ख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट पं. राजन मिश्रा

0
166
  • गो. रा. ढवळीकर

बुलंद आवाजाने व भावपूर्ण गायकीने जगभर मैफिली गाजवणारे पं. राजन मिश्रा एवढ्या लवकर जातील असे वाटले नव्हते. एक मात्र खरे की राजनजी गेले तरी त्यांचे गाणे अमर आहे. त्यांचा प्रत्येक शब्द व स्वर रसिकांच्या हृदयात घर करून राहिलेला असून त्याचा विसर पडणे अशक्य आहे.

बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. राजन मिश्रा दिवंगत झाल्याची बातमी गेल्या आठवड्यात थडकली व मोठा धक्काच बसला. माझे ते अत्यंत आवडते गायक होते आणि माझ्याप्रमाणेच अनेक रसिकांचे ते लाडके होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने खूप दु:ख झाले. त्यांचे बंधू आणि सहगायक पं. साजन मिश्रा यांची अवस्था कशी झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. बुलंद आवाजाने व भावपूर्ण गायकीने जगभर मैफिली गाजवणारे पं. राजन मिश्रा एवढ्या लवकर जातील असे वाटले नव्हते. एक मात्र खरे की राजनजी गेले तरी त्यांचे गाणे अमर आहे. त्यांचा प्रत्येक शब्द व स्वर रसिकांच्या हृदयात घर करून राहिलेला असून त्याचा विसर पडणे अशक्य आहे.

मी त्यांचे गाणे सर्वप्रथम १९८६-८७ च्या दरम्यान ‘सम्राट क्लब कपिलेश्‍वरी’ने आयोजित केलेल्या मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती संमेलनात ऐकले. संमेलनाची ती दुसरी रात्र होती. त्या रात्रीच्या अखेरच्या सत्रात ११.३० वा. पं. राजन व साजन मिश्रा रंगमंचावर स्थानापन्न झाले. धोतर व कुर्ता परिधान केलेले दोघेही बंधू प्रसन्न दिसत होते. त्या दोन्ही गायकांचा निवेदिकेने रसाळ भाषेत दीर्घ परिचय करून दिला व श्रोत्यांची उत्सुकता वाढवली. अतिशय नम्रपणे श्रोत्यांना अभिवादन करून त्यांनी मैफिलीस सुरुवात केली. ती मैफील जशाची तशी अद्यापही स्मरणात आहे, एवढे त्यांचे गाणे प्रभावी होते.

गायनाची सुरुवात त्यांनी ‘बागेश्री’च्या बड्या ख्यालाने केली. त्यानंतर दुसर्‍या रागाचा छोटा ख्याल व मध्यंतरानंतर पुन: ‘चंद्रकंस’चा बडा ख्याल व भजन प्रस्तुतीने त्यांनी ती मैफील साडेतीन-चार तास रंगवली. बैठक संपली तरी श्रोते खुर्चीवरून उठावयास तयार नव्हते. त्या रात्री त्यांनी गायलेल्या ‘बागेश्री’च्या ‘कवन गत भई’ व ‘चंद्रकंस’च्या ‘गुणीयन के गुन गा’ या दोन्ही चीजांचा प्रत्येक शब्द व स्वर आजही कानात गुंजी घालतो. त्या मैफिलीने मी एवढा भारावून गेलो की त्यानंतर त्यांची गोव्यात झालेली एकही बैठक सोडली नाही. सम्राट क्लबनेच पाच-सहा वेळा त्यांना निमंत्रित करून श्रोत्यांना अपार आनंद दिला. त्यांनी गायिलेले ‘बिहाग’, ‘मालकंस’, ‘दरबारी कानडा’, ‘कौशी कानडा’, ‘नंद’ इ. अनेक राग स्मरणात आहेत. एका रात्री त्यांनी ‘तिलंग’सारखा राग प्रस्तुत केल्याचे आठवते. एके वर्षी त्यांनी रात्रीच्या ऐवजी सकाळचे सत्र मागून घेतले. त्या दिवशी त्यांनी ‘गुजरी तोडी’च्या स्वरांनी श्रोत्यांची मने हळवी करून टाकली आणि त्यानंतर देशी का शुध्द सारंग गायले ते आता आठवत नाही. अशा चार-चार तास श्रोत्यांना खिळवून ठेवणार्‍या मिश्राबंधूंना एकदा पुण्यात ‘साई गंधर्व संमेलना’त फक्त अर्धा तास गाण्यास सांगितले गेले तेव्हा खूप वाईट वाटले. आयोजकांचा मान राखून त्यांनी आपला कार्यक्रम अर्ध्या तासात आटोपला; परंतु श्रोते अतृप्त मनाने घरी परतले.

पं. राजन व साजन मिश्रा हे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध बनारस घराण्याचे गायक. वडील सुप्रसिद्ध गायक पं. हनुमान मिश्रा तसेच काका पं. गोपाल मिश्रा आजोबा पं. बडे रामदासजी मिश्रा यांच्याकडून लहानपणापासून त्यांना घरंदाज गायकीची तालीम मिळाली. त्या गायकीला त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर विलक्षण उंचीवर नेऊन ठेवले व जगभर नावलौकिक कमावला. दोघाही बंधूंचा आवाज स्वरेल व बुलंद असून ते तिन्ही सप्तकांत सहजतेने विहार करू शकतात. स्वरांचा स्वत: आनंद घेत आणि श्रोत्यांना मनापासून देत, संथ लयीत त्यांची आलापी चाले आणि षड्‌ज, गंधार, पंचम या स्वरांवरचा ठेहेराव काळजाला स्पर्श केल्याशिवाय राहात नसे.

आलापीमध्ये बोलांचा वापर प्रभावीपणे करून ते शब्दांची व स्वरांची नजाकत वाढवीत. अतिविलंबित लयीत रागविस्तार करताना जेव्हा ते मंद्र सप्तकात प्रवेश करीत व बुलंद असा खर्जामधला षड्‌ज लावीत तेव्हा अंगावर काटा येई आणि श्रोत्यांच्या मुखातून सहजपणे ‘वाहवा’चे शब्द निघत. राग सजवताना त्यांचे स्वरलगाव इतके सुंदर असत की काही ठिकाणी श्रोते आनंदाने टाळ्या वाजवत, तर एखादा स्वर काळजाला भिडला तर श्रोत्यांच्या डोळ्यांतून टचकन पाणी येत असे. माझा मुलगा नितिन माझ्याबरोबर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला येत असे. बालवयातदेखील त्याच्या डोळ्यांत अनेक वेळा आनंदाश्रू टपकलेले मी पाहिले आहेत. घरातील संगीतमय वातावरणामुळे त्याला स्वरांचे वेड लहानपणापासून होते.

पं. राजन व पं. साजन मिश्रांची मैफील म्हणजे ख्याल गायकीचा सर्वांग परिपूर्ण अविष्कार. गाण्याचे एकही अंग नसेल जे त्यांच्या प्रस्तुतीत नाही. रागामधली सौंदर्यस्थळे दर्शविणारी विलोभनीय आलापी आणि आवर्तनाच्या अखेरीस चमत्कृतीपूर्ण तिहाई घेऊन समेवर येण्याची त्यांची हातोटी विलक्षण म्हणावी लागेल. समेवर येताना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मात्रांवरून उठाव घेऊन ते जेव्हा अचूकपणे समेवर धडकत तेव्हा श्रोते अक्षरश: मंत्रमुग्ध होत. त्यांची ‘सरगम’मधील करामत तर अतिशय मोहक असे. लयकारीमध्ये बोलबॉंट अथवा बोलतानेऐवजी नोटेशनचा वापर हे एक विशेष आकर्षण त्यांच्या गाण्यात असे.

मिश्राबंधू जुगलबंदीच्या पध्दतीने गाणे सजवत असत. त्यांचा ताळमेळ इतका सुरेख असायचा की एकाचा आलाप अथवा तान कुठे संपते आणि दुसरा ती कधी पुढे नेतो हे श्रोत्यांना समजत नसे. त्यांच्या स्वरलगावामध्ये कुठेही विसंगती नसे. उलट काही वेळा राजनजी नोटेशन म्हणत व साजनजी तो आलाप अथवा तान सही सही आकारात प्रस्तुत करीत. आलापांची गती वाढवत वाढवत ते सहजतेने तानेत शिरत. एकदा तानांची बरसात सुरू झाली की स्वरांचा अखंड धो-धो पाऊस पडल्याचा भास होत असे. आणि तानांमध्ये विविधता किती? प्रत्येक तान वेगळ्या प्रकारची. तिन्ही सप्तकांत विजेच्या गतीने फिरणारी त्यांची तान ऐकून कान तृप्त होत. दोघे मिळून एका दमात आवर्तन पुरे करून जेव्हा समेवर येत तो क्षण अवर्णनीय आनंदाचा असे. पं. साजन मिश्रा तर एका दमात मंद्र सप्तकापासून तार सप्तकाच्या वरच्या षड्‌जापर्यंत सहज विहार करून येत.

एक खरे की दोघेही बंधू सारख्याच ताकदीने गाणारे असले तरी गायनाची मुख्य बाजू पं. राजन मिश्राच संभाळीत. पं. साजनजी त्यांना पूरक साथ देत. काळजाला भिडणारा स्वरलगाव, शब्दांचा प्रभावी वापर करीत चमत्कृतीपूर्ण बढत करणे, लयकारीचा सौंदर्यपूर्ण आविष्कार हे राजनजी सहजतेने करीत व श्रोत्यांना भरभरून आनंद देत. मध्ये-मध्ये श्रोत्यांशी संवाद साधणे त्यांना आवडत असे. कधी आपल्या घराण्याविषयी, परंपरेविषयी तर कधीकधी चीजेवर ते भाष्य करीत. आपण अनेक ठिकाणी मैफली केल्या, परंतु इथल्यासारखे रसिक श्रोते भेटले नाहीत, अशी टिप्पणी करून श्रोत्यांना खूश करण्याचे कसबही त्यांच्याकडे होते. भजन ते तन्मयतेने सादर करीत. शीख गुरू नानकजी, संत कबीर, संत सूरदास, संत मीराबाई यांची भजने गाताना जणू ते ईश्‍वराशी तादात्म्य पावत. ‘साधो, रचना राम बनाई’, ‘जगत में झूठी देखी प्रीत’ यांसारखी अनेक भजने त्यांनी अजरामर केली आहेत.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगत गेलेली त्यांची बैठक श्रोत्यांना अक्षरश: खुर्च्यांना खिळवून ठेवत असे. मैफल संपली तरी श्रोते खुर्च्यांवरून हलायला तयार नाहीत असं दृश्य मी अनेक वेळा पाहिलं आहे.

मैफलीनंतर त्यांना भेटून व त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केल्याखेरीज मंडपातून पाय निघत नसे. घरी जाताना वाटते व घरी गेल्यावरही त्यांचे गाणे पिच्छा सोडीत नसे. खरेच असा गायक होणे नाही आणि त्यांचे ते दिव्य गाणे पुन: ऐकावयास मिळणे कठीणच. भारत सरकारने त्यांना मोठ्या मानाचा ‘पद्मविभूषण’ हा किताब देऊन गौरविले हे योग्यच झाले. त्यांच्या अकाली जाण्याने झालेले दु:ख सहन करण्याची ताकद त्यांचे बंधू पं. साजन मिश्रा व कुटुंबीयांना मिळावी व त्यांच्या आत्म्यास सद्गती द्यावी ही परमेश्‍वरापाशी प्रार्थना.