गुजरातसह हिमाचलातही भाजपचीच सत्ता

0
104
Indian Bharatiya Janata Party (BJP) President Amit Shah (L) show the victory sign to supporters as he arrives to address a press conference at the party headquarters in New Delhi on December 18, 2017. Indian Prime Minister Narendra Modi declared victory December 18 in two state elections, including a closely-fought race in his stronghold of Gujarat where the charismatic leader fronted the campaign. Modi thanked voters in Gujarat, his home state in India's west, and the northern Himalayan region of Himachal Pradesh, for backing the ruling Hindu national party in the local polls. / AFP PHOTO / PRAKASH SINGH

>> गुजरातेत कॉंग्रेसकडून कडवी झुंज

>> हिमाचलात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार पराभूत

अखेर गुजरात व हिमाचल प्रदेशमधील काही काळाच्या घनघोर निवडणूक प्रचार युद्धानंतर भाजपने उभय राज्यांमध्ये बाजी मारीत सत्ता काबीज करण्याची किमया साधली. गुजरातेत भाजपने सलग सहाव्यांदा सत्ता काबीज करण्याचा विक्रम नोंदवला. तर हिमाचलात कॉंग्रेसला सत्ताच्युत करण्यात स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप यशस्वी ठरला. त्याचबरोबर १८ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी देशावरील पकड आणखी घट्ट करण्यातही भाजपला यश आले आहे. १८२ सदस्यीय गुजरात विधानसभेवर भाजपचे ९९ उमेदवार निवडले गेले आहेत तर निकटचा प्रतिस्पर्धेत कॉंग्रेसचे ८० उमेदवार विजयी झाले.

२२ वर्षांच्या सत्ता वनवासानंतर गुजरातेत सरकार स्थापनेची अपेक्षा ठेवून असलेल्या कॉंग्रेसची स्वप्ने अखेर उध्वस्त झाली. भाजपला गुजरातेत सत्ता राखण्यात यश आले असले तरी त्यांची आमदार संख्या घटली असून मताधिक्यातही घट झाली आहे. तर पराभूत कॉंग्रेसच्या आमदारसंख्येत २०१२ च्या तुलनेत वाढ झाली आहे.

भाजपने १५० जागांचे उद्दिष्ट ठेवले होते व त्याच्या प्राप्तीसाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा या भूमीपुत्रांसह अरूण जेटली व अन्य अनेक केंद्रीय मंत्र्यांची फौज निवडणुकीच्या रणांगणांत उतरली होती. मात्र नव्यानेच कॉंग्रेसाध्यक्षपदी वर्णी लागलेल्या राहूल गांधींच्या नेतृत्त्वाखालील विरोधी पक्षाने त्यांना कडवी झुंज दिली. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व गिग्नेश मेवाणी या युवा पाटिदार व दलित नेत्यांकडूनही भाजपला प्रखर संघर्ष झाला. त्यामुळे ते उद्दिष्ट साध्य झाले नाही. गुजरातचे मुख्यमंत्री मतमोजणीच्या प्रारंभी पिछाडीवर होते. मात्र पिछाडी भरून त्यांनी प. राजकोट मतदारसंघातून प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या इंद्राणी राजगुरू यांच्यावर विजय नोंदवला.

गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांनी अनेक प्रचारसभांमध्ये स्टार प्रचारक म्हणून घणाघाती आरोपांसह कॉंग्रेसला जेरीस आणले. त्याची परिणती कालच्या निवडणूक कौलानंतर मोदी यांच्या नेतृत्त्वाला पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले. ही निवडणूक म्हणजे एका दृष्टिने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची नांदी ठरली आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाची सूत्रे स्वीकारलेल्या राहूल गांधी यांनीही आपला आत्मविश्‍वास वाढला असल्याची प्रचिती या निवडणुकीत दिली आहे.