Home बातम्या ७ व ८ मार्च रोजी कला अकादमीत संत सोहिरोबानाथ संत साहित्य संमेलन

७ व ८ मार्च रोजी कला अकादमीत संत सोहिरोबानाथ संत साहित्य संमेलन

0
७ व ८ मार्च रोजी कला अकादमीत संत सोहिरोबानाथ संत साहित्य संमेलन

गोवा सरकारचे राजभाषा संचालनालय आणि संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या त्रिशताब्दी वर्ष समारोह समितीच्या वतीने येत्या दि. ७ व ८ मार्च रोजी दोन दिवशीय भव्य संत सोहिरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलनाचे आयोजन पणजीत करण्यात आले असून गोवा व गोव्याबाहेरील संत साहित्याचे अभ्यासक त्यामध्ये सहभागी होणार आहेत.पणजीतील कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात शनिवार दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता भव्य दिंडीने या संमेलनाचा शुभारंभ होईल. त्यानंतर ४.३० वाजता कर्नाटकातील बेंगळुरू येथील संत साहित्याचे अभ्यासक श्री. अरविंद जत्ती यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सन्माननीय पाहुणे म्हणून गोव्याचे राजभाषा मंत्री मिलिंद नाईक, कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांची उपस्थिती असेल. राजभाषा सचिव मॅथ्यू सॅम्युएल व कला व संस्कृती सचिव फैझी हाश्मी यांची यावेळी विशेष उपस्थिती असेल.
पहिल्या दिवशी संध्याकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ हा संत सोहिरोबानाथ जीवनदर्शनाचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
दुसर्‍या दिवशी रविवार दि. ८ मार्च रोजी दिवसभर संतसाहित्यावरील विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सकाळी ९ वाजता चहापान व प्रतिनिधी नोंदणीने पहिल्या सत्राचा प्रारंभ होईल. सकाळी १० ते ११ या वेळेत पहिल्या सत्रात ‘संत साहित्य व वैश्विक एकात्मता’ यावविषयावर परिसंवाद होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. केशव सद्रे असतील. या परिसंवादात अल्ताफ हुसेन (महाराष्ट्र), सावियो डिसोझा व डॉ. आर. एन. मिश्रा यांचा सहभाग असेल.
दुसर्‍या सत्रात सकाळी ११.३० वाजता ‘संत परंपरा आणि सामाजिक बांधिलकी’ या विषयावर परिसंवाद होणार असून शेख हनीफ, ऍड. रामनाथ आंबिये व चंद्रशेखर गावस हे त्यात सहभागी होतील. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोपाळराव मयेकर असतील.
दुपारी १ ते २ या वेळेत भोजन होणार असून दुपारी २.०० वाजता श्री. विष्णू सूर्या वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ‘संत साहित्याची भाषा’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात फादर मोईजिन आताईद, दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू व दैनिक गोवादूतचे संपादक श्री. सचिन परब सहभागी होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ३.३० ते ४.०० या वेळेत चहापान व त्यानंतर ४.०० वाजता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सोहळा होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर, सन्माननीय पाहुणे म्हणून कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, राजभाषा मंत्री मिलिंद नाईक तसेच राजभाषा सचिव मॅथ्यू सॅम्युएल उपस्थित असतील.