‘थायरॉइड ग्रंथी’चे आजार

0
181
  • वैद्य स्वाती हे. अणवेकर
    (म्हापसा)

थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत सुरु राहायला आहारातून योग्य प्रमाणात आयोडीन मिळणेदेखील आवश्यक आहे. आपल्या शरीराला आयोडीन अगदी कमी प्रमाणात आवश्यक असते – फक्त १५० मायक्रोग्राम, पण इतकेही आयोडीन बर्‍याचदा आपल्याला आहारातून मिळत नाही. अशावेळी मग….

हल्ली थायरॉइड ग्रंथीचा आजार होणे खूप सामान्य झाले आहे पण तरीही आपल्याला थायरॉइड ग्रंथीचा आजार झाला आहे हे समजले की बर्‍याच जणांना टेन्शन येते. म्हणूनच ह्या लेखामार्फत आपण आपले टेन्शन कमी करायचा प्रयत्न करणार आहोत.

‘थायरॉइड ग्रंथी’ ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी गळ्याच्या मध्यभागी असते. ही जेव्हा नॉर्मल असते तेव्हा आपल्या हाताला लागत नाही. ही ग्रंथी टी-३ अर्थात ट्राय-आयोडोथायरोनाइन, टी-४ अर्थात थायरॉक्सीन आणि कॅल्सिटोनिन हे तीन हॉर्मोन्स निर्माण करते म्हणजेच स्रवते आणि हे तयार करायला ती आपल्या शरीरातील आयोडीन हे क्षार आणि थायरोसिन नावाचे शरीरात असणारे अमिनो ऍसिड वापरते.
पण हे करत असताना मेंदूमधील हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ह्या ग्रंथी थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात. हायपोथॅलॅमस हा टीआरएच अर्थात थायरोट्रॉपिन रिलिझिंग हॉर्मोन तयार करते जी पुढे पिट्युटरी ग्रंथीला उद्दिपित करून टीएसएच अर्थातथायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन तयार करायला लावते. थोडक्यात थायरॉइड ग्रंथीचे कार्य योग्य पद्धतीने सुरु राहायला हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ह्या ग्रंथींचे कार्यसुद्धा नीट सुरु राहणे आवश्यक आहे.

थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत सुरु राहायला आहारातून योग्य प्रमाणात आयोडीन मिळणेदेखील आवश्यक आहे. आपल्या शरीराला आयोडीन अगदी कमी प्रमाणात आवश्यक असते – फक्त १५० मायक्रोग्राम, पण इतकेही आयोडीन बर्‍याचदा आपल्याला आहारातून मिळत नाही. अशावेळी मग बाजारात मिळणारे आयोडाआज्ड मीठ योग्य प्रमाणत आहारामध्ये वापरावे. ह्यालाच फॉर्टिफाइड सॉल्ट असे देखील म्हणतात.

आता थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीरात काय काम करते ते पाहूयात :-
१) शरीराचा चयापचय नीट घडवून आणणे.
२) मेंदू व मज्जासंस्थेचे कार्य नीट सुरु ठेवणे, त्यांची योग्य वाढ घडवून आणणे.
३) डोळे, त्वचा, केस, हृदय, आतडे ह्यांचे आरोग्य राखणे.
४) शरीरातील पेशींचे कार्य सुरळीत सुरु ठेवणे.
५) शरीराची वाढ योग्य प्रकारे घडवून आणणे.
६) शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे.
७) मांसपेशीचे आकुंचन-प्रसारण योग्य प्रकारे घडवून त्यांचे आरोग्य राखणे.
ही सगळी महत्वाची कामे थायरॉइड ग्रंथी आपल्या शरिरात करत असते. थोडक्यात जर थायरॉइड ग्रंथीचे काम बिघडले तर ही सर्व कामे बिघडू शकतात.

थायरॉइड ग्रंथीचा आजार कोणाला होऊ शकतो?…

कोणालाही हा होऊ शकतो पण पुरुषांपेक्षा स्त्रियांना ५-८ पट अधिक होतो.
बर्‍याच व्यक्तींना तर थायरॉइड ग्रंथीचा त्रास असूनदेखील हे माहीतच नसते की त्यांना असा कोणतातरी त्रास आहे.

थायरॉइड ग्रंथीच्या आजाराची कारणे :-

१) अनुवंशिकता
२) जीवनशैलीतील बदल
३) वातावरणातील बदल
४) आहारात पोषक घटक कमी असणे अर्थात झिंक, सेलेनियम, आयोडीन हे घटक आहारात कमी असणे.
५) किंवा एखादा ऑटो-इम्यून आजार असणे.

थायरॉइड ग्रंथीचे आजार :-
१) गॉइटर किंवा गलगंड
२) ग्रेव्ह्ज डिसिझ
३) हाशिमोटोज थायरॉइडायटीस
४) हायपरथायरॉइडिझम्
५) हायपोथायरॉइडिझम्
६) थायरॉइड ग्रंथीचा कर्करोग
७) थायरॉइड नोड्यूल
हे वेगवेगळे थायरॉइड ग्रंथीचे आजार आहेत पण ह्यातील हायपोथायरॉइडिझम् आणि हायपरथायरॉइडिझम् हे जास्त कॉमन असल्याने पुढे आपण हे दोन्ही आजार सविस्तर पाहणार आहोत.
क्रमशः