मनोज परबांकडून वीरेश बोरकरांवर पक्षविरोधी कारवायांचा आरोप
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) प्रमुख मनोज परब व पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांच्यातील वाद व मतभेद आता वाढतच चालले असून, काल परब यांनी समाज माध्यमांवरून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या नावांची यादीच जाहीर करून वादाला नव्याने आमंत्रण दिले. तसेच आपले एकमेव आमदार वीरेश बोरकर यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करीत काल याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितल्याने पक्षातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
मनोज परब यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितल्याच्या पार्श्वभूमीवर काल पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार वीरेश बोरकर यांना सोशल मीडियावरून ‘अनफॉलो’ करून त्यांच्याविषयी पक्षात बराच असंतोष असल्याचे जाहीरपणे दाखवून दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला. स्वतः पक्ष प्रमुख मनोज परब यांनीही त्यांना सोशल मीडियावर ‘अनफॉलो’ केले.
रिव्होल्युशनरी गोवन्स या प्रादेशिक पक्षाने अल्पावधीत राज्यातील राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे पक्षातील सध्याच्या घडामोडींकडे सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांचेही लक्ष लागून राहिले आहे.
पक्षातील घडामोडींविषयी बोलताना पक्षाचे एक नेते अजय खोलकर हे म्हणाले, की पक्ष हा सर्वोच्च असून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई ही होईलच. आमदार वीरेश बोरकर हे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांसोबत दिसून आल्याने पक्षाने त्याबाबत त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले असल्याचे खोलकर यांनी सांगितले.