव निश्‍चित केलेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी हे मत व्यक्त केले तीही एक जबाबदार व्यक्ती आहे हे विसरून चालणार नाही. हे सिकदर कोण व त्यांचे नाव का घेतले गेले यावरून सर्वत्र चर्चा सुरू झाली व संशोधक वृत्तीच्या लोकांनी या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कॅप्टन जयकिशन जे म्हणाले त्याची सहानिशा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

जॉर्ज एव्हरेस्ट हा इंग्रज अधिकारी १८३० ते १८४२ या काळात भारताचा सर्व्हेयर जनरल म्हणून काम बघत होता. तो कधीही हिमालयाच्या वाटेला गेला नाही. त्या काळात या शिखराची ‘शिखर क्रमांक २५’ अशी नोंद आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागेवर रूजू झालेल्या एन्ड्रू वाह याने या शिखराला ‘एव्हरेस्ट’ हे नाव दिले. त्याच्या दृष्टीने या शिखराला सुशिक्षित समाजात म्हणजे इंग्रज लोकांत कोणतेही नाव नव्हते. तिबेटी भाषेत या शिखराला ‘चोमोलुंग्मा’ म्हणतात, तर नेपाळमध्ये ‘सागरमाथा’ असे नाव आहे. तरीही या महाशयांनी याकडे दुर्लक्ष केले. स्टीफन ऑर्ल्टर यांनी ‘वाईल्ड हिमालया’ या आपल्या पुस्तकात यापूर्वीच ‘एव्हरेस्ट’चे नाव एका शिखरास दिल्याबद्दल टीका करून या विषयाला वाचा फोडली होती. परंतु हा विषय पुस्तकप्रेमींमध्येच घोळत होता.

सर्व्हेक्षणाचे काम
बंगालमधील चंदननगर या गावातील राधानाथ सिकदर हा अठरा वर्षांचा तरुण एव्हरेस्टच्या काळाताच सर्व्हेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केला गेला होता. त्यावेळी तो कोलकात्यात हिंदू कॉलेजचा विद्यार्थी होता. याचा बराच उपयोग या खात्याला झाला. देशात सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर जनतेला वेठबिगारीला लावून भारतीय उपखंडाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम इंग्रजांनी हाती घेतले. या कामात इंग्रज अधिकार्‍यांचा भर त्यांचा थाटमाट व डामडौल सांभाळण्यातच होता. खरे काम कमी पगारावर करणारे भारतीय होते.

१८५२ साली राधानाथ सिकदर यांनी या शिखराचे सर्व्हेक्षण व मापन पूर्ण केले व १८६५ मध्ये सिद्ध केले की हे विश्‍वातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. तोपर्यंत ‘कांचनजुंगा’ हे शिखर सर्वोच्च असल्याचे मानले जात होते. यावेळी जॉर्ज एव्हरेस्ट जिवंत होता की नाही हे कळायला मार्ग नाही; परंतु तो अधिकारपदावर नव्हता हे निश्‍चितपणे लक्षात येते. तरीही शिखराच्या उंचीचे गणित जमल्यावर सिकदर ‘साहेब, मला सर्वोच्च शिखर सापडले’ असे ओरडत एव्हरेस्टच्या चेंबरमध्ये गेला अशी नोंद आहे. एव्हरेस्ट साहेब त्याला आपला उजवा हात मानत असे, हेही खरे आहे.
काही का असेना, आजपर्यंत आपण या शिखराला ‘एव्हरेस्ट’ शिखर या नावानेच ओळखत आलो आहोत. एखाद्या जागेला एखादे नाव मिळाले की ते पुसून टाकणे अतिशय कठीण असते. स्वातंत्र्यानंतर देशातील परकीयांचे कित्येक पुतळे उखडून टाकण्यात आले. कित्येक रस्त्यांची व चौकांची नावे बदलली तरीही बर्‍याच वेळेस लोकांच्या तोंडी बसलेली नावे बदलायला उशीर लागलो. एव्हरेस्ट हा कोण होता हे माहीत नसतानाच आपण या शिखराचे अनादिकालापासून ‘एव्हरेस्ट’ हेच नाव आहे असे जणू मानूनच चाललो आहोत. अर्थातच या कारणामुळे पुनर्नामकरण बंद करणे योग्य होणार नाही.

साम्राज्यवाद्यांचा कावा
राधानाथ सिकदर यांचे नाव कित्येक वर्षे मागे पडले होते. अतिशय कमी वेळेत मोठमोठी गणिते सोडवणारी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. सर्व्हेक्षण करताना जमिनीच्या स्थलाकृती शास्त्राचा (टोपोग्राफी) अभ्यास करावा लागतो. तो पाठ्यक्रमात किती शिकवला असेल त्यापेक्षाही शिकणार्‍याच्या आवडीशी अधिक संबंधित असतो. एकोणिसाव्या वर्षी हे काम हाती घेतल्यामुळे सिकदर या विषयाचे अर्क बनले असतील याबद्दल शंका नाही.

एक बुद्धिमान विद्यार्थी, कर्तव्यदक्ष अधिकारी या गुणांबरोबरच एक सहृद माणूस म्हणूनच राधानाथ सिकदर यांची इतिहासात नोंद राहील. १८४३ साली सर्व्हेक्षण खात्यातील कर्मचार्‍यांना अतिशय कमी वेतन दिले जाते व त्यांचे आर्थिक शोषण केले जाते म्हणून त्यांनी अधिकार्‍यांचा निषेध केला होता व त्यासाठी त्याला दंडही भरावा लागला होता. याच कारणामुळे त्याने केलेले संशोधन त्याचे नाव येऊ न देता प्रकाशित केले गेले असावे. परंतु आता अशा अडगळीस पडलेल्या कागदपत्रांवरील धूळ झटकली जाऊ लागली आहे.

जसे एव्हरेस्टचे नाव या शिखराशी जोडले जाते तसेच एडमंड हिलरी हा शिखर काबीज करणारा पहिला गिर्यारोहक आहे असे मानले जाते. नेपाळमधील शेर्पा ही जमात गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहे. या प्रदेशातील थंडीत जीवन जगण्याची कला त्यांना जन्मजात अवगत आहे. अशा या शेर्पा जमातीतील शेर्पा तेनसिंग याच्या जिवावर एडमंड हिलरी हिमालयाचे सर्वोच्च शिखर गाठणारा वीर म्हणून मिरवला जातो व शेर्पा तेनसिंगचे नाव उल्लेखापुरते घेतले जाते, यावरून साम्राज्यवादी इंग्रजांचा कावा दिसून येतो.

नावातच सर्वकाही आहे!
कविकुलगुरू कालिदासाने ‘मेघदूता’मध्ये हिमालयाचा ‘देवतात्या’ या नामाभिधानाने उल्लेख केलेला आहे. ‘हिंदुस्थान’ या नावाचा उगम हिमायल व इंदू म्हणजे चंद्रकार समुद्र या दोन शब्दांच्या प्रथम व शेवटच्या मेळाने ‘हिंदू’ हा शब्द बनला असे ब्राहस्पत शास्त्रात सांगितले आहे. अशा या हिमालयाच्या अत्युच्च शिखराचे नामकरण एका साम्राज्यवादी सत्तेच्या प्रतिनिधीवरून व तेही त्याचे या क्षेत्रात कोणतेही योगदान नसताना व्हावे हा एक दैवदुर्विलास आहे असेच म्हणावे लागेल.
हिमालय पर्वत काराकोरमपासून अरुणाचल प्रदेशातील पर्वतशिखरांपर्यंत पसरलेला आहे. हिमालय भारतात आहे असे म्हणताना त्याचे अत्युच्च शिखर आजच्या भारतात नाही. हे नेपाळ व तिबेटच्या सीमेवर आहे. तिबेटवर सध्यातरी चीनचा ताबा आहे. चिनी शासन तिबेटी जनतेच्या भावनांपेक्षा स्वतःचे राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी या प्रश्‍नाचा उपयोग करेल. नेपाळमधील राजकीय अस्थिरता व माओवाद्यांचा वाढता प्रभाव पाहता एका भारतीयाचे नाव मान्य करायला तेथील शासन तयार होईल की नाही याबद्दल शंकाच आहे.

राधानाथ सिकदर आतापर्यंत स्मृतीच्या आड गेले असतील असे सर्वांना वाटते, परंतु प. बंगालमधील चंदननगर येथे त्यांच्या स्मृत्यर्थ एक पुरावस्तुसंग्रहालय चालते. या ठिकाणी त्यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने कार्यक्रम होतो. या कार्यक्रमांना बंगालच्या बाहेर प्रसिद्धी मिळत नसल्यामुळे देशभरातील जनतेला त्यांच्याबद्दल विशेष माहिती नाही. ‘हिमालयन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’ ही साधीसुधी संस्था नाही. तिच्याच अध्यक्षांनी हा विषय काढल्यामुळे तो आता चर्चेचा व अभ्यासाचा विषय होईल. नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणाला असेल, परंतु स्वाभिमानाचा विषय आला की नावात बरेच काही आहे हे लक्षात येते. हा विषय लावून धरला जाईल व राधानाथ सिकदर यांचे नाव या शिखरास दिले जाईल अशी आपण अपेक्षा बाळगूया.