विश्व हिंदू परिषदेच्या फातोर्डा येथे भरलेल्या हिंदू संमेलन काही वक्त्यांनी घर वापसी मदर तेरेझांबद्दल जे वक्तव्य केले ते गोव्यातील सर्वधर्मजातीपंथाचा सलोखा बिघडविणारे असून त्याचा गोवा विकास पार्टी निषेध करते असे पार्टीचे सर्वेसर्वा व ग्रामीण विकासमंत्री मिकी पाशेको यांनी काल सांगितले.आपल्या धर्माच्या बाबतीत बोलण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार असला तरी दुसर्या धर्मावर टीका करू नये. अशा टिकेमुळे शांतता भंग होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. गोव्यात सर्वधर्मिय गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, काही संस्थांचे नेते विनाकारण दुसर्या धर्मांवर टीका करून गोव्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पाशेको यांनी दिला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मदर तेरेझावर आरोप करून रोष ओढवून घेतला आहे. मदर तेरेझा मानवतावादी नेत्या होत्या. त्यांना सर्व जगात मानाचे स्थान असून तिच्यावर आरोप करून ख्रिश्चन धर्मियांमध्ये असंतोष पसरला आहे. अशा संस्थांनी आरोप करणे सोडावे असा सल्लाही पाशेको यांनी दिला आहे.