सत्तरी तालुक्यातील 11 वर्षीय मुलाला गमवावा लागला पाय
सत्तरी तालुक्यातील एका 11 वर्षीय मुलाचा गँगरीनमुळे पाय कापावा लागल्याच्या प्रकरणातील प्राथमिक चौकशी अहवालात वाळपई सामाजिक आरोग्य केंद्रातील उपचारांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आरोग्य विभागाने वाळपई सामाजिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. यवंती गावडे हिला निलंबित केले आहे.
वाळपई सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्याने आरोग्य विभागाला सादर केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, ऑर्थोपेडिक असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या एमटीएस कर्मचाऱ्याने त्या मुलाच्या पायाला प्लास्टर घातले होते. मुलाच्या पायाला प्लास्टर काम अयोग्य पद्धतीने करण्यात आल्याने त्या मुलाचा पाय कापावा लागला. या प्रकरणामध्ये तज्ज्ञ समितीकडून चौकशी केली जात आहे.
अयोग्य उपचारामुळे मुलाला आपला एक पाय गमावल्याने त्याचे कुटुंब पूर्णपणे खचले आहे. 27 एप्रिल 2026 रोजी तो मुलगा सायकलवरून पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली होती. पालकांनी त्या मुलाला उपचारासाठी सामाजिक आरोग्य केंद्रात आणले होते. पायाला फ्रॅक्चर असल्याने प्लास्टर घालण्यात आला होता. तथापि, प्लास्टर योग्य पद्धतीने न घातल्याने त्याचा विपरित परिणाम झाला. त्या मुलांला ताप, उलट्या सुरू झाल्याने 28 रोजी पुन्हा वाळपई आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर त्या मुलाला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉमध्ये पाठविण्यात आले.
तपासण्याअंती गँगरीन झाल्याने मुलाचा पाय कापावा लागला. मुलाच्या दुखापतीवर आवश्यक उपचार तातडीने करण्यात आले नाहीत, असा आरोप कुटुंबीयांनी
केला आहे.