अपघातात एक पोलीस ठार; चौघे जखमी

0
7

>> शेळी-पोळे येथील जंक्शनवर कारकंटेनर यांच्यात समोरासमोर धडक

मुर्डेश्वर येथून देवदर्शन करून परतत असताना शेळी-पोळे, काणकोण येथील ताणशी जंक्शनवर कार आणि मासळीवाहू कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात हणजूण वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राकेश विर्नोडकर (47, रा. सडये-शिवोली) यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे पोलीस आणि एक गृहरक्षक जखमी झाला. हे सर्व जण हणजूण पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. या दोन्ही वाहनांची धडक एवढी जबरदस्त होती की कंटेनरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला, तसेच कारचेही मोठे नुकसान झाले.

या अपघातात पोलीस हवालदार कालिदास शेटेय (रा. आगरवाडा-पेडणे), कृष्णा पालयेकर (रा. पालये), प्रीतेश मांद्रेकर (रा. हरमल) आणि गृहरक्षक राजेश पटेकर (रा. मांद्रे) हे जखमी झाले. सध्या त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.
काणकोण पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी (दि. 10) पहाटे 2.30 च्या दरम्यान घडला. हे सर्व हणजूण पोलीस स्थानकावर कार्यरत असून, रविवारच्या सुट्टीचा लाभ घेऊन सर्वजण मुर्डेश्वर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून कारमधून परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. गोव्याच्या दिशेने येणाऱ्या कारची (क्र. जीए-11-ए-1805) धडक कारवारच्या दिशेने जाणाऱ्या मासळीवाहू कंटेनरला (क्र. एमएच-08-डब्ल्यू-8170) बसली.

मडगाव-कारवार मार्गावरील पोळे येथील टोल नाक्याजवळील ताणशी जंक्शनजवळ हा भीषण अपघात घडला. दोन्ही वाहनांची टक्कर समोरासमोर झाल्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच काणकोण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी डॉ. स्नेहा नाईक आणि परिचारिका समीक्षा देसाई यांनी प्राथमिक उपचारानंतर चौघा जखमींना पुढील उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवले. मात्र उपचारादरम्यान राकेश विर्नोडकर यांचा मृत्यू झाला.
सदर कार कालिदास शेट्ये हे चालवत होते; मात्र या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघातानंतर काही वेळासाठी वाहतूक मंदावली होती; मात्र त्यानंतर काणकोण पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
काणकोण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस पुढील तपास करीत आहेत.