‘हिट अँड रन’ प्रकरणातील कारचालक अटकेत

0
5

>> संशयिताच्या शोधासाठी जुने गोवे पोलिसांनी नेमली होती 5 पथके

पणजी येथील कदंब बसस्थानकाजवळील हिरा पेट्रोल पंपजवळील ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर जुने गोवे पोलिसांना यश प्राप्त झाले. एका अज्ञात वाहनाच्या धडकेने शनिवारी पहाटे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता; मात्र त्या अपघातास कारणीभूत व्यक्तीचा थांगपत्ता लागू शकला नव्हता. अखेर तपासाअंती या प्रकरणी पोलिसांनी कारसह संशयित वाहनचालकाला काल अटक केली.

सविस्तर माहितीनुसार, हिरा पेट्रोल पंपजवळ शनिवार 8 एप्रिल रोजी पहाटे 3 च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मनोज शशिधरन (39 वर्षे) याचा मृत्यू झाला होता. मनोज याला धडक दिल्यानंतर वाहनचालकाने वाहनासह पलायन केले होते. या अपघातास कारणीभूत वाहन शोधून काढण्यासाठी जुने गोवे पोलिसांनी पाच पथके नियुक्त करून तपास चालवला होता. अपघातस्थळी कारचा तुटलेला एक भाग सापडला होता. ही पाचही पोलीस पथके पणजी व परिसरातील गॅरेज, नागरिक, सीसीटीव्ही फुटेज यांची पाहणी करून तपास करीत होती. अखेरीस एका कारबाबत माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर या अपघात प्रकरणी पोलिसांनी जीए-07-ई-2856 ही कार जप्त केली. या प्रकरणी वाहनचालक नागणेश नुकाराजू बंदी (32, रा. वरुणापुरी वास्को) याला अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टम-आंध्रप्रदेश येथील रहिवासी असून, नौदलात काम करीत आहे. संशयिताने अपघातग्रस्त कार आपल्या घराच्या मागील बाजूला लपवून ठेवली होती, असे पोलिसांनी सांगितले.