हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काल झालेल्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि भाजप-एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयानंतर काल गुवाहाटी येथे आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सरमा यांना शपथ दिली. यासह आसाममध्ये सलग दोनवेळा मुख्यमंत्री बनणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी नेते ठरले आहेत.
हा शपथविधी सोहळा गुवाहाटी येथील खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. हिमंता यांचे संपूर्ण कुटुंबही येथे उपस्थित होते. तसेच रामेश्वर तेली, अतुल बोरा, चरण बोरो आणि अजंता नेओग या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
आसाममध्ये एनडीए सरकारची ही सलग तिसरी टर्म आहे. यापूर्वी 2016 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री झाले होते, तर 2021 मध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली होती.
हिमंता बिस्वा सरमा यांचा राजकीय प्रवास
हिमंता बिस्वा सरमा 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी आसाममध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि भाजपकडे केवळ पाच आमदार होते, परंतु हिमंता सरमा यांनी ईशान्य भारतात भाजपला मजबूत करण्यासाठी धोरणात्मकरीत्या काम केले. 2016 मध्ये भाजपने त्यांना ‘नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स’चे निमंत्रक बनवले. त्यानंतर त्यांनी ईशान्येतील प्रादेशिक पक्षांना भाजपसोबत जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
आसाममध्ये सत्तेवर आलेल्या नव्या सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर काल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी तेथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा-अर्चा केली. आणि गोव्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी मुख्यमंत्र्यानी कामाख्या देवीला साकडे घालताना तुझ्या कृपेने गोवा राज्य प्रगतीची सगळी शिखरे काबीज करो, समाजात ऐक्य व बंधुभाव नांदो. तसेच गोवा सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थना केली.